क्ले, पॉल :(१८ डिसंबर १८७९–२९ जून १९४०). आधुनिक स्विस चित्रकार व आरेख्यक कलावंत. स्वित्झर्लंडमधील म्यून्खन-बूखझे येथे जन्म. त्याचे वडील जर्मन व आई स्विस होती. बर्न येथे त्याचे प्रारंभीचे शिक्षण झाले. वडील संगीतशिक्षक असल्याने बालवयातच त्याने व्हायोलिनवादनात प्रावीण्य मिळविले. त्याचे कलाशिक्षण म्यूनिक येथे एर्व्हीन क्नीरच्या कलाविद्यालयात व म्यूनिक अकॅडमीमध्ये झाले (१८९८–१९०१). १९०६ मध्ये लिली श्टुंफ या पियानोवादक युवतीशी त्याचा विवाह झाला.  तेव्हापासून म्यूनिक येथे त्याचे वास्तव्य होते. त्याची चित्रे प्रारंभी बर्न, झुरिक आणि व्हिंटरटूर या ठिकाणी प्रदर्शित झाली. ‘सेमा’ या कलाकार-संस्थेच्या संस्थापकांपैकी तो एक होता. ‘Der Blaue Reiter’ (द ब्ल्यू रायडर) या अभिव्यक्तिवादी चित्रकार-संघाचा तो सदस्य असल्याने संघाच्या चित्रप्रदर्शनांतून त्याने भाग घेतला. पुढे त्याने पॅरिस (१९१२) व ट्युनिशिया (१९१४) या ठिकाणी प्रवास केला. ट्युनिसमधील निसर्गसौंदर्याने तो प्रभावित झाला, त्यातून त्याला रंगाच्या सुप्त सामर्थ्याची ओळख पटली. पुढे त्याने ⇨बौहाउस  या कलाशिक्षणसंस्थेत वायमार व देसौ या ठिकाणी (१९२१–३१) व नंतर ड्युसेलडॉर्फ अकॅडमीमध्ये (१९३१–३३) अध्यापन केले. ह्या काळात न्यूयॉर्क, म्यूनिक, पॅरिस, लंडन, बर्लिन इ. ठिकाणी त्याच्या कलाकृतींची प्रदर्शने भरली. आयुष्याच्या अखेरीस त्याचे वास्तव बर्न येथे होते. लोकार्नोनजीक मूराल्टो येथे हृदयविकाराने त्याचे निधन झाले.

क्ले याच्या कलाकृतींची संख्या ९,००० च्या आसपास भरते. व्हिला आर् (१९१९), अराउंड द फिश (१९२६), पास्टोरल (१९२७), फिअर (१९३४), फरगेटफुल एंजल (१९३९), डेथ अँड फायर (१९४०), स्टिल लाइफ (१९४०) या त्यांपैकी काही कलाकृती. काव्य, संगीत, रंग, वास्तुशिल्प यांतील कलातत्त्वांचा सुरेख समन्वय त्याच्या चित्रांतून आढळतो. दृश्य व कल्पित सृष्टीच्या गाभ्यात शिरून त्यातील गूढ व अगाध सत्याचा आविष्कार आपल्या कलाकृतींतून साधण्याचा त्याने प्रयत्न केला. प्रतिमा, प्रतीके, चिन्हे, लिपिसदृश आकृतिबंध आदींचा अवलंब करून त्याने अंतर्मनातील अतिवास्तवाचा आविष्कार घडवला. त्याची कलाविषयक मीमांसाही अतिशय मौलिक आहे. Schopferische Konfession (१९२०, इं. भा. क्रिएटिव्ह क्रेडो ), Padagoisches Skizzenbuch (१९२५, इं. भा. पेडॅगॉजिकल स्केचबुक, १९४४), Uber die Moderne Kunst (१९४५, इं. भा. ऑन मॉडर्न आर्ट, १९४७) हे त्याचे ग्रंथ उल्लेखनीय आहेत.

संदर्भ : San Lazzaro, G. di Trans. Hood, Stuart, Klee : A Study of His Life and Work, London, 1957.

करंजकर, वा. व्यं.

'व्हिला आर्' (१९१९) 'डेथ ऑड फायर'