जेफ्री चॉसर

चॉसर, जेफ्री : (१३४० ?–१४००). मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी. जन्म लंडन येथे. १३५७ मध्ये ड्यूक ऑफ क्लॅरेन्सच्या वाड्यावर तो नोकरीस होता. त्यानंतर तिसऱ्या एडवर्डच्या सैन्यात तो होता. १३५९ मध्ये फ्रान्समधील लढाईत कैद झाल्यावर राजाने पैसे भरून त्याची सुटका केली. पुढे तो एस्क्वायर या उच्च पदावर चढला. १३६६ मध्ये जॉन ऑफ गाँटच्या मेहुणीशी विवाह झाल्यावर पत्नीच्या नातेसंबंधामुळे राजदरबारात त्याचे बस्तान बसले. १३६८ ते १३७८ या काळात राजनैतिक कामगिरीवर फ्रान्स व इटलीत जाण्याची संधी त्यास लाभली आणि तेथील साहित्यातील नवप्रवाहांचा त्याला चांगला परिचय घडला. दरबारात राजकृपेचे अनेक चढउतार वेळोवेळी त्याने अनुभवले, तरी एकंदरीत त्याची भरभराटच होत गेली. मृत्यूनंतर लंडनमधील वेस्टमिन्स्टर ॲबीमध्ये त्याचे दफन करण्यात आले आणि अशा तऱ्हेने तेथील सुप्रसिद्ध कविकोपरा–पोएट्स कॉर्नर–अस्तित्वात आला. 

चॉसरच्या काव्यलेखनाची तीन पर्वे स्पष्टपणे दिसतात. पहिल्या, म्हणजे उमेदवारीच्या पर्वात (१३५९–७२) त्याच्यावर तत्कालीन फ्रेंच काव्याचा बराच प्रभाव होता. मध्ययुगातील रोमां द् ला रोझ  या गाजलेल्या फ्रेंच रूपकात्मक काव्याचे रोमान्स ऑफ द रोझ  हे इंग्रजी भाषांतर करून त्याने आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीचा आरंभ केला. द बुक ऑफ द डचेस  हे त्याचे पहिले स्वतंत्र काव्य. जॉन ऑफ गाँटच्या पहिल्या पत्नीच्या निधनावर लिहिलेल्या या दीर्घकाव्यात, विलापिका आणि तत्कालीन फ्रेंच काव्यातील स्वप्नवर्णनाचे व रूपकाचे संकेत यांची चांगली सांगड घालण्यात आलेली आहे. चॉसरच्या आवडत्या फ्रेंच-लॅटिन कवींचेच सूर या काव्यात प्रामुख्याने ऐकू येत असले, तरी भावनेचा सच्चेपणा आणि शैलीची सहजता या गुणांमुळे ते केवळ परभृत नाही, याची साक्ष पटते. यानंतर दहा वर्षे चॉसरने काहीच लिहिलेले दिसत नाही. पण या काळातील त्याच्या पर्यटनामुळे दान्ते, पीत्रार्क आणि बोकाचीओ या इटालियन कवींपासून त्याला नवी स्फूर्ती मिळाली व त्याच्या साहित्यसंसारातील दुसरे पर्व (१३७२–८६) सुरू झाले. त्यातील द हाउस ऑफ फेम  या त्याच्या दुसऱ्या दीर्घकाव्यात त्याच्या विनोदवृत्तीला प्रथमच बहर आला. या काव्याच्या पहिल्या खंडात कवी स्वप्नात प्रीतीची देवता व्हीनस हिच्या मंदिरात गेला असताना तेथून एक गरुड त्याला उचलून आकाशात घेऊन जातो. गरुड व भ्यालेला कवी यांचा दुसऱ्या खंडातील संवाद उत्कृष्ट विनोदाचा नमुना आहे. तिसऱ्या खंडात गरुड कवीला कीर्तिमंदिरात नेतो. या अपूर्ण काव्यात रूपक व स्वप्नवर्णन हे तत्कालीन रूढ काव्यसंकेत असले, तरी त्यातील वास्तववादी संवाद व नर्मविनोद हे नवे विशेष कवीचा विकास स्पष्टपणे सूचित करतात. यानंतर द पार्लमेंट ऑफ फाउल्स  हे काव्य चॉसरने लिहिले. सेट व्हॅलेंटाइनच्या स्मृतिदिनी पक्षी आपापले जोडीदार निवडतात, या दंतकथेवर आधारलेल्या या काव्यात गरुडाच्या मादीच्या स्वयंवराचे वर्णन आहे. राजा दुसरा रिचर्ड याचे १३८१ मध्ये बोहीमियाची राजकन्या ॲन हिच्याशी ठरलेल्या लग्नावर केलेले हे रूपक असावे. स्वयंवरासाठी जमलेल्या पक्ष्यांचे संभाषण व त्यातून होणारा विनोद मनोरंजक आहे.

