चापेक, फ्रीड्रिश : (१८६८–१९२१). ह्या झेक वनस्पतिवैज्ञानिकांचे शिक्षण प्राग विद्यापीठात झाले नंतर लाइपसिकमध्ये प्फेफर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधनकार्य केले पुढे व्हिएन्नात ज्यूलियस वीझ्नर यांच्या हाताखाली मदतनीस म्हणून त्यांनी काम केले व शेवटी प्रागमध्ये ते वनस्पतिक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक झाले. वनस्पतींतील चलनवलन व चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) हे त्यांचे संशोधनाचे क्षेत्र असून मुळांद्वारे कार्बन डाय-ऑक्साइडाचे स्रवण होते व तसेच मूलाग्रांजवळ गुरुत्व उद्दीपन (गुरुत्वाकर्षणाची जाणीव होणे) होते, हे त्यांनी दाखविले या उद्दीपक प्रेषणाचा वेगही त्यांनी निश्चित केला. प्रत्यक्ष अवगमात (उद्दीपनानंतर व संवेदनापूर्वी वनस्पतीत घडून येणाऱ्या बदलात) काही रासायनिक बदल होत असून विशेष प्रकारच्या पदार्थाचे ⇨ परिकाष्ठातून (रसवाहक भागातून) स्थलांतर होत असते, हे त्यांनी अनेक प्रयोगांनी दर्शविले. Biochemie der Pflanzen हा तीन खंडांचा ग्रंथ त्यांनी लिहिला. (१९०५–२१).
पहा : चयापचय वनस्पतींचे चलनवलन.
जमदाडे, ज. वि.