तालु : मुखगुहा व नासागुहा (तोंड व नाक यांच्या पोकळ्या) यांना विभक्त करणाऱ्या, वरच्या दातांच्या मागे असणाऱ्या पडदीला तालू (टाळू) म्हणतात. तालू दोन भागांची बनलेली असून पुढच्यास दृढ तालू व मागच्यास मृदू तालू म्हणतात.
दृढ तालू : तालूचा पुढचा २/३ भाग अस्थींचा बनलेला असून त्यावर श्लेष्मल (बुळबुळीत पदार्थ स्रवणारे) पर्यास्थिकलेचे (हाडावरील तंतुमय आवरणाचे) घट्ट व जाड आवरण असते. उत्तर हन्वस्थी (वरच्या जबड्याचे हाड) व ताल्वास्थी (टाळूचे हाड) मिळून दृढ तालू बनलेली असते. डाव्या व उजव्या बाजूच्या उत्तर हन्वास्थींचे तालु–प्रवर्ध (विशिष्ट तऱ्हेने वळलेले भाग) मध्यरेषेत एकमेकांस घट्ट जोडलेले असतात. काही व्यक्तींमध्ये ही संधिरेखा थोडी उंच असल्यामुळे जिभेच्या पृष्ठभागास तिची जाणीव होऊ शकते. भ्रूणावस्थेतील वाढ होते वेळी जर हे तालु–प्रवर्ध एकमेकांशी सांधले गेले नाहीत, तर जी जन्मजात विकृती होते तिला ⇨ खंडतालू म्हणतात. दृढ तालूच्या मागच्या अर्ध्या भागात अनेक श्लेष्मल ग्रंथी असतात व या ग्रंथींचा स्राव हा भाग नेहमी ओलसर ठेवण्यास मदत करतो.
मृदू तालू : दृढ तालूच्या मागे असलेल्या, तंतू व स्नायू यांनी मिळून बनलेल्या १/३ भागास मृदू तालू म्हणतात. दृढ तालू स्थिर असते, तर हा भाग चलनक्षम (हालचाल करता येईल असा) असतो. दृढ तालूच्या मागच्या कडेपासून घशात लोंबकळणारा, मऊ ऊतकापासून (समान कार्य व रचना असणाऱ्या पेशींच्या समूहापासून) बनलेला तो एक पडदाच असतो. या पडद्याची मागची बाजू मोकळी असून तिच्या मध्यावर सोंडेसारखा लोंबता भाग असतो, त्यास पडजीभ म्हणतात. तोंड उघडून बघितल्यास दृढ तालू, मृदू तालू, पडजीभ स्पष्ट दिसतात. मृदू तालूच्या गाभ्यात पुष्कळ श्लेष्मल ग्रंथी असतात.
स्नायुंच्या एकूण पाच जोड्या मिळून तालूचा स्नायुमय भाग बनलेला असतो. बोलणे, गिळणे आणि फुंकणे या क्रियांच्या मृदू तालूच्या विशिष्ट हालचाली या स्नायूंमुळे होतात. गिळतांना अन्न वा द्रव पदार्थ नासाग्रसनीत (नाकाच्या घशाकडील भोकात) शिरू नये म्हणून मृदू तालूचा पुढचा भाग खाली येऊन ताठ होतो. त्याच वेळी तिचा मागचा भाग उंचावला जाऊन प्रसनी–भित्तीला भिडतो आणि नासाग्रसनी व मुखग्रसनी [घशाचे तोंडाकडील भोक → ग्रसनी] एकमेकांपासून विभागली जातात. ⇨ घटसर्पासारख्या रोगात जेव्हा ही हालचाल होत नाही तेव्हा पाणी किंवा अन्न नाकातून प्रत्यावर्तित होते (माघारी येते) व आवाज नाकात बोलल्यासारखा येतो. तोंड उघडून बघितल्यास गिळताना वा आवाज करताना मृदू तालू निश्चल व शिथिल बनलेली दिसते, त्याशिवाय ती बधिरही झालेली असते.
आपटे, ना. रा. भालेराव, य. त्र्यं.
“