चलच्चित्रपट तंत्र : पडद्यावर प्रक्षेपित केलेल्या छायाचित्रामध्ये हालचाल होत असल्याचा आभास उत्पन्न करणारी छायाचित्रमालिका तयार करण्याचे व ती पडद्यावर प्रक्षेपित करण्याचे तंत्र. अनेक लोकांच्या सतत प्रयत्नांमुळे चलच्चित्रणाची कला साध्य झाली व तीत पुढे निरनिराळ्या सुधारणा होऊन आजच्यासारखे रंगीत, बोलके, त्रिमितीय, मूर्त स्वरित, यथार्थ ध्वनिपुनरुत्पादनाचा आभास उत्पन्न करणारे, स्टिरिओ-फोनिक, व्यंगपट असे अनेक प्रकारचे चित्रपट तयार होऊ लागले. चलच्चित्रणाचे दोन प्रमुख भाग असतात. पहिला भाग म्हणजे कॅमेऱ्याने अनेक छायाचित्रे घेऊन चित्रमालिका तयार करणे व दुसरा भाग म्हणजे चित्रदर्शक यंत्राच्या (प्रकाशक्षेपकाच्या) मदतीने या चित्रमालिकेचे (चित्रपटाचे) पडद्यावर प्रक्षेपण करणे. कॅमेऱ्याने चित्रपट घेताना एकापुढे एक अशी ठराविक अंतराने हजारो छायाचित्रे एका लांब फिल्मवर घेतली जातात. या फिल्मवर रासायनिक संस्करण करून व्यस्त (निगेटिव्ह) फिल्म तयार करतात व तिची नक्कल करून सम फिल्म (प्रिंट) तयार करतात. प्रकाशक्षेपक यंत्रामध्ये वापरण्यासाठी नेहमी सम फिल्मचाच उपयोग करतात.

पडद्यावर दिसणारी छायाचित्रे एकामागून एक अशी क्रमवार आणि वेगाने बदलत असल्यामुळे प्रतिमा सातत्य (प्रतिमेची संवेदना अल्पकाळ तशीच राहणे) या डोळ्यांच्या नैसर्गिक गुणाचा उपयोग होऊन चित्रामध्ये हालचाल होत असल्याचा भास होतो. चित्रपट पाहत असताना पडद्यावर एकदा संपूर्ण काळोख व नंतर झगझगीत प्रकाशातील चित्र असे आलटून पालटून चाललेले असते; परंतु त्यांचा वेग फार जास्त असल्याने ही आलटापालट पाहणाऱ्याच्या लक्षात येत नाही. प्रतिमा सातत्य म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे पाहतो तेव्हा तिचे दृश्य आपल्या डोळ्यांच्या दृक्पटलावर उमटते. ती वस्तू जरी दृष्टीआड झाली, तरी त्या वस्तूची प्रतिमा १/१० (एक छेद दहा) सेकंदापर्यंत तशीच कायम राहते. म्हणून जर एखाद्या हालत्या वस्तूची दर १/१० (एक छेद दहा) सेकंदाच्या अंतराने एकानंतर एक अशी अनेक चित्रे घेतली व त्यांचे १/१० (एक छेद दहा) सेकंदापेक्षा कमी वेळ लावून पडद्यावर प्रक्षेपण केले, तर ती पाहताना आपण निरनिराळी चित्रे पाहतो असे वाटत नाही. एका चित्राची आकृती दृक्पटलावरून नाहीशी होण्याच्या अगोदरच नवे चित्र दिसू लागते आणि त्यामुळे आपणास चित्राची हालचाल हात आहे असे वाटते.

प्रस्तुत नोंदीत चित्रपट तयार करण्याच्या वैज्ञानिक तंत्रासंबंधी विवरण केलेले आहे. चित्रपटाच्या इतर अंगांच्या विवरणाकरिता ‘चित्रपट’, ‘चित्रपट उद्योग’, ‘चित्रपट कथा’, ‘चित्रपटगृह’, ‘चित्रपटनिर्मिती’, ‘चित्रपटनिर्मितिगृह’, ‘चित्रपट संगीत’, ‘चित्रपटातील चमत्कृती दृश्ये’, ‘चित्रपटातील नेपथ्य’ आणि ‘चित्रपटातील रंगभूषा-वेशभूषा’ या नोंदी पहाव्यात.

आ. १. चित्रांच्या चकतीचे खेळणे (थॉमॅट्रोप): (१) चकतीच्या एका बाजूवर काढलेला पिंजरा, (२) चकतीच्या दुसऱ्या बाजूवर काढलेला पक्षी, (३) चकतीच्या दोन्हीकडे बांधलेल्या दोऱ्यांच्या मदतीने चकती जोराने फिरवली तर दिसणारे द्दश्य.

इतिहास : लॅसकॉ या दक्षिण फ्रान्समधील गुहेत आदिमानवाने जी भित्तिचित्रे काढलेली आहेत त्यांत प्राण्यांची हालचाल दाखविण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटले, तरी शास्त्रीय दृष्ट्या १८२४ साली पीटर मार्क रोझे यांनी इंग्लंडमधील रॉयल सोसायटीत प्रतिमा सातत्यावर लिहिलेला प्रबंध वाचल्यापासून चित्रपटाचा इतिहास सुरू झाला असे म्हणता येईल.

प्रतिमा सातत्याचे संशोधन, छायाचित्रणातील प्रगती व कार्बनी रसायनशास्त्रातील प्रगतीमुळे लागलेला पारदर्शक, लवचिक आणि मजबूत फिल्मचा शोध या तीन गोष्टींमुळे चित्रपटाला आजचे स्थान प्राप्त झाले आहे.

यूरोपातील काही देशांत प्रतिमा सातत्यावर अनेक तज्ञ सारखे प्रयोग करीत होते आणि त्यांनी अनेक प्रकारची हालतीचालती क्रिया दाखविणारी गमतीदार साधने बनविली. जॉन हर्शेल यांनी १८२५ साली एक मोठे नाणे टेबलावर उभे करून चटकन फिरवून त्या नाण्याच्या दोन्ही बाजू डोळ्यांना एकाच वेळी कशा दिसतात ते दाखविले. हेन्री फीट्‌न यांनी १८२६ मध्ये याच तत्त्वावर बनविलेले चित्रांच्या चकतीचे खेळणे आ. १

आ. २. चित्राची हालचाल दाखविणारे खेळणे (फेनॅकिस्टोस्कोप)

मध्ये दाखविले आहे. आ. २ मध्ये चित्राची हालचाल होत असल्याचा भास उत्पन्न करणारे १८३२ मध्ये तयार करण्यात आलेले एक खेळणे दाखविले आहे. त्यामध्ये एका तबकडीवर एकाच माणसाची सहा निरनिराळ्या अवस्थांतील चित्रे काढली आहेत. ही तबकडी तिच्या आसावर जोराने फिरविली व तिच्याकडे दुसऱ्या तबकडीच्या खाचांमधून पाहिले म्हणजे फिरणाऱ्या तबकडीवरील चित्रे एकामागून एक दिसतात. त्यामुळे त्या तबकडीवरील माणसाची हालचाल होत आहे असा भास होतो. अशाच प्रकारच्या अनेक प्रयुक्त्या (उदा., झोएट्रोप, प्रॅक्झिनोस्कोप इ.) विविध संशोधकांनी तयार केल्या होत्या. छायाचित्रणाचा शोध लागल्यावर चलच्चित्रपटाचा पूर्व-इतिहास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात छायाचित्र काढवून घेणाऱ्या व्यक्तीला आपले चित्र चांगले उमटण्यासाठी कॅमेऱ्यासमोर बराच वेळ स्तब्ध बसावे लागे. नवी रसायने व चांगली भिंगे उपलब्ध झाल्यावर छायाचित्र घेण्याचा अवधी पुष्कळ कमी होत गेला आणि १८७० साली तर हालत्या वस्तूचीही चांगली छायाचित्रे घेता येऊ लागली. १८७२ साली एडवर्ड माइब्रिज या इंग्रज छायाचित्रकारांनी २४ कॅमेरे एका रांगेत ठेवून पळणाऱ्या घोड्याचे क्रमवार छायाचित्रण केले. त्यांनी प्रत्येक कॅमेऱ्याच्या झडपेला जोडून एक दोरी समोरील भिंतीस बांधली. घोडा धावत असताना या सर्व दोऱ्या एकामागून एक तुटल्या आणि त्याचवेळी कॅमेऱ्यांच्या झडपा उघडून पुन्हा बंद झाल्या. याप्रमाणे त्यांनी पळणाऱ्या घोड्याची २४ छायाचित्रे तयार केली. ही पद्धत आ. ३ मध्ये दाखविली आहे. या प्रयोगापासून हलत्याचालत्या वस्तूच्या छायाचित्रणास सुरुवात झाली, असे म्हणता येईल. सुरुवातीच्या काळात छायाचित्रण काचेच्या पट्टीवरच करीत असत. १८८५ साली जॉर्ज ईस्टमन यांनी साध्या स्थिर छायाचित्रणासाठी सेल्युलॉइडाची फिल्म तयार केली आणि टॉमस एडिसन यांनी १८८८ मध्ये किनेटोग्राफ या नावाचा कॅमेरा

आ. ३. पळणाऱ्या घोड्याची छायचित्रे घेण्याची एडवर्ड माइब्रिज यांची पद्धत : (१) अंतरा-अंतरावर ठेवलेले कॅमेरे, (२) घोड्याच्या मार्गात ताणून धरलेल्या बारिक दोऱ्या.

चलच्चित्रणासाठी तयार केला व त्यात फिल्मचा उपयोग करून ६०० चित्रांची चित्रमालिका तयार केली आणि त्या चित्रमालिकेची दोन्ही टोके जोडून आणि दिव्याचा प्रकाश पाडून एकावेळी एका माणसासच पाहता येईल अशी खिडकी ठेवलेल्या एका कपाटात ती चित्रमालिका फिरवून दाखविली. या कपाटास त्यांनी ‘किनेटोस्कोप’ हे नाव दिले. फ्रान्समधील ल्यून्येअर बंधूंनी याच सुमारास चित्रदीप बनविला आणि एडिसन यांच्या किनेटोग्राफची कल्पना घेऊन कॅमेऱ्याचे व प्रकाशक्षेपकाचे एकत्रित काम करणारे ‘किनेटोग्राफ द प्रोजेक्शन’ असे मिश्र यंत्र तयार केले आणि त्याचे पेटंट घेतले. याच उपकरणाला पुढे ‘सिनेमॅटोग्राफ’ असे म्हणण्यात येऊ लागले आणि या यंत्राने १८९५ साली पॅरिसमध्ये पहिला चित्रपट पडद्यावर दाखविण्यात आला. हा चित्रपट फक्त १ मिनिट चालणारा होता. पुढे ईस्टमन कंपनीने ३५ मिमी. रुंदीची फिल्म तयार केली व तिच्यावर दोन्ही बाजूंना ठराविक अंतरावर ठराविक आकाराची छिद्रे पाडली. या छिद्रांमुळे दंतचक्राच्या साहाय्याने ही फिल्म नियमित वेगाने पुढे सरकविता येऊ लागली. ही छिद्रे दर चौकटीला चार अशा हिशेबाने पाडीत असत व आजही तेच प्रमाण चालू आहे.


चित्रपट दाखविण्याच्या प्रकाशक्षेपकात हळूहळू सुधारणा झाली. १८९५ साली टॉमस अरमट या अमेरिकी गृहस्थांनी ‘माल्टीज क्रॉस’ ही यंत्रणा प्रकाशक्षेपकात बसविली. त्यामुळे चित्रांची फिल्म पुढे सरकत असताना चित्राची चौकट भिंगासमोर आली म्हणजे /२४ सेकंद अगदी स्थिर राहते व याच काळात तेथील चित्र पडद्यावर दाखविले जाते. फिल्म सरकत असताना तिच्यावर ताण पडून ती तुटण्याचा संभव असतो. हा धोका टाळण्यासाठी फिल्म नेहमी सैल राहील अशी विशेष सोयही नंतर करण्यात आली. दुसरी सुधारणा म्हणजे प्रकाशक्षेपकात भिंगासमोर एक फिरणारी झडप बसविण्यात आली. या झडपेचा अर्धा भाग मोकळा असे आणि ती झडप दंतचक्राने फिरवीत असत. त्यामुळे ज्या वेळी चित्र स्थिर ठेवून पडद्यावर दाखवावयाचे असते त्याच वेळी झडपेचा मोकळा भाग चित्रासमोर येई व चित्र सरकत असताना झडपेचा बंद भाग भिंगासमोर येई. त्यामुळे पूर्वी चित्राच्या हालचालीत दिसणारा कंप दिसेनासा झाला. या झडपेच्या वेगात व आकारात पुढे अधिक सुधारणा झाल्या. १९१५ च्या सुमारास चित्रपटाला धंद्याचे रूप येऊ लागले. ईस्टमन कोडॅक कंपनी धंद्यासाठी लागणारी फिल्म आणि इतर साधने पुरवू लागली आणि अनेक मोठ्या शहरांत चित्रपट तयार करणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या. पहिल्या महायुद्धाच्या काळात यूरोपातील चित्रपट धंदा कमी झाला, परंतु अमेरिकेत तो वाढत गेला व हॉलिवुड या स्वतंत्र चित्रपट वसाहतीची स्थापना झाली. तेथे तयार केलेले चित्रपट चांगले लोकप्रिय झाले व १९२० पासून यूरोपातही चित्रपट हे करमणुकीचे चांगले साधन झाले व चित्रपटगृहांचा आकडा व आकार वाढत गेले. १९२४ पर्यंत चित्रपटनिर्मितीत पुष्कळ सुधारणा झाली परंतु चित्रपटातून रंगीत चित्रे दाखविता येत नसत. १९२५ पासून रंगीत चित्रपट तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि घरगुती उपयोगासाठी कमी वजनाचे व सहज हलविता येण्यासारखे कॅमेरे व प्रकाशक्षेपक बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले. पाथे या फ्रेंच कंपनीने ९·५ मिमी. फिल्म वापरावयाचे व कोडॅक कंपनीने १६ मिमी. फिल्म वापरावयाचे कॅमेरे आणि प्रकाशक्षेपक बाजारात आणले व त्यासाठी सुरक्षित प्रकारची फिल्मही तयार केली.