ट्रॉयलस अँड क्रिसेड  हे सु. आठ हजार ओळींचे काव्य चॉसरची सर्वोत्कृष्ट काव्यकृती होय. ट्रोजन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही शोकपर्यवसायी प्रेमकथा बोकाचीओच्या Il Filostrato या काव्यावर आधारित असली, तरी कथेतील स्वभावरेखनात चॉसरचा स्वतंत्रपणा दिसतो. तीन वर्षे कायावाचामने ट्रॉयलसची झालेली क्रिसेड ग्रीकांच्या छावणीत गेल्यावर त्याला विसरून डायोमीड या ग्रीक वीराचा स्वीकार करते व भग्नहृदयी ट्रॉयलस युद्धात पडतो, ही या कथेची रूपरेषा. क्रिसेडचे पात्र हे इंग्रजी साहित्यातील जिवंत स्वभावरेखनाचे पहिले उदाहरण होय. या दोन प्रेमिकांचे प्रेमजीवन बदलत्या दृष्टिकोणाची इतकी सूक्ष्म स्थित्यंतरे दाखविते, की हे काव्य एक उत्कृष्ट मानसशास्त्रीय विश्लेषणच ठरावे. काव्यातील निर्देशसंपन्नतेतून व्यक्त होणारी चॉसरची विद्वत्ता, मधूनच डोकावणारा सौम्य उपरोध, क्रिसेडचा म्हातारा काका पँडॅरस याची चतुर भाष्ये, संवादांतील वास्तवता व सहजता आणि ओघवती, लवचिक शैली या वैशिष्ट्यांमुळे त्या युगातील हे अग्रेसर काव्य ठरते. द लेजंड ऑफ गुड विमेन  या अपूर्ण काव्यात चॉसरची प्रतिभा क्षीण झाल्यासारखी वाटते. ट्रॉयलस अँड क्रिसेडमध्ये स्त्रीनिंदेचे प्रायश्चित्त म्हणून सद्‌वर्तनी स्त्रीचरित्र रंगविणारे हे काव्य आपण हाती घेतले, असे कवी सांगतो. वीस सद्‌गुणी स्त्रियांच्या संकल्पित जीवनचरित्रांपैकी फक्त नऊच त्याच्या हातून लिहून झाली. ह्या कथांपेक्षा त्यांचा उपोद्‌घातच विशेष प्रभावी वाटतो. स्त्रीनिंदा केल्याबद्दल कामदेवाचा कवीवर झालेला राग, कामदेवाची राणी ॲल्सेस्टी हिने कवीची घेतलेली बाजू आणि सुचविलेले प्रायश्चित्त ह्यांसंबंधी प्रांजळपणे केलेले आत्मनिवेदन उद्‌बोधक आहे. 

