चालन : (गु. गुर्जन क. गुगे इं. गुर्जन बाल्सम, कॉमन गुर्जन ट्री, वुड ऑइल ट्री लॅ. डिप्टेरोकार्पस टर्बिनेटस कुल-डिप्टेरोकार्पेसी). सु. ३७–४६ मी. उंच व ३-४ मी. घेर असलेला हा सदापर्णी वृक्ष आसाम, अंदमान, बंगाल, पेगू, सिंगापूर आणि महाराष्ट्र इ. प्रदेशांत व तुरळकपणे कारवार आणि कोकण येथील सदापर्णी जंगलांत आढळतो. चितगाँगमध्ये तो भरपूर असून तेथे ६० मी.पर्यंत उंच वाढतो. आसामात अधिक प्रमाणात एकत्र लागवडी केल्या आहेत. पहिल्या फांदीपर्यंतचा सोट (सरळ खोड) ३० मी.पर्यंत उंच असतो. साल भेगाळ पान एकाआड एक, साधी, सोपपर्ण (उपपर्णयुक्त), चिवट, मोठी (१२–३० × ६–१२ सेंमी.), अखंड किंवा काहीशी बोथट, दातेरी, गुळगुळीत व चकचकीत असतात. मोठी, पांढरी लालसर फुले ३–८ च्या मंजऱ्यांवर, पानांच्या बगलेत डिसेंबर-जानेवारीत येतात. त्यांची सामान्य संरचना ⇨डिप्टोरोकार्पेसी अथवा शाल कुलात वर्णिल्याप्रमाणे. फळ कपालीप्रमाणे, गोलसर, लहान लिंबाएवढे व लवदार असते. त्यावर दोन दीर्घस्थायी संदले असतात. बी एकच व फळाच्या तळाशी चिकटलेले असते. बंगालमध्ये खोडापासून ‘गुर्जन तेल’ किंवा ब्रह्मदेशात ‘कानिइन तेल’ नावाची राळ (ओलिओरेझीन) काढतात व ती यूरोपकडे निर्यात होते. रोगण बनविण्यास व शिलामुद्रणाच्या शाईकरिता ती वापरतात. ‘कोपाइबा राळे’त हे तेल मिसळतात राळेतील तेल ऊर्ध्वपातनाने (पात्रात बंद करून पदार्थ तापवून व बनवणारी वाफ थंड करून मिळणारा पदार्थ ग्राहकपात्रात जमविण्याच्या क्रियेने) काढून पामरोज तेलात त्याची भेसळ करतात. व्रण, नायटे व त्वचारोग यावर राळ लावतात. जुनाट परम्यावर गुर्जन तेल देतात. लाकूड फिकट तांबूस व सुवासिक असून लोहमार्गाखालील ओंडके (सिलीपाट), रेल्वे वाघिणी, प्रवासी डबे, खोकी, इमारतीचे बांधकाम इत्यादींस उपयुक्त असते. गुर्जन तेल इमारती लाकूड, बांबू आणि नावा यांच्या परिरक्षणाकरिता (कुजण्यापासून किंवा कीटकांच्या उपद्रवापासून वाचविण्यासाठी) लावतात. ह्या वृक्षाला आग चटकन लागते. नवीन लागवड बियांनी करतात. डिप्टेरोकार्पस वंशातील सर्वच दहा जातींपासून गुर्जन तेल किंवा गुर्जन बाल्सम या व्यापारी नावांनी ओळखली जाणारी राळ मिळते.
जमदाडे, ज. वि.
“