१९३० पर्यंत मूक चित्रपट दाखवीत असताना बहुतेक ठिकाणी चित्रपटाची परिणामकारकता वाढविण्यासाठी पडद्यासमोर नाटकाप्रमाणेच वाद्यवृंद बसवून चित्राला अनुसरून योग्य अशा प्रकारचे संगीत ऐकवीत असत. १९२६ साली एडिसन यांनी मांडलेल्या कल्पनेनुसार चित्र व आवाज एकाच वेळी टिपण्याच्या साधनांचा शोध लागला व लगेच बोलके चित्रपट तयार होऊ लागले व १९३० च्या दरम्यान मूकपटाचा कालखंड संपला. याच सुमारास रंगीत फिल्म तयार करण्याच्या अनेक पद्धती साध्य झाल्यामुळे चांगल्या रंगीत फिल्मही तयार होऊ लागल्या. १९३७ साली वॉल्ट डिझ्नी यांनी पहिला पूर्ण लांबीचा रंगीत व्यंगपट तयार केला. याच काळात १६ मिमी. फिल्म वापरून ८ मिमी. चे चित्रपट तयार करण्यासाठी लहान कॅमेरे आणि प्रकाशक्षेपकही तयार होऊ लागले. १६ मिमी. आणि ८ मिमी. फिल्मवर ध्वनिमुद्रणही करता येऊ लागले व तिचे काम ३५ मिमी. फिल्मप्रमाणेच चांगल्या प्रकारचे होऊ लागले. फिल्मच्या तसेच चित्रपट ज्यांच्यावर दाखवितात त्या पडद्यांच्या आकारासंबंधीही अनेक प्रयोग करण्यात येऊन सिनेरामा, सिनेमास्कोप, इ. रुंद पडद्यांच्या व त्रिमितीचा आभास निर्माण करणाऱ्या विविध पद्धती प्रचारात आल्या. तसेच मूर्त स्वरित ध्वनियोजनेमुळे ध्वनिमुद्रणात अधिक यथार्थता निर्माण झाली. याशिवाय चित्रपट तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यात (उदा., दिवे, याऱ्या इ.) सुधारणा होत गेली.

चित्रपटनिर्मितीची रूपरेखा : चित्रपटनिर्मितीचे कार्य अनेकजणांच्या सहकार्याने करावयाचे असल्यामुळे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, पटकथालेखक, संगीत दिग्दर्शक, कलावंत व तंत्रज्ञ या सर्वांनी संपूर्णपणे सहकार्याने काम करणे आवश्यक असते. कथानक, पटकथा, कलावंतांची निवड, गीते, पार्श्वसंगीत, खर्चाचा अंदाज वगैरे पूर्वतयारी झाल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एकूण कार्यक्रम निश्चित करण्यात येतो. चित्रपटनिर्मितिगृहातील (स्टुडिओतील) चित्रीकरण व बाहेरच्या ठिकाणी करावयाचे चित्रीकरण यांचा तपशील ठरविण्यात येतो. कला दिग्दर्शकाला यानुसार कोणते देखावे कधी आणि कोठे उभारावयाचे यांसंबंधी सूचना देण्यात येतात. छायाचित्रकाराच्या मदतीने प्रकाशयोजना, कॅमेऱ्याच्या हालचालीस लागणारी जागा इ. तपशील ठरविण्यात येतो. रंगीत चित्रपटासाठी पात्रांची वेशभूषा व आजूबाजूची रंगसंगती यांचा तपशील रंग दिग्दर्शक निश्चित करतो.

चित्रपटात आपण ज्या क्रमाने दृश्ये पाहतो त्याच क्रमाने ती चित्रित केली जात नाहीत. चित्रीकरणाच्या सोयीनुसार ती मागे-पुढे घेतली जातात. संपूर्ण चित्रपटाच्या कामाच्या आराखड्याचे विभाग पाडून त्यांना क्रमांक देण्यात येतात. प्रत्येक चित्रणाच्या वेळी एका लहानशा लाकडी फलकावर चित्रणाचा प्रसंग, चित्रण क्रमांक वगैरे माहिती लिहिण्यात येते. या फलकावर एक दांडा बिजागरी पद्धतीने जोडलेला असतो. हा फलक कॅमेऱ्याच्या समोर धरून त्यावरील दांडा आपटला म्हणजे मोठा आवाज होतो व तीच खूण समजून छायाचित्रण व ध्वनिमुद्रण यांचे काम एकदम सुरू करतात. या फलकाला ‘फटमार’ म्हणतात. रोजचे चित्रणाचे काम झाल्यावर फिल्म संस्करण विभागाकडे पाठविण्यात येते. संस्करण केलेल्या फिल्ममधील दिग्दर्शकाने निवडलेल्या भागाची सम प्रत बनवून ती संकलनासाठी पाठवितात. या सम प्रतीची आणि तिच्याबरोबरच घेतलेल्या ध्वनिमुद्रणाची जुळवाजुळव करून तयार केलेली मिश्रफिल्म दिग्दर्शक व इतर संबंधित तज्ञांपुढे छोट्या चित्रपटगृहात प्रक्षेपित करून दाखवितात. तिची तपासणी झाल्यावर कोणता भाग कायम ठेवावयाचा याचा निर्णय घेतात.

चित्रणाच्या कामाबरोबरच ध्वनिमुद्रणाचे कामही चालू ठेवावे लागते. संभाषणाचे ध्वनिमुद्रण नेहमीच योग्य होते असे नसल्यामुळे काही वेळा ते परत घ्यावे लागते. मुख्य संभाषणाबरोबरच पार्श्वसंगीत व पार्श्वगायनाचे निराळे ध्वनिमुद्रण करण्यात येते.

जसजशी कामाची प्रगती होते तसतशी संकलक निरनिराळ्या वेळी घेतलेल्या चित्रणाची कथानकाप्रमाणे जुळवाजुळव करतो. चित्रपटाचे छायाचित्रण, संभाषण, पार्श्वसंगीत, चमत्कृती यांची एकत्रित सलग प्रत तयार करून संकलक ती संस्करण विभागाकडे पाठवितो. ही प्रत तयार करताना निरनिराळ्या प्रकाश गाळण्या वापरून प्रेक्षकांच्या डोळ्यांस त्रास होणार नाही अशा प्रकारे खबरदारी घेतात. अशा प्रकारे तयार झालेली प्रत दिग्दर्शक व निर्माता यांच्यासाठी प्रक्षेपित करून दाखवितात आणि तीत जरूर त्या सुधारणा करून नवी सुधारित प्रत तयार करतात. ही प्रत सरकारी परीक्षण करणाऱ्या मंडळाकडे परवानगीसाठी पाठवितात. परीक्षण मंडळाकडून आलेल्या प्रतीत जरूर त्या सुधारणा करून त्या प्रतीवरून संपूर्ण चित्रपटाची नवी व्यस्त प्रत बनवितात आणि तीवरून प्रत्यक्ष चित्रपटगृहांत दाखविण्याच्या अनेक प्रती तयार करतात. [→ चित्रपटनिर्मिति].

चित्रपटनिर्मितीगृह व त्याचा परिसर : चित्रपटनिर्मितीसाठी नुसत्या चार भिंती आणि त्यावर छप्पर असलेली जागा पुरत नाही.त्यासाठी आजूबाजूला बरीच उघडी जागा आणि चित्रपटनिर्मितीसाठी लागणाऱ्या इतर उपयुक्त गोष्टींची सोय असावी लागते. या परिसराचा आकार ठरलेला नसतो. ज्या प्रमाणात सवलती उपलब्ध असतील, त्या प्रमाणात त्याचे आकारमान असते. आदर्श चित्रपटनिर्मिती परिसरात पुढील प्रमुख गोष्टी असतात.


चित्रपटनिर्मितिगृह : चित्रपटाच्या चित्रणासाठी ज्या इमारतीत देखावे उभारतात तिला चित्रपटनिर्मितिगृह म्हणतात. एका परिसरात अशी लहान मोठी चार-पाच निर्मितीगृहे असतात. ही निर्मितीगृहे सर्व दृष्टींनी जितकी परिपूर्ण असतील तेवढा त्यांचा दर्जा उच्च समजतात. निर्मितीगृहाचे आकारमान साधारणपणे २० ते ७५ मी. लांब, १५ ते ४० मी. रुंद व ८ ते १३ मी. उंच एवढे असते. त्यामुळे एखादा साधा रस्ता किंवा भव्य महालदेखील निर्मितिगृहात उभारता येतो.

पूर्वी निर्मितिगृहाचे छप्पर भरपूर उजेडासाठी काचेचे करीत असत पण प्रकाशासाठी विजेचा उपयोग होऊ लागल्यापासून यात बदल झाला. हल्ली छपराच्या खाली लाकडी पट्‌ट्यांचे जाळे पसरलेले असते. त्यामुळे अशा निर्मितीगृहात देखावे उभारण्याकरिता व त्यासाठी प्रकाशयोजना करण्यास मदत होते. याशिवाय आतील चारी बाजूंना सज्जे ठेवलेले असतात. बोलपटाच्या निर्मितीस सुरुवात झाल्यापासून निर्मितिगृहांची रचना ध्वनिरोधक (बाहेरील अनावश्यक ध्वनीला रोध करणारी) करतात.

आ. ४. चित्रपटनिर्मितिगृहे व त्याच्या परिसराच्या आराखड्याचा एक नमुना : (अ, आ, इ, ई, उ, ऊ) चित्रपटनिर्मितिगृहे. (१) वेशभूषा विभाग, (२) कर्मशाला, (३) कपड्यांचे गुदाम, (४) रंगभूषा विभाग, (५) छोटे गुदाम, (६) विजेच्या साहित्याचे गुदाम, (७) शिल्पकार, रंगारी इ., (८) सुतार जोडकाम, (९) यंत्रशाला, (१०) संच ठेवण्याचे गुदाम, (११) फर्निचर गुदाम, (१२) संकलन विभाग, (१३) लहान चित्रपटगृह, (१४) ध्वनिमुद्रण विभाग, (१५) फिल्म संस्करण विभाग, (१६) वाहने ठेवण्याची जागा, (१७) बगीचा, (१८) आत जाण्याचा मार्ग, (१९) बाहेर जाण्याचा मार्ग.

कला विभाग : चित्रपटनिर्मितीसाठी जे देखावे उभारावे लागतात त्यांसाठी निरनिराळ्या व्यवसायांतील लोक एकत्र येतात. त्यात चित्रकार, रंगारी, शिल्पकार, गवंडी, सुतार इत्यादिकांचा समावेश होतो. हे सर्व लोक कला दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करतात. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कर्मशाला या विभागात असते.

विद्युत्‌ विभाग : चित्रपटनिर्मितीसाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे विद्युत्‌ विभाग नेहमी सुसज्ज ठेवावा लागतो. चित्रपटनिर्मितीसाठी जे अनेक प्रकारचे व असंख्य दिवे लागतात ते दिवे, त्यांस लागणारी इतर उपकरणे, नियंत्रक, विद्युत्‌ चलित्रे, संवाहक केबली इ. या विभागात ठेवतात. या सामग्रीचा उपयोग करण्यासाठी व तिची देखभाल करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचा या विभागात समावेश होतो.

छायाचित्रण विभाग : या विभागासाठी स्वतंत्र जागा असते. प्रमुख छायाचित्रकार, त्याचे मदतनीस व त्यांची व्यावसायिक साधने म्हणजे कॅमेरे, याऱ्या, तिपाई घोडे इत्यादींचा समावेश या विभागात होतो.

ध्वनिमुद्रण विभाग : या विभागात ध्वनिमुद्रणाची सर्व प्रकारची साधने व ती चालविणारे आणि सांभाळणारे तंत्रज्ञ व कर्मचारी यांचा समावेश होतो.

रंगभूषा व वेशभूषा विभाग : या विभागात नटनट्यांना लागणारे कपडे तयार करतात व जपून ठेवले जातात. या विभागातच केशभूषा व रंगभूषा करणारे कलावंत आपापली कामे करतात.

संकलन विभाग : या विभागात संस्करण झालेली चित्रित फिल्म संकलनासाठी पाठवितात. संकलनानंतर ध्वनिमुद्रित प्रतीचे याच ठिकाणी एका छोट्या चित्रपटगृहात प्रक्षेपण करता येते व त्याची चाचणी घेता येते.

फिल्म संस्करण विभाग : चित्रपटनिर्मितीच्या सर्व केंद्रांत फिल्म संस्करण विभाग असतोच असे नाही. फिल्मवर संस्करण करणाऱ्या स्वतंत्र संस्थाही आहेत.

चमत्कृती विभाग : काही ठिकाणी चमत्कृतींच्या चित्रणासाठी स्वतंत्र चित्रपटनिर्मितिगृह असते.

या सर्व सोयींबरोबरच ज्या निर्मात्यांनी भाड्याने एखादे चित्रपटनिर्मितिगृह घेतले असेल त्यांची कार्यालये व त्यांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी चित्रपटनिर्मितीगृहाच्या मुख्य प्रशासकाचे कार्यालय असते.

चित्रपटनिर्मितिगृहाच्या परिसरात झाडे, बगीचे आणि बरीच उघडी जागा मुद्दाम ठेवलेली असते. चित्रपटात बऱ्याच वेळा एखाद्या तळ्याचा देखावा उभारावा लागतो म्हणून बहुतेक निर्मितिगृहांच्या परिसरात एखादे तळे बनविलेले असते. त्यातील पाणी केव्हाही काढून टाकता येते किंवा वाढविता येते.

याशिवाय निरनिराळी स्वतंत्र गुदामे असतात. त्यांत कापड, पडदे, लाकूड, फर्निचर, रंग व त्यासाठी लागणारी तेले, देखाव्यांचे नवे-जुने मंच, छायाचित्रणाची फिल्म इ. सामान साठवितात. अशा गुदामांना केव्हाही आग लागण्याची शक्यता असल्यामुळे सर्वत्र अग्निशामक सामग्री बसविलेली असते.

चित्रपटांचे काम रात्रंदिवस चालू असल्यामुळे परिसरात एक विश्रांतिगृह सतत चालू असते.

भारतात मुंबई, पुणे, कोईमतूर, बंगलोर, त्रिवेंद्रम, कोल्हापूर, कलकत्ता, मद्रास येथील चित्रपटनिर्मितीगृहे सुप्रसिद्ध आहेत [→ चित्रपटनिर्मितिगृह]. सर्वसाधारण चित्रपटनिर्मितिगृहांच्या परिसराच्या आराखड्याचा एक नमुना आ. ४ मध्ये दाखविला आहे.

चलचित्रणाची कच्ची फिल्म : चलच्चित्रणाची फिल्म एका पारदर्शक, लवचिक व लांबलचक आधारपट्टीवर प्रकाशाला संवेदनशील असलेल्या रसायनाचा (पायसाचा) पातळ थर देऊन तयार करतात.

