चार्वाक : भारतीय दर्शनांपैकी ⇨लोकायतदर्शन  ह्या भौतिक आणि नास्तिकवादी दर्शनाशी निगडित असलेले एक विशेष नाम, तसेच सामान्य नाम. चार्वाक हा लोकायतदर्शनाचा आचार्य होता, असे काही मानतात तथापि ह्या नावाचा आचार्य खरोखरीच होऊन गेला किंवा काय ह्याविषयी मतभेद आहेत. रघुनाथ भास्कर गोडबोले ह्यांच्या भरतखंडाचा अर्वाचीन कोश (१८८१) ह्या ग्रंथात चार्वाकासंबंधी काही माहिती दिली आहे, ती अशी : चार्वाकाचा जन्म अवंती देशात क्षिप्रा आणि चामला ह्या नद्यांच्या संगमावर असलेल्या शंखोद्धार क्षेत्री झाला (युधिष्ठिर शक ६६१–इ.स.पू. २४४१) व पुष्करतीर्थी यज्ञगिरीवर त्याचा अंत झाला (युधिष्ठिर शक ७२७–इ.स.पू. २३७५). त्याच्या पित्याचे नाव इंदुकांत आणि आईचे सृग्विणी होते. एका जैन ग्रंथाच्या आधारे ही माहिती देण्यात आलेली असली, तरी ह्या जैन ग्रंथाचे नाव कोशकारांनी दिलेले नाही व ते उपलब्ध झालेले नाही. 

 कृष्णमिश्राच्या (अकराव्या शतकाच्या उत्तरार्ध) प्रबोधचंद्रोदय  ह्या नाटकात बृहस्पती हा लोकायतदर्शनाचा संस्थापक व चार्वाक हा त्याचा पट्टशिष्य प्रमुख प्रचारक म्हणून येतो. सर्वदर्शनसंग्रहात चार्वाकाला ‘नास्तिकशिरोमणि’ म्हटले आहे. महाभारतात चार्वाक हा दुर्योधनाचा मित्र म्हणून येतो. महाभारताच्या शल्यपर्वात पराभवाने व्यथित झालेल्या दुर्योधनाला आपला संन्यासी मित्र चार्वाक ह्याची आठवण होते आणि आपला मृत्यू झाल्यास आपला वीरोचित अंत्यविधी चार्वाकच करील, असे वाटते. महाभारताच्या शांतिपर्वात तो एक राक्षस म्हणून येतो. भारतीय युद्धाच्या समाप्तीनंतर अश्वमेध यज्ञाच्या तयारीत असलेल्या युधिष्ठिराला एका परिव्राजकाच्या रूपात भेटून तो प्रश्न करतो, की ‘स्वतःच्या बांधवांना मारून मिळविलेला विजय खरा आहे काय ?’ हा दुर्योधनाचा मित्र, चार्वाकनामक राक्षस आहे, असे ब्राह्मण सांगतात. श्रीकृष्णही तेथे येतो. चार्वाक हा तपस्वी असला, तरी ब्राह्मणांचा अवमान केल्यामुळे त्याचा ब्राह्मणांकडून वध होईल असे तो सांगतो. चार्वाकाला त्यानंतर मारून टाकण्यात येते. काहींच्या मते हा राक्षस चार्वाक व लोकायतदर्शनाशी निगडित असलेला चार्वाक एकच होत.

 प्रा. सदाशिव आठवले ह्यांच्या मते चार्वाक हा लोकायतदर्शनाचा संस्थापक नव्हे परंतु एक प्रभावी आचार्य असावा व इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून सातव्या शतकापर्यंत केव्हातरी तो होऊन गेला असावा.

चार्वाकाचे मत मानणारा तो चार्वाक, अशा अर्थानेही हा शब्द भारतीय साहित्यात आलेला आहे. 

संदर्भ : आठवले, सदाशिव, चार्वाक : इतिहास आणि तत्त्वज्ञान, वाई, १९५८.

 कुलकर्णी, अ. र.