लीला चिटणीसचिटणीस लीला  :  (१ सप्टेंबर १९१२–  ). मराठी रंगभूमीवरील आणि हिंदी-मराठी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री. जन्म धारवाड येथे. पूर्वाश्रमीच्या लीला नगरकर. त्यांचे शिक्षण नागपूर येथे झाले. १९३४ मध्ये नागपूर विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर त्याच वर्षी जुलैमध्ये उसना नवरा  या नाट्यमन्वंतरच्या नाटकात मालतीच्या भूमिकेने त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यानंतर आंधळ्याची शाळा  मध्येही त्यांनी बिंबाची भूमिका केली. 

 त्यांचे पती सुप्रसिद्ध पत्रकार डॉ. ग. य. चिटणीस ह्यांच्या प्रोत्साहनामुळे १९३५ मध्ये आदर्श चित्राच्या धुवाँधार  या चित्रपटात त्यांनी आपली पहिली भूमिका केली तथापि ⇨मा. विनायक निर्मित हंस पिक्चर्सच्या छाया (१९३६) मधील भूमिकेमुळेच त्या चित्रपट अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीस आल्या. १९३७ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या वहाँ  ह्या हिंदी बोलपटातही त्यांनी काम केले. नंतर मा. विनायकचा अर्धांगी (१९४०) ह्या मराठी चित्रपटात त्यांनी अरूंधतीची भूमिकाही उत्तम रीतीने केली होती. तसेच बॉम्बे टॉकीजचा कंगन (१९३९), बंधन (१९४०) झूला (१९४१) या हिंदी चित्रपटांतून त्या वेळचे उदयोन्मुख नायक अशोककुमार यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केल्या. लिला चिटणीस अशोककुमार ही जोडी त्यावेळी फार लोकप्रिय झाली होती. पुढे फिल्मिस्तानच्या शहीद (१९४८) पासून त्यांनी चरित्र अभिनेत्रीची भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर आवारा, गाईड  इ. चित्रपटांतून त्यांनी केलेल्या मातेच्या भूमिकाही यशस्वी झाल्या. अनंत काणेकरांचे फार्स हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे श्रेयही त्यांनाच आहे. त्यांचे दुसरे पती श्री. ग्वालानी ह्यांच्या सहकार्याने एक चित्रपटसंस्था काढून कंचन, किसीसे ना कहना  ह्या चित्रपटांच्या कथा, तसेच प्रमुख भूमिका, दिग्दर्शन आणि निर्मिती ह्या बाजू त्यांनी सांभाळल्या. त्यांनी भूमिका केलेले महत्त्वाचे आणखी काही चित्रपट म्हणजे जेलर, साधना, घरघर की कहानी, माँ, सैंया  हे हिंदी आणि पैसा बोलतो आहे, संत तुलसीदास, एक होता राजा, जरा जपून, पहिली मंगळागौर  इत्यादी मराठी चित्रपट होत.

 वाटवे, बापू