आधारपट्टी : आधारपट्टी बनविण्यासाठी पूर्वी ॲसिटोन व सेल्युलोज नायट्रेटाचा उपयोग करीत असत. सेल्युलोज नायट्रेटापासून बनविलेली फिल्म अत्यंत ज्वालाग्रही असते. तरीदेखील चित्रपटनिर्मितीच्या पहिल्या पन्नास वर्षांपर्यंत हीच फिल्म वापरण्यात आली. १९५० सालानंतर सेल्युलोज ट्राय-ॲसिटेट, सेल्युलोज ॲसिटेट प्रोपिऑनेट वा यांसारख्याच कमी ज्वालाग्राही पदार्थांपासून ती बनवू लागले आहेत व तिच्या निर्मितीची पद्धत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्थांनी ठरविलेली आहे.


छायाचित्रणाच्या प्रथमावस्थेत अशी फिल्म काचेच्या लांबट तक्त्यावर सेल्युलोज नायट्रेटापासून तयार केलेल्या चिकट पदार्थाचा पातळसा थर लावून तयार करीत असत, पण जेव्हा लांब फिल्मची जरूरी भासू लागली तेव्हा अनेक प्रयोग करण्यात आले व त्यातून आ. ५ मध्ये दाखविलेल्या पद्धतीचा जन्म झाला. त्यामुळे आधारपट्टी जलद गतीने बनू लागली व उत्पादनही वाढले.

सेल्युलोज नायट्रेट व ॲसिटोन यांपासून तयार केलेला चिकट विद्राव एका लांब व बारीक फट असलेल्या चपट्या नलिकेतून एका आडव्या आसावर फिरणाऱ्या, अतिचमकदार व गरम केलेल्या पिंपाच्या बाहेरच्या बाजूवर सारखा पसरला जातो. पिंप सारखे फिरत असल्यामुळे व विद्राव चटकन वाळणारा असल्यामुळे अर्ध्या फेऱ्यातच त्यावर आधारपट्टी तयार होते आणि ती पिंपापासून लगेच अलग केली जाते. ही अलग झालेली आधारपट्टी पूर्णपणे वाळलेली नसते म्हणून तिला एका गरम बंद पेटीतून फिरवून काढतात. त्यामुळे आधारपट्टी बनविण्यासाठी वापरलेला विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) पूर्णपणे उडून जातो. ही गरम पेटी बंद असल्यामुळे उडून गेलेल्या विद्रावकाचा बराच भाग परत मिळू शकतो. अशा प्रकारे तयार झालेली आधारपट्टी गुंडाळल्यावर चिकटू नये म्हणून त्यावर गुंडाळण्यापूर्वी एका रसायनाचा एक पातळ थर देतात व नंतर ती एका मोठ्या चक्रीवर गुंडाळतात.

आ. ५. आधारपट्टी तयार करण्याची पद्धत : (१) चिकट विद्रावाचा साठा, (२) बारीक फट असलेली चपटी नलिका, (३) अतिचमकदार गरम पिंप, (४) विद्रावक परत गोळा करण्याची जागा, (५) तयार होणारी आधारपट्टी, (६) आधारपट्टीला रसायनाचा पातळ थर लावणारे यंत्र, (७) तयार झालेली आधारपट्टी गुंडाळून ठेवण्याची चक्री.

आधारपट्टीची निर्मिती ठरविलेल्या मानकाप्रमाणे तयार करण्यासाठी कारखान्यांत स्वच्छता व यंत्राचा वेग काटेकोर पाळावा लागतो. यंत्राचा वेग कमी जास्त करून पाहिजे त्या जाडीची आधारपट्टी तयार करता येते. नेहमी वापरात असणाऱ्या आधारपट्टीची जाडी ०·१३ मिमी. असते. नायलॉनाचा वापर करून अधिक पातळ आधारपट्टी तयार करता येते. संपूर्ण चक्रीवर ८२० मी. लांब व १·३५ मी. रुंद आधारपट्टी गुंडाळून एक वेटोळे बनवितात. त्याला ‘लोध्या’ (जंबो) म्हणतात.

आ. ६. पायस लेपनाची पद्धत : (१) आधारपट्टीची चक्री, (२) पायसाने भरलेले पात्र, (३) थंडगार मार्ग, (४) विद्युत् चलित्र, (५) सुकविण्याचा मार्ग, (६) तयार झालेली फिल्म गुंडाळून ठेवण्याची चक्री.

पायस लेपन : आधारपट्टीवर प्रकाश संवेदी पायसाचे लेपन केल्यावर ती फिल्म छायाचित्रणास योग्य बनते. हे पायस लेपनाचे काम अत्यंत महत्त्वाचे व गुंतागुंतीची असते. त्याची साधारण पद्धत आ. ६ मध्ये दाखविली आहे. आधारपट्टीवर सरळ पायसाचे लेपन करून चालत नाही. त्यासाठी लेपनापूर्वी आधारपट्टीवर काही विशेष प्रक्रिया कराव्या लागतात. आधारपट्टीवर पायस नीट चिकटून रहावे म्हणून तिच्या एका बाजूवर पातळ रसायनाचे आवरण देतात व दुसऱ्या बाजूवर गुंडाळताना होणाऱ्या घर्षणामुळे स्थिरविद्युत्‌ भार साठू नये म्हणून एका संवाहक पदार्थाचे लेपन देतात. काही प्रकारच्या आधारपट्ट्यांवर यानंतर एक प्रकारच्या काळ्या रंजकाचे लेपन करतात. त्यामुळे फिल्मचे प्रकाशन (प्रकाश पडण्यासाठी उघडी ठेवण्याची क्रिया, उद्‌भासन) करताना फिल्मवर निर्माण होणाऱ्या आकृतीचे दुसऱ्या बाजूकडून परावर्तन होत नाही व आकृती स्पष्ट दिसते. शेवटी दोन्ही बाजूंच्या कडा थोड्याशा कापून काढतात आणि दोन्ही कडांवर उठावरेखन करून त्या थोड्या जाड करतात. या जाड कडांमुळे आधारपट्टीचा पृष्ठभाग हाताळताना खराब होत नाही.

अशा प्रकारे तयार केलेल्या आधारपट्टीवर प्रकाश संवेदी पायसाचे लेपन करतात. ही व यापुढील सर्व क्रिया संपूर्ण काळोखात व अत्यंत स्वच्छ वातावरणात कराव्या लागतात. यानंतर आधारपट्टी पातळसर प्रकाश संवेदी पायसाच्या टाकीतून एकाच बाजूने बुडवून काढतात. त्यामुळे तिच्या एका बाजूवर थर चढविला जातो. हा थर सगळीकडे एकाच जाडीचा असावा लागतो म्हणून त्याची काटेकोर तपासणी करावी लागते. प्रकाश संवेदी पायसामध्ये जिलेटीन वापरतात व ते भिजण्यासाठी थर चढविलेली आधारपट्टी थंडगार मार्गावरून नेऊन नंतर ती सुकविण्याच्या खोलीतून नेतात. फिल्म सुकल्यावर पायस घट्ट बनून ते आधारपट्टीला चिकटून राहते. हे सर्व कार्य यंत्राने होत असल्यामुळे एका टोकास आधारपट्टीचे वेटोळे लावल्यावर दुसऱ्या टोकास काही वेळातच प्रकाश संवेदी फिल्मचे वेटोळे तयार होऊ लागते. याच पद्धतीने एका नंतर एक असे निरनिराळ्या पायसांचे सहा-सात थर देऊन रंगीत कामाची फिल्म तयार करतात.

वरील पद्धतीने तयार केलेल्या रुंद फिल्मच्या वेटोळ्यामधूनच ७०, ३५, १६, ८ मिमी. रुंदीच्या पट्ट्या यंत्राने कापून तयार करतात. फिल्म कापताना थोडाही फरक होऊन किंवा त्याचा जराही कचरा पडून चालत नाही. अशा प्रकारे तयार झालेल्या पट्‌ट्यांना एका किंवा दोन्ही कडांवर छिद्रे पाडण्यात येऊन त्यांचे ठराविक लांबीचे तुकडे करतात व ते योग्य चक्रीवर चढवून त्यावर काळ्या कागदाचे वेष्टन घालून पत्र्याच्या डब्यात भरतात व त्यावर कापडी चिकटपट्टी लावून मोहोरबंद करतात. शेवटी या डब्यावर फिल्मचे माहितीपत्रक चिकटवितात. फिल्म तयार करताना मधूनमधून काही तुकडे कापून त्यांची चाचणी घेतात व त्या चाचणीच्या पट्ट्या पुढील कृतीसाठी जपून ठेवतात.

चलच्चित्रण कॅमेरा : कॅमेरा हे चित्रपटनिर्मितीसाठी लागणारे एक प्रमुख साधन आहे. कॅमेऱ्याचे अनेक प्रकार व आकार आहेत. कॅमेऱ्याचे भिंग, वेग, फिल्म साठविण्याची मर्यादा, एकूण वजन वगैरे अनेक गोष्टींवर कॅमेऱ्याची किंमत अवलंबून असते.

चलच्चित्रण कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य त्याची झडप व फिल्म पुढे सरकविण्याची यंत्रणा यांमध्ये असते. साध्या कॅमेऱ्याप्रमाणेच फिल्मची एक चौकट भिंगासमोर येऊन स्थिर होते व त्याच वेळी झडप उघडते. वस्तूपासून येणारे प्रकाशकिरण भिंगातून जाऊन वस्तूची प्रतिमा फिल्मवर उमटते. यानंतर झडप बंद होते व फिल्म पुढे सरकते व दुसरी चौकट भिंगासमोर येऊन फिल्म थांबते. अशा क्रमाने कॅमेऱ्याचे काम चालते. बहुतेक चित्रपटनिर्मितीगृहांमधील कॅमेऱ्यात ३३५ मी. लांबीची फिल्म वापरता येते. जसजसे तिचे चित्रण होत जाते तसतशी ती दुसऱ्या रिकाम्या चक्रीवर गुंडाळली जाते.


कॅमेऱ्यासाठी साधे, झूम (केंद्रांतर बदलता येणारे) व रुंदकोनी (रुंद कोनातील, सु. १०० पर्यंत दृश्य टिपणारे) अशी निरनिराळ्या प्रकारची भिंगे मिळतात, त्यांपैकी जरूरीप्रमाणे योग्य ते भिंग वापरता येते. ज्या प्रकारचे भिंग वापरले असेल त्याप्रमाणे कॅमेऱ्याचा दृश्यदर्शक (चित्रित करावयाच्या दृश्याची जुळवाजुळव करण्यास मदत करणारे साधन) जुळवून घ्यावा लागतो. भिंगात बसवलेले संयोजनक्षम छिद्र लहान मोठे करून फिल्मचा प्रकाशनकाल ठरविता येतो. कॅमेरा नेहमी दर सेकंदाला २४ चौकटी या वेगाने चालवितात. विशिष्ट कामासाठी वेग कमीजास्त करावा लागतो. मर्यादित उपयोगासाठी खास बनविलेले कॅमेरे वापरतात. शीघ्र गती व मंद गती दाखविण्याचे खास कॅमेरे असतात.

आ. ७. चलचित्रण कॅमेऱ्याचे मुख्य प्रकार : (अ) स्टुडिओ कॅमेरा, (आ) फील्ड कॅमेरा, (इ) काँबट कॅमेरा.

मुख्य प्रकार : चलच्चित्रण कॅमेरे फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, जपान व इतर काही देशांत तयार करतात. स्टुडिओ कॅमेरा, फील्ड कॅमेरा व काँबट कॅमेरा असे कॅमेऱ्यांचे तीन मुख्य प्रकार आहेत. ते आ. ७ मध्ये दाखविले आहेत. याशिवाय १६ आणि ८ मिमी. फिल्मसाठी लहान कॅमेरेही मिळतात. स्टुडिओ कॅमेरा हा चित्रपट तयार करण्याच्या बंदिस्त जागेत वापरण्यासाठी बनविलेला असतो. त्यामध्ये पुष्कळ मोठी फिल्म ठेवता येते. त्यावर ध्वनिरोधक यंत्रणा आणि आवरण घातलेले असते. तो मजबूत असून बराच वजनदार असतो व त्याची किंमतही

आ. ८. चलच्चित्रण कॅमेऱ्याची आतील रचना : (१) कोरी फिल्म गुंडाळलेली चक्री, (२) प्रकाशित झालेली फिल्म गुंडाळून ठेवण्याची चक्री, (३) फिल्मला ओढणारे दंतचक्र, (४) कॅमेऱ्याचे छिद्र, (५) भिंग संच, (६) झडप, (७)फिल्म थोडा वेळ धरून ठेवणारी खीळ, (८) फिल्म खाली सरकविणारा आकडा.

जास्त असते. स्टुडिओ कॅमेऱ्याची आतील रचना आ. ८ मध्ये दाखविली आहे. या कॅमेऱ्यात एक चित्र घेण्यासाठी  /४८ सेकंद लागतो. फील्ड कॅमेरा हा बाहेरील उघड्या जागेवरील चित्रणासाठी बनविलेला असतो व तो बराच हलका असतो. तो नेहमी तिपाई घोड्यावर बसविलेला असतो, परंतु काही वेळा हातात धरूनही वापरण्यात येतो. त्याचे भिंग चांगले असेल आणि त्यावर ध्वनिरोधक आवरण घातले, तर त्या कॅमेऱ्याचे काम स्टुडिओ कॅमऱ्याप्रमाणेच उच्च दर्जाचे करता येते. वरील दोनही कॅमेरे विद्युत्‌ चलित्राने (मोटरने) चालविता येतात. काँबट कॅमेरा हा हातात धरून चित्रण करण्यासाठी बनविलेला असतो. तो फील्ड कॅमेऱ्यापेक्षाही हलका असून हाताने चालविता येतो. त्याला चांगले भिंग लावले, तर त्याचे कामही स्टुडिओ कॅमेऱ्याइतके चांगले करता येते. काँबट कॅमेऱ्यामध्ये ‘कॅम्प्लेक्स’ हा फ्रेंच कॅमेरा उत्तम समजण्यात येतो. १६ मिमी.च्या कॅमेऱ्यात ३५ मिमी. कॅमेऱ्याचेच सर्व गुण असावे लागतात. त्याचा दृश्यदर्शक मोठा असला, तर तो चांगले काम देतो. काही १६ मिमी. कॅमेरे ३५ मिमी. कॅमेऱ्याइतकेच जड असतात. स्टुडिओ कॅमेरे फार अवजड असतात परंतु ते तिपाई घोड्यावर बसविले, तर ते सहज हाताळता येतात आणि चित्रण निर्दोष होते. हल्ली प्रचारात असलेले बहुतेक सर्व कॅमेरे विजेच्या चलित्राने किंवा स्प्रिंगेने चालविता येतात.