चॉसरने कँटरबरी टेल्सची रचना १३८७ च्या सुमारास हाती घेतली परंतु तीही अपुरीच राहिली. मात्र तिनेच त्याला दिगंत कीर्ती मिळवून दिली. चॉसरच्या काव्यनिर्मितीचे हे तिसरे व अखेरचे पर्व (१३८६–१४००). या कथा मध्ययुगीन कथामालापद्धतीवरच रचलेल्या असल्या, तरी त्यांची मध्यवर्ती कल्पना चॉसरची आहे. लंडनहून कँटरबरी या धर्मस्थळाला जाऊन परतणारे तीस यात्रेकरू जातायेता प्रत्येकी चारचार गोष्टी सांगतात, अशी या कथामालेची चौकट. या संकल्पित १२० कथांपैकी वीस पूर्ण व चार अपूर्ण आहेत. त्यांतील काही या ग्रंथाचा संकल्प करण्यापूर्वीच लिहिल्या गेल्या असाव्यात. या कथांना प्रस्तावना म्हणून जोडलेले यात्रिकवर्णन हे इंग्रजीतील वर्णनात्मक काव्याचे एक अमोल लेणे आहे. शूर व सभ्य शिलेदार, बाथ शहराची रंगेल गावभवानी, तोलूनमापून वागणारी शिष्ट जोगीण, बेदरकार महंत, विद्वान परंतु धनलोभी वैद्य, कामात असण्याचा बहाणा करणारा धूर्त वकील, ज्ञानानंदाच्या समाधीत गुंगलेला ऑक्सफर्डचा विद्यार्थी, रंगेल धर्मोपदेशक, पापभीरू पाद्री, रगेल चक्कीवाला असा यांतील प्रत्येक यात्रेकरू मानवी स्वभावाचा एकेक नमुना आहे. चक्कीवाल्याच्या नाकावरचा फोड, जोगिणीचे सानुनासिक प्रार्थनापठण, धर्मगुरूचे आरस्पानी टक्कल, तरुण शिलेदारपुत्राचा भरतकामाने सजविलेला डगला इ. वैशिष्ट्ये असलेली पात्रे लेखणीच्या एकेक फटकाऱ्याने तो साकार करतो. यांखेरीज कथानिरूपण सुरू झाल्यावर ही पात्रे परस्परांच्या कथांवर जी भाष्ये करतात, त्यांतूनही एक वेगळेच नाट्य निपजते. या कथाही इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, की मध्ययुगीन इंग्रजी वाङ्‌मयातील विविध कथाप्रकारांचे प्रातिनिधिक दर्शनच त्या घडवितात. त्यांपैकी शिलेदाराने सांगितलेली पॅलॅमॉन व अर्साइट या मित्रांची दरबारी पार्श्वभूमीवरील कथा, जोगिणीच्या पाद्र्याने सांगितलेली लबाड कोल्ह्याची गोष्ट, विद्यार्थ्याने निवेदिलेली साध्वी ग्रिझेल्डाची कथा व खुद्द कवीची सर टोप्‌स ही समकालीन रोमान्सचे विडंबन करणारी कथा विशेष लोकप्रिय आहेत. सामान्यतः कँटरबरी  टेल्समधील कथा त्या त्या कथेच्या निवेदकाला अनुरूप अशाच आहेत.


याशिवाय चॉसरचे आणखी काही लिखाण आहे. त्यापैकी काही गद्यात आहे. उदा., अस्ट्रोलेब  हे खगोलशास्त्रावरील पुस्तक. मध्ययुगातील सर्वांत लोकप्रिय इंग्रजी कवी म्हणून चॉसरला अनन्यसाधारण मान्यता लाभली व पंधराव्या शतकात त्याच्या इंग्रजी आणि स्कॉटिश शिष्यांचे दोन संप्रदाय निर्माण झाले. एलिझाबेथच्या काळात इंग्रजी काव्यातील नव्या युगाचा आरंभ करणाऱ्या स्पेन्सरने त्याला गुरुस्थानी मानले, तरी सतराव्या व अठराव्या शतकांत त्याचे काव्य खडबडीत, रांगडे व हीन अभिरुचीला सुखविणारे आहे, असा सर्वसाधारण समज होता. आता चॉसर हा आधुनिक इंग्रजी काव्याचा जनक मानला जातो. त्याचे प्रमुख समकालीन कवी गॉवर व लँग्‌लंड यांची निर्मिती सर्वथैव मध्ययुगीन चाकोरीतील आहे. ही चाकोरी मोडून चॉसरने जीवनाच्या सर्व अंगांविषयी कुतूहल व ओढ, वास्तव वर्णन, मार्मिक स्वभावलेखन, नर्मविनोद, सोपी घरगुती शैली इ. गुणविशेषांनी इंग्रजी काव्याला नवी दिशा दिली. चॉसरमध्ये उत्तुंग कल्पनाशक्ती, भव्य-दिव्य ओढ व सखोल तत्त्वविवेचक वृत्ती यांचा अभाव असला, तरी इंग्रजीतील एक अव्वल दर्जाचा वर्णनकुशल कथाकवी म्हणून त्याचे स्थान अढळ आहे.

 संदर्भ : 1. Brewer, D. S. Chaucer, London, 1953. 

           2. Chesterton, G. K. Chaucer, London, 1932. 

           3. Coghill, N. The Poet, Chaucer, London, 1949. 

           4. Crow, M. M. Olson, G. C. Chaucer : Life Records, London, 1966. 

           5. Lawlor, John, Chaucer, London, 1968. 

           6. Lowes, J. L. Geoffrey Chaucer, London, 1934. 

           7. Robertson, D. W. Jr. A Preface to Chaucer, 1963. 

           8. Robinson, F. N. The Works of Geoffrey Chaucer, London, 1957. 

           9. Skeat, W. W. Complete works, 6 Vols., Oxford, 1897. 

          10. Spiers, J. Chaucer, The Maker, London, 1951. 

          11. Wagenknecht, E. Ed. Chaucer : Maodern Essays in Criticism, New York, 1959.

नाईक, म. कृ.