आ.९. तिपाई घोड्याला जोडावयाचा ‘त्रिकोन’.

साहाय्यक साधने : कॅमेऱ्याचा उपयोग करताना काही साहाय्यक साधने वापरली, तर चित्रीकरण अधिक चांगले होते. अशा साधनांत ‘ब्लिम्प’ हे एक महत्त्वाचे साधन आहे. बोलपटनिर्मितीच्या वेळी नको असलेले आवाज टाळावे लागतात. काही स्टुडिओ कॅमेरे चालू असताना त्यांचा आवाज होतो म्हणून त्यांवर एक ध्वनिरोधक झाकण घालतात त्याला ब्लिम्प म्हणतात. कॅमेऱ्यावर लावण्यासाठी आणखी एक प्रकारचे झाकण वापरतात. त्याला ‘बार्ने’ म्हणतात. ते जलरक्षक आणि विद्युत्‌ निरोधक अशा लवचिक पदार्थांपासून कोणत्याही प्रकारच्या कॅमेऱ्यासाठी बनवता येते. शिवाय ते विजेने गरम करता येत असल्यामुळे अतिथंड हवेत कॅमेऱ्याची हालचाल करण्यासाठी तो गरमसर ठेवता येतो. चलच्चित्रण कॅमेरा उभा ठेवण्यासाठी साध्या कॅमेऱ्याला लागतो तसा तिपाई घोडा वापरतात पण तो मजबूत व दणकट असून त्याचे कोणतेही भाग पाहिजे तसे सहज हालविता किंवा जुळविता येतात. ज्या भागावर कॅमेरा बसवितात त्याला कॅमेरा बैठक म्हणतात व तिचा उपयोग कॅमेऱ्याला वर, खाली व बाजूला फिरविण्यासाठी करतात. कॅमेऱ्याचा तिपाई घोडा गुळगुळीत जागेवरून घसरू नये म्हणून तो उभा ठेवण्यासाठी भोके असलेल्या तीन लाकडी किंवा चामड्याच्या पट्‌ट्यांचे एक घडीचे साधन बनवितात त्याला ‘त्रिकोन’ म्हणतात.


आ. १०. कॅमेरा यारी (बूम)

चित्रपटनिर्मितीगृहातील चित्रणासाठी कॅमेरा इकडून तिकडे फिरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाडीला डॉली किंवा ट्रॉली म्हणतात. डॉली रुळावरून फिरवितात. चित्रणासाठी कॅमेरा वर, खाली व बाजूला ज्या साधनाने फिरवितात त्याला व्हेलॉसिटर म्हणतात. त्याने कॅमेरा / मी.पासून ३ मी.पर्यंत सहज वर खाली करता येतो. याची यंत्रणा मजबूत असावी लागते.

‘बूम’ या यारीसारख्या यंत्राने कॅमेऱ्यासकट तीन चार माणसे एकत्रित बसवून सहज वर खाली सरकविता येतात. हे यंत्र आकाराने बरेच मोठे असते व त्याने कॅमेरा जमिनीपासून १२ मी. उंच नेता येतो. याची हालचाल विजेच्या चलित्राने करतात. यारीच्या कोणत्याही हालचालीत कॅमेऱ्याची बैठक नेहमी क्षितिजसमांतर राहील अशी यारीची रचना केलेली असते.

फिल्म संस्करण : बऱ्याच चित्रपटनिर्मितिगृहांजवळ स्वतःचा फिल्म संस्करण विभाग नसतो त्यामुळे फिल्म संस्करण, छपाई आणि त्यांसंबंधी लागणाऱ्या इतर कामासाठी त्यांना आपली फिल्म स्वतंत्रपणे काम करणाऱ्या ‘फिल्म संस्करण केंद्रा’कडे पाठवावी लागते.

फिल्म संस्करण विभागावर व्यस्त आणि सम फिल्मचे संस्करण व सम फिल्मची छपाई या मुख्य कामांशिवाय अनेक संबंधित मदत कार्ये पार पाडण्याची जबाबदारी असते. त्यात प्रदर्शनपूर्व प्रतींची छपाई हे एक मुख्य काम असते.

फिल्मच्या छपाईसाठी शुद्ध हवा, नियंत्रित तापमान व आर्द्रता यांची जरूरी असते. त्याचप्रमाणे संस्करणासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे व विद्रावाचे तापमान, शुद्धता व प्रवाह काटेकोरपणे सांभाळावे लागतात.

संस्करण विभागाच्या कार्यास छायाचित्रकाराने घेतलेल्या व्यस्त फिल्मच्या संस्करणाने सुरुवात होते. त्यानंतर व्यस्त फिल्मवरून ताबडतोब सम प्रत तयार करतात. तिला त्वर्य प्रत (रश प्रिंट) म्हणतात. या संस्करणासाठी स्वतंत्र स्वयंचलित यंत्रे असतात व त्यांतून दर मिनिटाला १५ ते ३५ मी. फिल्मचे संस्करण होते. संपर्क छपाई करावयाच्या (व्यस्त व सम प्रतींचे प्रकाश संवेदी पृष्ठभाग एकमेकांना चिकटवून ठेवून व व्यस्त प्रतीवरून प्रकाशन करून सम प्रत मिळविण्याच्या) यंत्रावर लगेच सम प्रत बनवितात. ही छपाई नेहमीच्या यंत्रावर दर मिनिटाला अंदाजे ४० मी. या वेगाने करता येते. या प्रतीवर ध्वनिमुद्रण नसते.

त्वर्य प्रतीच्या संकलनानंतर ती प्रत संस्करण विभागाकडे परत पाठवितात, त्यावरून पहिल्या व्यस्त फिल्ममधून निवडलेला भाग निराळा काढतात व तो जोडून एक एकत्रित व्यस्त प्रत बनवितात. तीवर खुणेसाठी नाव व अनुक्रमांक घालतात. याप्रमाणे जमत गेलेल्या सर्व व्यस्त फिल्मांचे तुकडे कथानकाच्या क्रमाप्रमाणे जोडतात. या जोडफिल्मला अग्रपट्टा म्हणतात. या अग्रपट्ट्यावरून एक प्रधान सम प्रत तयार करतात. कोणत्याही कारणाने जर मूळ व्यस्त प्रत खराब झाली, तर प्रधान सम प्रतीचा उपयोग करून दुसरी व्यस्त प्रत (डूप) तयार करतात. यावेळीच ध्वनिमुद्रण विभागात ध्वनीची एकत्रित केलेली चुंबकीय ध्वनिपट्टी तयार होते व तीवरून प्रकाशीय ध्वनिमुद्रण पट्टी तयार करतात व ती संस्करणासाठी पाठवितात. या संस्कारित ध्वनिपट्टीवरून एक सम प्रत तयार करतात. ती चित्रित प्रतीला जोडून चालवितात. यानंतर योग्य त्या सुधारणा करून उत्तम चित्रप्रत व ध्वनिप्रत छापण्यासाठी तयार होतात. रंगीत चित्रपट छापताना पुष्कळ सुधारणा कराव्या लागतात आणि त्या कामासाठी विशेष तंत्रज्ञांची मदत घेतात. या तंत्रज्ञांच्या सल्ल्यानुसार तयार केलेली फिल्म निर्मात्याकडे संमतीसाठी पाठवितात आणि ती पसंत पडल्यावर त्या विभागाचे काम पूर्ण होते व पसंत झालेल्या भागाची व्यस्त फिल्म प्रदर्शनपूर्व प्रती छापण्यासाठी छपाई विभागाकडे पाठवितात. छपाई विभागात प्रदर्शनपूर्व प्रती भराभर छापण्यासाठी स्वतंत्र यंत्रसामग्री असते. तेथे चित्रप्रत आणि ध्वनिप्रत एकत्रित करून छापतात, तिला मीलनप्रत म्हणतात.

व्यस्त प्रतीवरून सम प्रत तयार करण्यासाठी (१) खंडित संपर्क पद्धत, (२) खंडित प्रकाशीय पद्धत, (३) अखंडित संपर्क पद्धत व (४) अखंडित प्रकाशीय पद्धत अशा चार मुख्य पद्धती आहेत. यापद्धती आ. ११ मध्ये दाखविल्या आहेत.

आ.११. फिल्म छपाईचे चार प्रकार : (अ) खंडित संपर्क पद्धत, (आ) खंडित प्रकाशीय पद्धत, (इ) अखंडित संपर्क पद्धत, (ई) अखंडित प्रकाशीय पद्धत : (१) संस्कारित व्यस्त फिल्म, (२) कोरी सम फिल्म, (३) छापलेली सम फिल्म, (४) भिंग संच, (५) उघडझाप झडप, (६) फिल्म काही वेळ धरून ठेवण्याचा आकडा.

या पद्धतीत दोन तत्त्वांच्या दोन जोड्या करून उपयोग करतात. पहिली जोडी अखंडित व खंडित पद्धत आणि दुसरी जोडी संपर्क व प्रकाशीय पद्धत. अखंडित पद्धतीत दोन्ही फिल्म एकत्र एकाच वेगाने सरकतात, तर खंडित पद्धतीत दोन्ही फिल्म कॅमेऱ्यातील यंत्रणेप्रमाणे दर चित्रचौकटीला अल्प काळ थांबून पुढे सरकतात. त्याचप्रमाणे संपर्क व प्रकाशीय पद्धतींत दोन्ही फिल्म एकत्र एकाच वेगाने सरकतात. प्रकाशीय पद्धतीत व्यस्त फिल्मवरील चित्र आकारात फरक करून किंवा त्याच आकारात सम फिल्मवर छापतात.

एका चित्रपटाच्या अनेक प्रती पाहिजे असल्यास मूळ व्यस्त फिल्म दर वेळी न गुंडाळता एकाच वेळी चार सम प्रती छापण्याची सामग्री उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मूळ सम फिल्मवरून अनेक व्यस्त फिल्म बनवितात व त्या निरनिराळ्या ठिकाणी पाठवितात.

काळ्या-पांढऱ्या फिल्मप्रमाणेच रंगीत फिल्मच्याही अनेक प्रती लागतात. रंगीत फिल्म तयार करण्याच्या अनेक पद्धती असल्यामुळे त्या छापण्याच्या पण अनेक पद्धती आहेत. रंगीत फिल्म छापण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अत्यंत काळजी घ्यावी लागते. रंगीत फिल्मचे रंग टिकाऊ नसून ते कालावधीने फिक्के होतात. त्यासाठी टिकाऊ व्यस्त प्रत बनविण्याकरिता काळ्या-पांढऱ्या फिल्मवरून तीन मूळ रंगांच्या स्वतंत्र व्यस्त फिल्म बनवितात व त्यांवरून नंतर रंगीत सम फिल्म बनवितात.


मूळ रंगीत प्रतीवरून अनेक प्रती काढण्यासाठी आता एक नवीन पद्धतीची फिल्म मिळते. या फिल्मवर साध्या प्रकाशीय पद्धतीने फिल्मची छपाई करतात. या फिल्मचे संस्करण नव्या विशेष पद्धतीने करावे लागते.

काही ठिकाणी संस्करण विभागाला जोडून संकलन विभाग व फिल्मचे प्रक्षेपण करण्यासाठी एक लहानसे चित्रपटगृह असते.

आ. १२. फिल्म संस्करण यंत्राचा आराखडा : (१) अंधारी टोक-फिल्म भरण विभाग, (२)संस्करण विभाग, (अ) विकाशन, (आ) खळबळणे, (इ) चित्रस्थिरीकरण, (ई) धुलाई, (३) शुष्कक कपाट, (४) संस्कारित फिल्म गुंडाळण्याची चक्री-प्रकाश टोक.

फिल्मचे संस्करण करण्याच्या यंत्राचे पुढील प्रमुख विभाग असतात. (१) भरण विभाग : या ठिकाणी संस्करणासाठी आणलेली फिल्म यंत्रातील भरणपट्टीस जोडली जाते. (२) संस्करण विभाग : यात फिल्मवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी टाक्या व त्यांत चक्रांवरून फिल्म पुढे पुढे जाण्यासाठी तयार केलेला पट्ट्यांचा सांगाडा असून येथे फिल्मचे पद्धतशीर संस्करण होऊन शेवटी ती धुतली जाते. (३) शुष्कक कपाट : धुतलेली फिल्म येथे सुकविण्यात येते. (४) संस्कारित फिल्म विभाग : संस्कारित फिल्म या ठिकाणी चक्रीवर गुंडाळली जाते. हे विभाग आ. १२ मध्ये दाखविले आहेत.

कॅमेऱ्यात प्रकाशित केलेल्या फिल्मला उजेड न लागता ती भरण विभागातील भरणपट्टीस जोडावी लागते म्हणून हा भाग अंधाऱ्या खोलीतच असतो. वेळप्रसंगी वापरण्यासाठी या खोलीत सुरक्षादीप (ज्यांच्या प्रकाशाचा फिल्मवर परिणाम होत नाही असे दिवे) ठेवलेले असतात. भरणपट्टी आधी संस्करित केलेल्या फिल्मच्या शेवटच्या टोकास जोडलेली असून संस्करणानंतर ती फिल्म काढून घेताना भरणपट्टी संस्करण यंत्रात तशीच ठेवतात. भरण विभागातील काम अंधारातच करतात म्हणून त्याला संस्करण यंत्राचे ‘अंधारी टोक’ म्हणतात.

प्रकाशित फिल्म भरणपट्टीस जोडल्यावर ती पुढे पुढे सरकू लागते. ती फिरताना सरळ रहावी म्हणून टाकीतील चक्रास जड वजन लावतात. प्रथम ती विकाशन (प्रकाशित फिल्मवरील चित्र दृश्यमान करण्यासाठी करण्यात येणारी रासायनिक प्रक्रिया) करणाऱ्या रसायनाच्या टाकीतून फिरू लागते. या टाकीत ती किती वेळ ठेवावयाची यावर तिचा टाकीत फिरण्याचा वेग ठरवतात. यानंतर ती हळूवार खळबळून धुणाऱ्या टाकीत येऊन पुढे सरकते. तेथून ती चित्रस्थिरीकरण (फिल्मवरील प्रकाश संवेदी रसायन काढून टाकून चित्राचे स्वरूप कायम करण्याची प्रक्रिया) करणाऱ्या रसायनाच्या टाकीत येते व त्यात फिरत फिरत ठराविक वेळानंतर धुलाईसाठी साध्या पाण्याच्या टाकीतून फिरते. ही धुतलेली फिल्म नंतर शुष्कक कपाटातून फिरते. या कपाटातून फिरताना तिला हिसके दिले जातात व कपाटाच्या शेवटच्या भागात गरम हवेचा फवारा चालू असल्यामुळे फिल्ममधील ओलावा संपूर्णपणे निघून जातो. अशा रीतीने सुकविलेली फिल्म शेवटी चक्रीवर गुंडाळली जाते. हे काम प्रकाशातच करतात म्हणून संस्करण यंत्राच्या या टोकास ‘प्रकाश टोक’ म्हणतात. चक्रीवर सु. ३००–६०० मी. फिल्म गुंडाळली जाते. मध्यम आकारमानाच्या फिल्म संस्करण यंत्रात एकावेळी सु. २०० मी. फिल्म असू शकते.

आधुनिक संस्करण यंत्रात सर्व क्रिया कपाटासारख्या दिसणाऱ्या बंद पेटीत करतात. त्यामुळे संस्करण विभागाच्या खोलीत अंधार नसतो. प्रकाशित फिल्म भरणपट्टीस जोडण्याचे कामही काही विशिष्ट यंत्रणेमुळे उजेडात करता येते. त्याचप्रमाणे संस्करणासाठी फिल्म रसायनाच्या टाक्यांतून न फिरवता तीवर रसायनांचे फवारे उडवितात.

फिल्मच्या विकाशनासाठी तिच्यावर जितक्या क्रिया कराव्या लागतात तितक्या टाक्यांतून ती फिरवावी लागते. रंगीत फिल्मच्या संस्करणासाठी सात ते बारा टाक्या लागतात. संस्करणासाठी लागणारी टाकीतील रसायने थोड्याशा वापराने काही प्रमाणात निष्क्रीय होतात, म्हणून त्या रसायनांची ठराविक वेळानंतर तपासणी करून नवी भर घालावी लागते. त्याचप्रमाणे फिल्मची चाल अबाधितपणे चालू ठेवणे महत्त्वाचे असते. ती तुटू नये म्हणून संभाव्य अडचणींवर लक्ष ठेवावे लागते. जर छायाचित्रकारास संभाव्य धोक्याची कल्पना असेल, तर तो त्या फिल्मवर नोंद करून मग संस्करणासाठी पाठवितो. या विभागात स्वच्छतेला फार महत्त्व असते.

टाकीतील रसायनाचे तापमान, त्यात फिल्म सारखी फिरत राहिल्यामुळे वाढण्याची शक्यता असते म्हणून संस्करणाचे सर्व काम वातानुकूलित जागेत करावे लागते. तेथील तापमान १५° –१७°  से. इतके ठेवावे लागते. रंगीत फिल्मच्या संस्करणाच्या वेळी तापमानात चढ-उतार झाला, तर रंगात फरक पडतो म्हणून तापमान फार कटाक्षाने सांभाळावे लागते.

मुख्य चित्रणाच्या पूर्वी फिल्मच्या सुरुवातीच्या काही थोड्या लांबीच्या पट्टीवर नमुन्याचे चित्रण करतात. या तुकड्याचे संस्करण मुख्य फिल्मच्या संस्करणाच्या प्रारंभी करतात व त्याच्या अनुषंगाने मुख्य फिल्मच्या संस्करणाचे तापमान ठरवितात.

प्रकाश योजना : चित्रपट धंद्याच्या सुरुवातीच्या काळात बहुतेक चित्रपट नैसर्गिक प्रकाशात घेत असत म्हणून चित्रपटनिर्मितीगृहाच्या छपरावर काचेची कौले बसवीत असत. नंतर चांगला प्रकाश देणारे विजेचे दिवे उपलब्ध होऊ लागल्यामुळे त्यांचा उपयोग छायाचित्रणासाठी होऊ लागला. चित्रपटनिर्मितीगृहात मोठ्या आकारमानाचे क्षेत्र प्रकाशमान करावे लागत असल्यामुळे अधिक प्रकाश देणारे दिवे वापरण्यात येऊ लागले.

चित्रपटनिर्मितिगृहात जमिनीवर वापरावयाचे बहुतेक दिवे त्यांच्या आधारखुंटांसकट (स्टॅंडसकट) जड असल्यामुळे ते इकडून तिकडे फिरविण्यासाठी त्यांना खाली चाके असतात. या दिव्यांच्या आधारासाठी एकात एक जाणाऱ्या नळ्या वापरतात व त्यामुळे ते पाहिजे तितक्या उंचीवर उभे करता येतात. काही दिवे चाके असलेल्या तिपाई घोड्यावर पक्के बसविलेले असतात. काही दिवे वरून खाली तर काही खालून वर न्यावे लागत असल्यामुळे ते कप्पीच्या साह्याने सरकवतात. त्याचप्रमाणे काही दिवे नेहमी वरच्यावरच फिरवावे लागतात म्हणून ते कायम वरच्या बाजूस लावलेल्या दांडीवर सरकविता येतील असे बसवतात. दिव्यांची दिशा पाहिजे तशी व पाहिजे तेव्हा बदलण्यासाठी ते सोयीच्या जागी बसवतात. त्यामुळे चित्रपटनिर्मितीगृहात चित्रणाच्या वेळी पाहिजे तशी प्रकाशयोजना करता येते.

चित्रपटनिर्मितीगृहात चित्रणासाठी दोन प्रकारचे दिवे वापरतात. एक प्रदीप्त तंतूचा व दुसरा कार्बनी प्रज्योतीचा (कार्बन विद्युत्‌ अग्रामध्ये होणाऱ्या प्रखर विद्युत्‌ विसर्जनाचा). प्रज्योतीचे दिवे १०,००० वॉटपर्यंत शक्तीचे मिळतात. ते मुख्य प्रकाशासाठी वापरतात.


रंगीत चित्रपटासाठी नैसर्गिक पांढऱ्या उजेडासारखा प्रकाश मिळण्यासाठी निराळ्या प्रकारचे कार्बनी प्रज्योत दिवे प्रचारात आले. परंतु रंगीत फिल्मची बनावट सुधारल्यामुळे हल्ली कार्बनी प्रज्योत दिवे फक्त भव्य मंचासाठी वापरतात. पूर्वी ३,२००° के. इतके वर्ण तापमान असलेले दिवे वापरण्यात येत असत (प्रदीप्त कृष्ण पदार्थाचे म्हणजे सर्व तरंगलांब्यांच्या प्रकाशाचे उत्सर्जन करू शकणाऱ्या आदर्श काळ्या पदार्थाचे दिलेल्या वर्णाकरिता असणारे तापमान म्हणजे वर्ण तापमान होय के. म्हणजे केल्व्हिन तापक्रम, ०° के. = -२७३° से.). हे दिवे वापरून वापरून आतून काळे होत असत, त्यामुळे त्यांचा प्रकाश हलके हलके कमी होत असे. १९६५ नंतर टंगस्टन-हॅलोजन दिवे वापरात येऊ लागले. त्यांची कार्यक्षमता ५०० तासांच्या वर रहात असून ते वापरल्यानंतर काळपट पडत नाहीत. असले दिवे किंमतीने दीड ते अडीच पट महाग असतात. त्यांचा आकार लहान असतो. विद्युत्‌ दाब कमी जास्त करून त्यांचा प्रकाश कमीजास्त करता येतो. या दिव्यांचे अनेक आकार व प्रकार असतात. त्यांतील काही रंगीत छायाचित्रणासाठी वापरतात. काही दिवे ६,०००° के. इतके प्रखर असतात म्हणून त्यांवर प्रकाश गाळणी वापरून ते ३,२००° के. इतक्या वर्ण तापमानाचे करावे लागतात.

दिवे अनेक प्रकारचे व आकारांचे असले, तरी त्यांचे दोनच प्रमुख गट असतात. एक अधिक क्षेत्रावर प्रकाश देणारे विस्तार दीप (फ्लड लाइट) व दुसरे लहान कक्षेत तीव्र प्रकाश देणारे एकाग्र दीप (स्पॉट लाइट). विस्तार दीप एक वा अनेक दिव्यांचा मिळून केलेला असतो. काहींत प्रत्येक दिव्यास एक तर काहींत सर्व दिवे मिळून एक परावर्तक वापरतात. लांब टंगस्टन-हॅलोजन दिवा विस्तार दीप म्हणून वापरतात.

एकाग्र दीपासाठी नेहमी एकच दिवा वापरतात. हा दिवा एका चकचकीत अन्वस्तीय (पॅराबोलिक) परावर्तकासमोर बसवितात व त्याच्या पुढे एक संघनक (प्रकाश केंद्रित करणारा भिंग संच) लावतात. मोठ्या आकारमानाच्या एकाग्र दीपासाठी साध्या संघनकाऐवजी फ्रेनेल भिंग (अनेक लहान भिंगे एकत्र करून ज्याचा पृष्ठभाग तयार केलेला आहे असे कमी केंद्रांतराचे पण आकारमानाने मोठे असलेले भिंग) वापरतात व काहींत दिवा पुढे-मागे करून पाहिजे त्या तीव्रतेचा वा कोनाचा प्रकाशझोत मिळवितात. कार्बनी प्रज्योत दिव्याच्या साह्याने अतितीव्र प्रकाश मिळू शकतो व ते एकाग्र दीपासाठी वापरतात.

आ. १३ मध्ये दिव्यांचे व त्यांच्या समोर लावण्याच्या झापडांचे मुख्य प्रकार दाखविले आहेत.

या बहुतेक दिव्यांपुढे झापडे, दरवाजे, प्रकाश गाळण्या, दुधी काचा इ. लावण्याची सोय असते. याशिवाय कॅमेऱ्यावर त्यांचा सरळ उजेड पडू नये म्हणून लाकडाचे तक्ते वापरतात.

चित्रपटनिर्मितिगृहात व बाह्य चित्रणाच्या वेळी रुपेरी कागद लावलेले परावर्तक तक्ते छायेच्या बाजूस परावर्तित प्रकाश टाकण्यासाठी वापरतात.

छायाचित्रकाराला समोरील दृश्यात गोलाकार व त्रिमिती दिसेल अशा रीतीने प्रकाशयोजना आखावी लागते. त्याचप्रमाणे दृश्यातील मुख्य भागाकडे प्रेक्षकांचे लक्ष ठेवून चित्र चौकटीतील इतर भागाच्या रचनेची प्रकाशयोजना करावी लागते. फिल्मच्या संवेदनशीलतेप्रमाणे प्रकाशाची तीव्रता कमी-जास्त करावी लागते.

आ.१३. दिव्यांचे व त्यांच्या समोर लावण्याच्या झापडांचे प्रमुख प्रकार : (१) विस्तार दीप, (२) एकत्रित विस्तार दीप, (३) एकाग्र दीप, (४) व (५) झापडांचे प्रकार.

चित्रपटनिर्मितीगृहात वापरण्यात येणाऱ्या निरनिराळ्या दिव्यांसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते व दिवे कसेही विनासायास फिरविता यावे म्हणून वीज पुरविणाऱ्या लांब केबल वापराव्या लागतात. नैसर्गिक प्रकाश खात्रीशीर नसल्याने त्यावर अवलंबून न राहता बाह्य दृश्यांची स्टुडिओत मांडणी करून त्यांचे मंचावर चित्रण करतात म्हणून वीज व दिवे जास्त प्रमाणात लागतात.

खऱ्याखुऱ्या घरात जर रंगीत चित्रपट घ्यावयाचा असेल, तर परिस्थिती अधिक बिकट होते. प्रत्येक खिडकीचा व भिंतीचा विचार करून दिव्यांचा व प्रकाश गाळण्यांचा वापर करावा लागतो.

बाह्य चित्रणासाठी काही वेळा विद्युत्‌ निर्मिती करणारे यंत्र (जनरेटर)जवळ असल्यास छायेच्या बाजूला योग्य तसा प्रकाश देता येतो. हल्ली अगदी छोटे विस्तार दीप मिळतात व ते ‘सनगन’ या नावाने ओळखले जातात, त्यांचा उपयोग बऱ्याच ठिकाणी करतात. ह्या दिव्यांना लागणारी बाहेरील पुरवठ्याची वीज न मिळाल्यास निकेल-कॅडमियम विद्युत्‌ घटमाला कंबरपट्ट्याला बांधून चित्रणाचे काम करतात.

आ. १४. ध्वनिमुद्रण पद्धती (अ) बदलणारी घनता पद्धत, (आ) बदलणारे क्षेत्रफळ पद्धत, (इ) चुंबकीय पद्धत.

ध्वनिमुद्रण : एडिसन यांनी चित्रपटनिर्मिती संशोधनाच्या वेळेसच चलच्चित्रण आणि ध्वनी यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. १९२० साली विजेच्या साहाय्याने ध्वनिमुद्रण करण्याचा शोध लागल्यामुळे परिस्थिती बदलली. यानंतर १९२८-२९ च्या सुमारास प्रकाशाच्या साहाय्याने चित्रपटाच्या फिल्मवर ध्वनिमुद्रण करण्याच्या शोधामुळे चित्रपटसृष्टीत महत्त्वाची क्रांती झाली. प्रकाशीय ध्वनिमुद्रणासाठी प्रामुख्याने दोन पद्धती वापरल्या जातात. त्यांतील एक बदलणारी घनता पद्धत (व्हेरिएबल डेन्सिटी, व्ही. डी.) आणि दुसरी बदलणारे क्षेत्रफळ पद्धत (व्हेरिएबल एरिया, व्ही. ए.) या नावाने ओळखली जाते. पहिल्या पद्धतीत ज्याप्रमाणे ध्वनीचा चढ-उतार होईल त्या प्रमाणात फिल्मवर पडणाऱ्या प्रकाशाची घनता कमीजास्त होते आणि दुसरीत प्रकाशाचे क्षेत्रफळ ध्वनीप्रमाणे कमीजास्त होते (आ. १४).

हल्ली चित्रपटासाठी ‘चुंबकीय ध्वनिमुद्रण’ पद्धतीचा जास्त प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे. निरनिराळ्या चुंबकीय फितींवर घेतलेले ध्वनी एकाच फितीवर मुद्रित केल्यानंतर त्यांची ध्वनिपट्टी प्रकाशीय ध्वनिमुद्रण पद्धतीने फिल्मवर तयार करतात. त्यामुळे ३५ मिमी. किंवा दुसऱ्या कोणत्याही रुंदीच्या फिल्मवर ध्वनिमुद्रण करणे सोपे जाते.


प्रकाशीय ध्वनिमुद्रण करण्याची यंत्रे पूर्वी बरीच अवजड असत. ती एका जागेवरून दुसरीकडे नेताना अत्यंत काळजीपूर्वक न्यावी लागत असत. शिवाय या पद्धतीने केलेले ध्वनिमुद्रण फिल्मचे संस्करण केल्याशिवाय ऐकता येत नसे. पण आता चुंबकीय फितीवरील ध्वनिमुद्रणाची सामग्री अत्यंत सुटसुटीत बनली असून या पद्धतीने केलेले ध्वनिमुद्रण लगेच ऐकता येते.

चित्रणाच्या वेळी ध्वनिग्राहक बोलणाऱ्याच्या शक्य तितका जवळ ठेवावा लागतो आणि बोलणारा माणूस फिरत असल्यास ध्वनिग्राहकही त्याच्याबरोबर फिरता ठेवावा लागतो. याकरिता एका लांब दांडीवर ध्वनिग्राहक बसवून तो योग्य त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करतात.ध्वनिमुद्रणासाठी कोणत्या प्रकारचा ध्वनिग्राहक वापरला आहे यावर ध्वनिमुद्रणाची गुणवत्ता अवलंबून असते. चित्रपटनिर्मितिगृहात आणि उघड्यावर ध्वनिमुद्रण करताना नको असलेल्या आवाजाचे मुद्रण टाळावे लागते. तसेच काही वेळा उघड्यावरील संभाषणाचे मुद्रण चित्रपटनिर्मितीगृहात करून नंतर ते चित्रपट्टीस जोडतात.

संभाषणाच्या वेळी गळ्यात अडकवण्याजोगा ध्वनिग्राहक वापरतात. तो सहज दिसत नाही. हा ध्वनिग्राहक एका छोट्या रेडिओ प्रेषकास जोडलेला असतो. रेडिओ प्रेषकाने प्रेषित केलेले संभाषण जवळच ठेवलेल्या रेडिओ ग्रहणीवर ऐकू येते व फीतमुद्रकावर मुद्रित केले जाते.

बोलपटासाठी छायाचित्रण व ध्वनी नेहमी एकाच वेळी घेतात असे नाही. संभाषणाचे छायाचित्रण व निराळ्या पट्टीवर ध्वनिमुद्रण एकाच वेळी करतात. पण संगीताच्या बाबतीत आधी ध्वनिमुद्रण चुंबकीय फितीवर करतात व नंतर छायाचित्रण करताना ते संगीत वाजवून त्याप्रमाणे अभिनय करणारी माणसे ओठांची हालचाल करतात.

संभाषण व पार्श्वसंगीत निरनिराळ्या फिल्मवर मुद्रित करतात व शेवटी ते एकत्र करतात. या एकत्रित केलेल्या ध्वनिमुद्रणाची फिल्म व छायाचित्रणाची फिल्म नंतर एकत्रित करतात तिला ‘मीलन प्रत’ म्हणतात. अशा प्रतीवर छायाचित्राच्या चौकटीच्या शेजारीच तेथील ध्वनी नसतो. तो ३५ मिमी. फिल्मच्या बाबतीत छायाचित्राच्या चौकटीनंतर २० चौकटी सोडून जोडलेला असतो. हे आंतरराष्ट्रीय प्रमाण ठरलेले आहे.

छायाचित्रणाजवळच ध्वनिमुद्रण करता येऊ लागल्यामुळे ३५ मिमी. फिल्मचा छायाचित्रणाचा भाग कमी करून तो ध्वनिमार्गासाठी वापरण्यात आला. त्यामुळे फिल्मवरील छायाचित्राचे आकारमान बदलले म्हणून नव्या आकारमानाचे कॅमेरे व प्रकाशक्षेपक यंत्रे बनवावी लागली. त्याचप्रमाणे फिल्म दाखविण्याचा वेग बदलावा लागला. तो दर सेकंदास १६ वरून २४ चौकटींवर नेण्यात आला त्यामुळे गाण्यातील व बोलण्यातील सर्व चढ-उतार स्पष्टपणे मुद्रित करता येऊ लागले.

प्रत्येक दृश्याच्या चित्रणाच्या प्रारंभी फटमार फलकाचा जो आवाज ध्वनिपट्टीवर नोंदवतात त्याचा उपयोग संकलनाच्या वेळी करतात.

मूर्तस्वरित ध्वनी : आपल्या दोन कानांमुळे आपल्याला ध्वनीची दिशा कळते आणि त्याचा उपयोग आपल्याला नित्याच्या व्यवहारात आपल्याला नकळत होतो. एकाच वेळी कमीजास्त प्रमाणात ऐकू येणाऱ्या चहूकडील असंख्य ध्वनींवरून आपण आपल्याला पाहिजे असलेल्या ध्वनीची दिशा आणि अंतर समजू शकतो, याला मूर्तस्वरित ध्वनिग्रहण म्हणतात.

चित्रपट अधिक परिणामकारक बनविण्यासाठी मूर्तस्वरित ध्वनीची त्याला जोड देतात. नेहमीच्या बोलपटाच्या फिल्मवर एकच ध्वनिमार्ग असतो पण मूर्तस्वरित ध्वनिमुद्रण केलेल्या चित्रपट्टीवर चार किंवा पाच ध्वनिमार्ग असतात. चित्रपटनिर्मितिगृहात तीन किंवा चार निरनिराळ्या ठिकाणी बसवलेल्या ध्वनिग्राहकांद्वारे निरनिराळे ध्वनिमुद्रण करून फिल्मच्या छपाईच्या वेळी ते ध्वनिमार्ग ठराविक जागी छापतात व चित्रपटाच्या प्रक्षेपणाच्या वेळी प्रत्येक ध्वनिमार्गासाठी स्वतंत्र असलेल्या ध्वनिक्षेपकातून त्यांचे प्रक्षेपण करतात. यामुळे पडद्यावर ज्या ठिकाणी संभाषण करणारी व्यक्ती असेल तेथील ध्वनिक्षेपक कार्यान्वित होतो.

आ. १५. मूर्तस्वरित ध्वनी फिल्म व ध्वनिक्षेपकांची मांडणी : (१) चित्र चौकट, (२)चुंबकीय ध्वनिमार्ग, (३) ध्वनिक्षेपक, (४) पडदा.

आ. १५ मध्ये मूर्तस्वरित ध्वनी फिल्मवरील ध्वनिमार्ग व ध्वनिक्षेपकांची मांडणी दाखविली आहे. ज्या चित्रपटगृहात फक्त एकाच ध्वनिक्षेपकाची सोय असते त्यांच्यासाठी निराळा एकत्रित ध्वनिमार्ग फिल्मवर असतो. अर्थात त्याने मूर्तस्वरित ध्वनी मिळू शकणार नाही. फिल्मवर ध्वनिमार्ग चुंबकीय व प्रकाशीय पद्धतीने मुद्रित करतात [→ ध्वनिमुद्रण व पुनरुत्पादन].

संकलन साहित्य : व्यस्त फिल्मवरून जी पहिली सम प्रत छापतात (म्हणजे त्वर्य प्रत) ती संकलन विभागात पाठवितात. मूळ व्यस्त फिल्म कधीच हाताळत नाहीत. ती हाताळल्यास तीवर चरे पडण्याचा किंवा तिला कचरा लागण्याचा संभव असून तीवरून केलेल्या सम प्रती साहजिकच खराब येतील. चित्रीकरण करताना चित्रभाग तांत्रिक कारणामुळे क्रमवार घेतलेले नसल्यामुळे फटमार फलकावरील आकड्याप्रमाणे ते वेगवेगळे करावे लागतात. त्यातून प्रथम उपयुक्त व निकामी चित्रभागाचे तुकडे वेगळे काढतात. त्याचप्रमाणे ध्वनिमुद्रणाच्या सम प्रतीतून उपयुक्त भाग निवडावा लागतो. पार्श्वगीताच्या धनिमुद्रणाची फिल्म व त्या अनुषंगाने घेतलेल्या निरनिराळ्या चित्रभागांची जुळवणी

करावी लागते.

चित्रपटात स्थल, काल किंवा दृश्य यांमध्ये बदल करताना प्रेक्षकाच्या डोळ्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून जरूर तेथे चित्रमिश्रण, चित्रअस्त, विभागीय चित्रण किंवा अशाच इतर पद्धतींचा उपयोग करावा लागतो. शिवाय कथानक कंटाळवाणे न वाटता ते प्रभावी व्हावे म्हणून चित्रपटाच्या भागांच्या लांबीवर सारखे लक्ष ठेवावे लागते. याशिवाय चित्रपटारंभी परीक्षण मंडळाचा परवाना जोडणे, चित्रपटाचे नाव, निर्मात्याचे व निर्मिती संस्थेचे नाव, कलावंतांची व तंत्रविशारदांची नामावली जोडणे इ. नित्याची कामे करावी लागतात. हे सर्व काम करण्यासाठी खास साधने संकलन विभागात असतात.


फिल्म मोजणी यंत्र : चित्रपटाची जशी प्रगती होत जाते तसतशा तयार झालेल्या फिल्मच्या चक्‌ऱ्या संकलन विभागाकडे येऊ लागतात. सुरुवातीपासून एकूण फिल्मची लांबी ठरवून दिलेल्या प्रमाणात असावी म्हणून नव्याने येणाऱ्या फिल्मांच्या चक्‌ऱ्यांची मोजणी करावी लागते. या कामासाठी एक स्वतंत्र यंत्र असते. त्यात फिल्म जोडून यंत्र फिरविल्यावर फिल्मच्या लांबीचा आकडा एका लहानशा चौकटीत दिसतो. यंत्राच्या मुख्य चाकाचा एक फेरा झाला म्हणजे ३५ मिमी. रुंदीची फिल्म ३० सेंमी. पुढे सरकते. या चाकाला ६४ दाते असल्यामुळे फिल्म १६ चौकटी पुढे सरकल्या असा त्याचा अर्थ होतो. एका सेकंदाला २४ चौकटी या हिशोबाने फिल्म चालविण्याची कालगणना करता येते. याच पद्धतीने चालणारी १६ मिमी. फिल्मची मोजणी यंत्रेही असतात. एकत्रित मोजणी यंत्राला एक ते चार चक्‌ऱ्या लावता येतात.

संकलन चित्रदर्शक : फिल्मची मोजणी करताना चित्रदर्शकाने तिची तपासणी करता येईल असे हे यंत्र असते. चित्रपटाच्या पडद्यावर जशी फिल्म दिसते तशीच पण लहान आकारात ती या यंत्रात एका दुधी काचेवर दिसते. या यंत्राचे वैशिष्ट्य असे की, यातील फिल्म पाहिजे तेव्हा उलट्या दिशेनेही फिरविता येते आणि पाहिजे तेथे थांबवता येते.

मूव्हीओला : हे एक अत्यंत गुंतागुंतीचे संकलन यंत्र असते. ते विद्युत्‌ चलित्राने चालते. यात ध्वनिमुद्रित फिल्म व चित्र फिल्म एकाच वेळी लावता येते व पाहिजे असल्यास त्यांतील कोणतीही एक फिल्म चालू किंवा बंद करता येते. फिल्म तपासणीसाठी हे यंत्र सावकाश किंवा जलद गतीने चालविता येते. एकाच वेळी तीन फिल्मांचे संकलन करता येईल इतक्या गुंतागुंतीचे यंत्र उपलब्ध आहे. यावर सिनेमास्कोपचे भिंग लावून सिनेमास्कोप फिल्म तपासता येते. थोड्याशा सुधारणा करून हेच यंत्र ३५ किंवा १६ मिमी. फिल्मसाठी वापरता येते. यामध्ये ज्या फिल्मचे ध्वनिमुद्रण चुंबकीय ध्वनिपट्टीवर केले आहे अशी फिल्म व दुसरी प्रकाशीय ध्वनिपट्टी एकाच वेळेला लावून त्या तपासता येणारी यंत्रे उपलब्ध आहेत. ध्वनिसंकलनात काही वेळा परत ध्वनिमुद्रण करावे लागते किंवा नवा ध्वनिमार्ग तयार करावा लागतो. यावेळी प्रत्यक्ष चित्रणाच्या वेळी जे आवाज ध्वनिमुद्रित केलेले नसतात ते घालता येतात. उदा., बंदुकीचे, घोड्याच्या टापांचे आवाज इत्यादी.

जोडणी यंत्र : फिल्मची तपासणी झाल्यावर तिचे निवडलेले तुकडे एकापुढे एक जोडावे लागतात म्हणून एक जोडणी यंत्र वापरतात. त्यात फिल्मची टोके योग्य जागी कापली जाऊन ती फिल्म संयोजक पदार्थाने (सिमेंटाने) चिकटविली जाते. ३५ मिमी., १६ मिमी. व ८ मिमी. फिल्मच्या जोडणीसाठी स्वतंत्र जोडणी यंत्रे वापरावी लागतात. अशा यंत्रावर फिल्म जोडण्यासाठी साधी चिकटपट्टीही वापरता येते.

रंगीत चित्रपट : चित्रपटनिर्मितीच्या जवळजवळ सुरुवातीपासूनच तो रंगीत स्वरूपात तयार करण्याचा प्रयत्न काही तंत्रज्ञांनी केला होता. काही संस्था काळ्या-पांढऱ्या चित्रपटाच्या फिल्मची एक एक चौकट पारदर्शक रंगांनी हाताने रंगवीत असत. अर्थात ही पद्धत अत्यंत कष्टमय असून समाधानकारक नव्हती. त्यानंतर १९२० सालात साधी फिल्म रात्रीच्या प्रसंगासाठी निळ्या रंगात व आगीच्या प्रसंगासाठी लाल रंगात बुडवून काढीत असत. अर्थात खऱ्या अर्थी हे रंगीत चित्रपट म्हणता येणार नाहीत पण त्यामुळे लोकांची रंगीत चित्रपटाची आवड दिसून येते.

फ्रान्समध्ये ल्वी ड्यूक्स हाऊरन यांनी सु. १८६६ साली रंगीत फिल्म तयार केली. एकाच पायसात साधी फिल्म रंगीत बनविण्याचे घटक त्यांनी वापरले होते पण इतर काही साधनांच्या अभावी त्यांना पाहिजे तेवढे यश आले नाही. १९०६ साली चार्ल्स अर्बन आणि जी. ॲल्‌बर्ट स्मिथ यांनी दोन रंगांत नव्या पद्धतीने रंगीत फिल्म तयार केली. तिला ‘किनेमाकलर’ फिल्म म्हणत. यासाठी एका सेकंदाला ३२ चौकटी या वेगाने नेहमीची काळी-पांढरी फिल्म वापरण्यात आली पण चित्र घेण्याच्या वेळी आणि दाखविण्याच्या वेळी एक चित्र सोडून दुसऱ्या चित्रासाठी हिरव्या व लाल प्रकाश गाळण्यांचा उपयोग केला जात असे. या पद्धतीने चित्रपटात नैसर्गिक रंगांचा भास होत असे. अर्बन व स्मिथ यांनी १९११ सालच्या दिल्ली दरबाराचा चित्रपट या पद्धतीने घेतला होता. त्यांच्या या व इतर चित्रपटांचे जर्मनी, अमेरिका व इतर देशांत प्रदर्शन झाले व कित्येक देशांत त्यांच्या पद्धतीची नक्कल करण्यात आली. पण पहिल्या महायुद्धामुळे या पद्धतीच्या पुढील कामात खंड पडला. १९२२ साली टेक्निकलर पद्धतीचा रंगीत चित्रपट तयार झाला. यानंतर सिनेकलर, आग्फाकलर, गेव्हाकलर, फेरानिआकलर इ. पद्धती पुढे आल्या व सध्या ‘ईस्टमनकलर’ रंगीत फिल्म आघाडीवर आहे.

आ. १६. टेक्निकलर कॅमेऱ्याची रचना : (१) भिंग संच, (२) काचेचा घन, (३) लोलकांचे समाईक पृष्ठ, (४) कॅमेऱ्याचे पहिले रंध्र, (५) हिरव्या रंगासाठी फिल्म, (६) कॅमेऱ्याचे दुसरे रंध्र, (७) निळ्या रंगासाठी फिल्म, (८) लाल रंगासाठी फिल्म.

ॲन्‌स्कोकलर, कोडॅक्रोम इ. रंगीत छायाचित्रणाच्या पद्धतीत तीन पूरक रंगांच्या प्रकाश गाळण्यांद्वारा चित्रण करून एक रंगीत व्यस्त फिल्म बनवितात आणि या पद्धतीने काढलेल्या व्यस्त फिल्मवरून संपूर्ण रंगीत सम फिल्म तयार करतात. परंतु टेक्निकलर फिल्म शिलामुद्रणाच्या पद्धतीप्रमाणे पारदर्शक फिल्मवर तीन रंगांत छापतात. इतर पद्धतींत फिल्मवरील पायसाबरोबर रंजकद्रव्ये बनविणारे जोड घटक वापरतात व ते जोड घटक फिल्मच्या संस्करणाच्या वेळी काळे-पांढरे चित्र बदलून त्या जागी रंगीत चित्र तयार करतात.

टेक्निकलर कंपनीचे रंगीत चित्रपट बनविण्याचे प्रयत्न १९१५ पासून सतत चालू होते आणि तिने १९२२ च्या सुमारास एका निराळ्या तंत्राचा वापर करून रंगीत चित्रपट तयार करून दाखविला. टेक्निकलर चित्रपट अतिशय यशस्वी व लोकप्रिय झाले.

टेक्निकलर चित्रपटनिर्मितीसाठी त्या कंपनीने आ. १६ मध्ये दाखविल्याप्रमाणे एक स्वतंत्र कॅमेरा बनविला होता. त्याचे वैशिष्ट्य असे की, त्यावर एका भिंगातून एकाच वेळी एका कर्णावर विभागून दोन लोलक तयार केलेल्या काचेच्या घनाच्या साह्याने तीन फिल्म, निळ्या, लाल व हिरव्या या रंगांच्या प्रकाश गाळण्यांद्वारे प्रकाशित करीत असत. या रंगविलगीकरणात व्यस्त चित्रपट्टीद्वारे आणखी तीन सम चित्रपट्ट्या तयार करीत व त्यांचे रूपांतर ठशामध्ये (रसायनाच्या साह्याने) करून त्यांच्या पूरक रंगाने म्हणजे पिवळ्या, निळसर हिरव्या व तांबूस जांभळ्या रंजकांनी पारदर्शक फिल्मवर एका स्वयंचलित यंत्राने छापत असत. यासाठी जी पारदर्शक फिल्म वापरीत असत तीवर प्रारंभीच ध्वनिमुद्रण करीत असत. टेक्निकलर पद्धतीची रूपरेखा खालील तक्त्यात दिली आहे.


टेक्निकलर पद्धतीची रूपरेखा

रंगविलगीकरण

तीन व्यस्त चित्रपट्ट्या (निळी, लाल व हिरवी)

वरील तीन व्यस्त चित्रपट्ट्यांवरून तीन सम चित्रपट्ट्या

सम चित्रपट्ट्यांचे ठशांत रूपांतर (निळा, लाल व हिरवा)

नवी अप्रकाशित फिल्म

ध्वनिमार्ग छपाई

ध्वनिमार्ग संस्करण

निळ्या रंगाच्या ठशावरून – पिवळ्या रंगाची छपाई….. त्यानंतर धुलाई व सुकविणे.

लाल रंगाच्या ठशावरून – निळसर हिरव्या रंगाची छपाई….. त्यानंतर धुलाई व सुकविणे.

हिरव्या रंगाच्या ठशावरून – तांबूस जांभळ्या रंगाची छपाई…. त्यानंतर धुलाई व सुकविणे.

अशा प्रकारे तयार केलेली फिल्म कोणत्याही प्रकाशक्षेपकावर वापरता येत असे.

इ.स. १९५३ पर्यंत या पद्धतीचा वापर चालू होता. या प्रकारच्या चित्रपटाच्या अनेक नकला लवकर म्हणजे एका सेकंदाला १०० मी. या वेगाने व कमी खर्चात करता येत असत.

टेक्निकलर कॅमेरा अवजड, गैरसोयीचा व जादा फिल्म वापरामुळे महाग पडत होता परंतु तो त्या प्रकारचा एकमेव कॅमेरा असल्यामुळे नव्या रंगीत फिल्मच्या शोधापर्यंत म्हणजे वीस वर्षे तो वापरला गेला. नेहमीच्याच कॅमेऱ्यावर रंगीत फिल्म वापरता यावी यासाठी कारखानदारांचे अव्याहत प्रयत्न चालू होते. जर्मनीने ३ मिमी.ची रंगीत व्यस्त फिल्म दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बनविली होती व ती पद्धत शांतता तहानंतर इतर राष्ट्रांना देण्यात आली. १९५१ सालानंतर रंगीत व्यस्त आणि सम फिल्म अनेक कारखानदारांकडून धंदेवाईक कंपन्यांना उपलब्ध झाली. यानंतर १९५५ सालापर्यंत टेक्निकलर पद्धत जवळजवळ वापरातून गेली.

सिनेरामा, सिनेमास्कोप यांसारख्या रुंद पडद्यांच्या चित्रपटांसाठी टेक्निकलर पद्धती वापरणे फार महाग पडणारे होते म्हणून कमी खर्चात काढता येणाऱ्या रंगीत फिल्मच्या विविध पद्धती पुढे आल्या.

त्रिमितिदर्शक चित्रपट : आपण नेहमी जे चित्रपट पाहतो त्यांत लांबी आणि रुंदी या दोन मितींचा प्रत्यय येतो पण खोली दिसत नाही. परंतु त्रिमितीय चित्रपटात तिचा प्रत्यय येतो. एखादी व्यक्ती आपल्याकडे चेंडू फेकत असल्याचे दृश्य जर आपण त्रिमितीय चित्रपटात पाहिले, तर पडद्यावर दिसणारा चेंडू आपल्या अंगावर येईल अशी भिती वाटण्याइतपत ते वास्तव वाटेल.

मानवाला त्याचे दोन डोळे व त्यांमधील अंतरामुळे त्रिमितीचा प्रत्यय येतो. एका डोळ्याने त्रिमितीचा प्रत्यय येत नाही. म्हणून त्रिमितीय चित्रपटासाठी दोन भिंगे जवळजवळ असलेल्या कॅमेऱ्याने दोन निरनिराळ्या फिल्मवर चित्रण करतात. त्रिमितीय चित्रपट बनविण्यासाठी बराच खर्च येतो म्हणून असे चित्रपट बहुधा लहानच काढतात.

त्रिमितीय चित्रपट तयार करण्यासाठी पुढील पद्धत वापरतात. कॅमेऱ्याच्या एका भिंगावर हिरवी आणि दुसऱ्या भिंगावर लाल प्रकाश गाळणी लावून दोन निरनिराळ्या फिल्म घेऊन त्यांची एकत्रित छपाई हिरव्या व लाल रंगात करतात. या फिल्मचे प्रक्षेपण करताना एका डोळ्याला लाल व दुसऱ्या डोळ्याला हिरव्या काचेचा चष्मा वापरून पाहिल्यास चित्रपटात त्रिमितीचा आभास निर्माण होतो. याच तत्त्वावर रंगीत त्रिमितीय चित्रपट एकप्रतली प्रकाश गाळणीच्या साह्याने करतात. रशियातील स्यिम्यॉन पव्हलॉव्ह्यिच इव्हानॉव्ह या कल्पकांनी एका नव्या पद्धतीच्या पडद्याची निर्मिती करून चष्म्याशिवाय त्रिमितीय फिल्म पाहण्याची एक अभिनव पद्धत शोधली आहे. त्यासाठी स्वतंत्र पद्धतीने बांधलेले चित्रपटगृह लागते पण ते मोठ्या आकाराचे बांधता येत नाही. १९३५ साली ई. एच्‌. लॅंड यांनी ध्रुवित प्रकाशाच्या (एकाच विशिष्ट प्रतलात कंपन पावणाऱ्या प्रकाशाच्या) तत्त्वाचा उपयोग करून त्रिमितिदर्शक चित्रपट तयार केला. या पद्धतीत प्रेक्षकाने डोळ्यांना लावण्याच्या चष्म्यात पॉलिव्हिनिल अल्कोहॉल प्लॅस्टिकच्या पटलांचा उपयोग केलेला होता. यानंतर त्रिमितिदर्शक चित्रपट तयार करण्याच्या आणखी काही पद्धती शोधून काढण्यात आल्या परंतु आर्थिक व अनेक तांत्रिक अडचणींमुळे पूर्णपणे समाधानकारक अशी पद्धत अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही.

चमत्कृती : (स्पेशल इफेक्ट्‌स). चमत्कृतींचा उपयोग चित्रपटात बऱ्याच ठिकाणी करावा लागतो. कारण काही देखावे खरेखुरे घेता येत नाहीत, तर काही घेणे सोयीचे नसतात किंवा खरे घेण्यासाठी अफाट खर्च करावा लागतो. चमत्कृतीसाठी निरनिराळ्या पद्धती अवलंबाव्या लागतात. त्यातील काही काम कॅमेऱ्याने चित्रण करताना व्यस्त फिल्ममध्येच करतात व काही काम सम फिल्म छापताना किंवा तिचे संस्करण करताना करतात. चमत्कृतीचे चित्रण करताना नेहमी खास साधनांची जरुरी लागतेच असे नाही. नेहमीच्या साधनांनीही कित्येक गोष्टी साध्य करता येतात. त्यासाठी प्रकाशयोजना, कॅमेऱ्याचा वेग, भिंगावर लावण्याच्या प्रकाश गाळण्या, लोलकाचा उपयोग यांनी नेहमी दिसणाऱ्या बऱ्याच चमत्कृती साधता येतात.

चमत्कृतीने भर उन्हात अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) किरणांना संवेदनशील असलेल्या फिल्मवर चित्रण करून चांदण्या रात्रीचा भास उत्पन्न करता येतो किंवा चित्रपटनिर्मितिगृहात योग्य प्रकाशयोजना करून दिवसाचा किंवा चांदण्याचा भास निर्माण करता येतो. रंगीत चित्रपटांची फिल्म छापताना योग्य रंगाची प्रकाश गाळणी वापरून पाहिजे तसा भास निर्माण करता येतो. तसेच चेहेऱ्याच्या प्रसाधनात फरक करूनही पाहिजे तसा भास निर्माण करता येतो.

काही वेळा लहान किंवा त्याच आकारमानाची प्रतिकृती वापरून चित्रण करावे लागते. लहान प्रतिकृती बनविताना मूळ दृश्यातील सर्व बारीक सारीक गोष्टी तपशीलवार दाखवाव्या लागतात. लहान प्रतिकृतीवरून चित्रण करताना कॅमेऱ्याची गती योग्य ठेवली, तर घेतलेले दृश्य मूळ दृश्यासारखे दिसते. प्रतिकृतीचे प्रमाण १६ : १ असे असेल, तर कॅमेऱ्याची गती चौपट करावी लागते. त्याचप्रमाणे कॅमेऱ्याचे भिंग जरूर असेल त्या केंद्रांतराचे निवडावे लागते. त्यामुळे लहान प्रतिकृतीवरून चित्रण केले आहे असे वाटत नाही.

आगगाडी, मोटारगाडी, घोडागाडी इत्यादींतील आतून दिसणारे देखावे नेहमीच चित्रपटनिर्मितिगृहात घेतलेले असतात. यासाठी ती गाडी चालताना जशी हालते तशी यंत्राच्या साहाय्याने हालवितात व तिच्यामागून पडद्यावर पूर्वी घेतलेल्या रस्त्याच्या चित्रपटाचे प्रक्षेपण करतात. अशा रीतीने चित्रपटनिर्मितिगृहात मांडलेल्या दृश्याचे चित्रण करतात. या पद्धतीने एकूण खर्चात बरीच बचत करता येते. ही पद्धत आ. १७ मध्ये दाखविली आहे.


आ. १७. पार्श्वभूमी प्रक्षेपण : (१) अर्धपारदर्शक पडदा, (२) कॅमेरा, (३) मागील दृश्य प्रक्षेपित करणारा प्रकाशक्षेपक, (४) पडद्याच्या पुढील व्यक्ती.

एखाद्या रस्त्यात झालेल्या संभाषणाचे दृश्य दाखवावयाचे असल्यास त्या रस्त्यावर चित्रण करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. रस्त्यावरील ‘बघ्या’ लोकांकडून होणारा त्रास तर फारच मोठा असतो म्हणून त्या रस्त्याचे नेहमीच्या वातावरणात चित्रण करतात आणि या फिल्मचे अर्धपारदर्शक पडद्यावर प्रक्षेपण करून त्याच्या पुढील भागावर संभाषणाचे चित्रण करतात त्यामुळे बघ्या लोकांचा व अनावश्यक ध्वनीकारी त्रास होत नाही. या पद्धतीने चित्रण करताना संभाषण करणाऱ्या पात्रावरील प्रकाशयोजना मागे दिसणाऱ्या रस्त्याशी सुसंगत ठेवून मागच्या पडद्यावर त्या पात्रांच्या सावल्या पडणार नाहीत याची काळजी घेतात. काही वेळा परावर्तित प्रक्षेपण करून चित्रण करतात. त्यामुळे पार्श्वभूमीवरील प्रक्षेपण अधिक तेजस्वी दिसते. आरशाचा उपयोग करून काही वेळा आरशातील प्रतिमेचेही चित्रण करावे लागते.

वरील सर्व पद्धतींत चमत्कृतीचा वापर छायाचित्रणाच्या वेळी करण्यात येतो पण तसाच तो छपाईच्या वेळीसुद्धा साधता येतो. एका दृश्यानंतर दुसरे दाखविताना करण्यात येणारा बदल चित्रपट छापताना निरनिराळ्या पद्धतींनी साधता येतो. उदा., (१) एक दृश्य हलके हलके नाहीसे होते, तर दुसरे हलके हलके दिसू लागते. तेव्हा एकाच वेळी दोन्ही दृश्ये एकत्र दिसतात. (२) एक दृश्य एका कोपऱ्यातून नाहीसे होते व दुसरे हलके हलके दिसू लागते. (३) एक दृश्य हलके हलके नाहीसे झाल्यावर दुसरे हलके हलके दिसू लागते.(४) अशाच प्रकारे एक दृश्य गोलाकारात, ताऱ्याच्या आकारात किंवा दुसऱ्या आकारात निघून जाते व दुसरे उरलेल्या भागात दिसू लागते.

काही वेळा चित्रपट चालू असतानाच त्यातील एक दृश्य थोडा वेळ स्थिर दाखवितात, तर काही वेळ एकाच वेळी दूरध्वनीवर बोलणाऱ्या व्यक्ती दोन निरनिराळ्या भागांत दाखवितात. त्याचप्रमाणे परभाषिक चित्रपटात खालच्या बाजूस भाषांतर छापतात किंवा चित्रपटाच्या प्रारंभी देण्यात येणारी श्रेयनामावली काही वेळा कथानकातील सुरुवातीचे दृश्य चालू असतानाच देतात, हे सर्व प्रकार चित्रपट छपाईच्या वेळी करता येतात.

कॅमेऱ्याच्या भिंगाच्या पुढे प्रकाश गाळणी लावण्याची व्यवस्था असते शिवाय भिंगावर बाहेरचा उजेड येऊ नये म्हणून एक वाटीच्या आकाराची टोपी आणि घडीची रचना बसवितात. प्रकाश गाळणीच्या शेजारीच एक झापड लावतात त्यामुळे झापडेचा जसा आकार असेल तेवढाच भाग सोडून दिसणाऱ्या दृश्याचे चित्रण करता येते. याचा उपयोग चावीच्या छिद्रातून किंवा दुर्बिणीतून दिसणारे दृश्य किंवा दुहेरी भूमिकेच्या छायाचित्रणासाठी करतात.

चमत्कृतींसाठी ‘ऑप्टिकल प्रिंटर’ नावाचा निराळा कॅमेरा उपलब्ध आहे. त्याने सम फिल्म प्रदर्शित करून तिचे जवळून किंवा लांबून चित्रण करता येते. त्याचा आकार एखाद्या लेथ एवढा असतो. या कॅमेऱ्याच्या साह्याने अनेक प्रकारच्या चमत्कृती निर्माण करता येतात.

व्यंगपट : (कार्टून फिल्म). जे. स्ट्यूअर्ट ब्लॅकटन यांनी १९०६ साली पहिला व्यंगपट अमेरिकेत तयार करून दाखविला. व्यंगपट बनविताना चलच्चित्रणाच्या मुख्य तत्त्वांचा उपयोग केला जातो. प्रत्येक चौकट हे स्वतंत्र चित्र म्हणून बनवून त्याचे चित्रण करावे लागते. या सर्व चित्रांत थोडा थोडा फरक असतो त्यामुळे जेव्हा सर्व चित्रांची मालिका पडद्यावर प्रक्षेपित केली जाते, तेव्हा आपल्याला चित्रातील पात्रांची हालचाल होत असल्याचा भास होतो.

व्यंगपटास जेव्हा सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक चौकटीतील संपूर्ण दृश्य हाताने रंगवीत असल्यामुळे व्यंगपट थोड्याशा प्रमाणात ढगाळलेला दिसत असे. त्यानंतर चित्रातील हलक्या आकृत्या व त्यांचे हलणारे भाग पुठ्ठ्याचे करू लागले व ते भाग जोडून काचेवर ठेवून त्याखाली पार्श्वभूमीचे चित्र ठेवीत असत. या पद्धतीमुळे व्यंगपटातील आकृत्यांची हालचाल एकाच ठराविक पद्धतीने होऊ लागली. त्यामुळे आकृत्यांची हालचाल नैसर्गिक वाटावी म्हणून आकृत्यांची स्वतंत्र चित्रे करण्याची आजची पद्धत रूढ झाली.

व्यंगपटाची कथा ठरल्यावर तीवर आधारित रंगीत रेखाचित्रे काढून ती एका मोठ्या तक्त्यावर लावतात. कथानकाच्या रेखाचित्रांची मांडणी योग्य रीतीने झाल्यावर तो तक्ता व्यंगपटाच्या दिग्दर्शकाकडे पाठवितात. दिग्दर्शक यानंतर संगीत दिग्दर्शक, चित्रकार, व्यंग चित्रकार इत्यादिकांशी चर्चा करतो व त्यांना कथानकाची संपूर्ण कल्पना देऊन त्यांची कामे वाटून देतो. पार्श्वभूमीची चित्रे, संभाषण, संगीत व इतर ध्वनी यांचे काम झाल्यावर व्यंगचित्रकार त्यांचा अभ्यास करतो. संभाषण मुद्रणावरून प्रत्येक शब्दाला किती चौकटी लागतात याचा आकडा व्यंगचित्रकाराला दिला जातो. यावरून ओठांच्या, डोळ्यांच्या व अंगाच्या इतर हालचाली लक्षात घेऊन तो चित्रे काढून घेतो. चित्रे पारदर्शक कागदावर काढल्यावर त्यांची साधी फिल्म घेतली जाते व ती संकलन यंत्रावर दिग्दर्शकासमवेत तपासली जाते. नंतर त्याच्या सल्ल्यानुसार पुढील कामास सुरुवात होते.

आ. १८. व्यंगपटातील चित्रांची मांडणी


व्यंगपटाकरिता तयार करण्यात येणाऱ्या या चित्रांसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगांच्या छटा सारख्या याव्या म्हणून काही ठिकाणी रंगमिश्रणासाठी एक स्वतंत्र रंगनिर्मिती विभाग चित्रकला विभागाला जोडण्यात आलेला असतो. चित्रे प्रथम पातळ कागदावर व नंतर सेल्युलॉइडपट्टीवर काळ्या शाईने काढतात. नंतर ती मागच्या बाजूने रंगविण्यासाठी स्वतंत्र विभागाकडे पाठवितात. सर्व चित्रे एकाच आकारात काढावी लागतात. म्हणून सेल्युलॉइडाचे व इतर कागदांचे एकाच आकाराचे तुकडे नेहमी हजारोंनी तयार ठेवतात. या तुकड्यांच्या एका बाजूला सारख्या अंतरावर छिद्रे पाडतात. या छिद्रांमुळे चित्र गिरविताना व चित्रणाच्या वेळी ते ठराविक जागी बरोबर ठेवता येते. चित्रे तयार झाल्यावर ती कॅमेरा विभागाकडे पाठवितात.

आ. १९. व्यंगपट कॅमेरा व साहाय्यक साधने : (१) कॅमेरा, (२) कॅमेरा चालविण्याची यंत्रणा, (३) स्विच पेटी, (४) व(५) हाताने फिरविण्याचे चक्र, (६) चित्र पाट ठेवण्याचे टेबल, (७) चित्रे ठेवण्याचा पाट, (८) सूचक लेखनी, (९) हालचालीचे मार्गदर्शन करणारा आरेख ठेवण्याचा फलक.

व्यंगपट चित्रणाचा कॅमेरा नेहमीच्या कॅमेऱ्यापेक्षा थोडा निराळा असतो. त्यात एका वेळी फक्त एकाच चित्रचौकटीचे चित्रण करण्याची सोय असते. तो कॅमेरा खालच्या बाजूस भिंग व वरच्या बाजूस फिल्म अशा पद्धतीने दोन उभ्या दांड्यांवर धरलेला असून तो विनासायास खालीवर करता येतो. उभे दांडे ज्या टेबलावर लावलेले असतात त्यावर चित्रकाराने काढलेली चित्रे ठराविक जागी ठेवतात व एक एक छायाचित्र घेतात. टेबलाच्या खालून किंवा वरून चित्रावर प्रकाश टाकण्याची सोय असते. तसेच हाताने फिरविण्याच्या चाकांनी पार्श्वभूमी उभ्या किंवा आडव्या दिशेने सरकवण्याची व्यवस्था असते. पार्श्वभूमीच्या चित्रावर सारख्या अंतरावर खुणा केलेल्या असल्यामुळे त्यांची हालचाल नियंत्रित ठेवता येते.

कोणत्या प्रकारच्या फिल्मला किती प्रकाश ठेवावयाचा हे प्रकाशमापकावरून कळते. त्याचप्रमाणे कॅमेऱ्याच्या दृश्यदर्शकावरून चित्र योग्य जागी आहे किंवा नाही हेही कळते. चित्राच्या केंद्रीकरणाची सोयही कॅमेऱ्यात असते. या कॅमेऱ्यात सर्व छायाचित्रे सारख्याच तीव्रतेची येतात. एका सेकंदाला २४ चौकटी याप्रमाणे ९ मिनिटांच्या व्यंगपटास १३,००० स्वतंत्र चौकटी म्हणजे चित्रे काढावी लागतात आणि त्यांच्या चित्रणासाठी १०० तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.

आ.२०. निरनिराळ्या रुंदीच्या फिल्मचे आकार व ध्वनिमार्गाची जागा : (अ) ३५ मिमी. (बोलपट), (आ) १६ मिमी. (मूक), (इ) १६ मिमी.(बोलपट), (ई) ९.५ मिमी. (मूक), (उ) ८ मिमी. (मूक), (१) फिल्मवरील छिद्रे, (२) ध्वनिमार्ग.

चित्रांच्या साहाय्याने जसा व्यंगपट बनविता येतो तसाच बाहुल्या व प्राण्यांची चित्रे बनवूनही व्यंगपट बनविता येतो. यासाठी सर्व तऱ्हेची हालचाल दाखवू शकणाऱ्या बाहुल्या व प्राण्यांची चित्रे मुद्दाम तयार करतात व त्यांच्या अवयवांना पाहिजे तसे वळण क्रमाक्रमाने देऊन एक एक चौकट तयार करतात. अशा प्रकारे तयार केलेला व्यंगपट फारच चांगला दिसतो आणि त्यात त्रिमितीचा भास निर्माण करता येतो.

व्यंगपटाच्या कॅमेऱ्याचा उपयोग फक्त मनोरंजक चित्रपटासाठीच करता येतो असे नाही. या तंत्राचा उपयोग तांत्रिक, वैद्यकीय व शैक्षणिक चित्रपट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात.

वॉल्ट डिझ्नी यांचे नाव व्यंगपटाच्या व्यवसायात जगप्रसिद्ध आहे. त्यांनी १९२३ साली हॉलिवुड येथे व्यंगपट निर्मितीला सुरुवात केली व निरनिराळे प्रयोग करून अनेक प्रकारचे चिरस्मरणीय व्यंगपट तयार केले. भारत सरकारच्या फिल्म विभागात एक अद्ययावत व्यंगपट विभाग असून या विभागातर्फे वर्षांकाठी तीन चार छोटेसे व्यंगपट तयार केले जातात. याशिवाय भारतात इतर ठिकाणी या तंत्राचा उपयोग शैक्षणिक व जाहिरातीचे चित्रपट बनविण्यासाठी करतात.

माहितीपट : चित्रपटाचा उपयोग केवळ मनोरंजनाशिवाय इतर क्षेत्रांत वाढत्या प्रमाणात केला जात आहे. माहितीपटांत बऱ्याच तऱ्हेच्या चित्रपटांची गणना होते. असे चित्रपट १० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालणारे नसतात. कित्येक वेळा ते मुख्य चित्रपटाबरोबर दाखवतात. शैक्षणिक दृष्टीने त्यांचे महत्त्व बरेच असते. त्यांचा उपयोग शिक्षण, संशोधन, नोंदणी इत्यादींसाठी बऱ्याच प्रमाणात केला जातो.

माहितीपटासाठी ३५, १६ आणि ८ मिमी. रुंदीच्या फिल्म वापरतात. त्यांपैकी ३५ मिमी.चे माहितीपट नेहमीच्या कथाचित्रपटाबरोबर दाखवितात. १६ मिमी. फिल्म दाखविण्यासाठी फार अवजड यंत्रणा लागत नाही. कोणत्याही शाळेच्या वर्गात ती सहज नेता येते. शैक्षणिक क्षेत्रात १६ मिमी. फिल्मपेक्षा ८ मिमी. फिल्म अधिक लोकप्रिय झालेली आहे. शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व शिकविण्यास अवघड अशा काही विषयांच्या ३-४ मिनिटे चालणाऱ्या वर्तुळाकार फिल्म तयार मिळतात. त्यामुळे शिक्षकाला एकच विषय पुन:पुन्हा दाखविता येतो व विद्यार्थ्यांना तो विषय समजावणे सोपे जाते. असे चित्रपट दाखविण्यासाठी दूरचित्रवाणीसारखे दिसणारे प्रकाशक्षेपक बनविलेले असून त्यांवर केव्हाही विनासायास फिल्म दाखविता येते.

तंत्राच्या दृष्टीने माहितीपटाचा वापर संशोधनासाठी फार महत्त्वाचा आहे. मानवाच्या दृष्टीला जे सहज दिसत नाही ते चित्रपटाच्या यंत्रणेचा उपयोग केल्यास दिसू शकते. उदा., ‘शीघ्र गती’ चित्रपटाचा उपयोग बंदुकीच्या गोळ्यांचा वेग मोजण्यासाठी करता येतो. ‘कालविलंब’ कॅमेऱ्याचा उपयोग वनस्पतीच्या वाढीच्या चित्रणासाठी होतो. याशिवाय जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) आणि अवरक्त किरणांचा उपयोग करून साध्या दृष्टीला न दिसणाऱ्या गोष्टींचे चित्रण करता येते. त्याचप्रमाणे वैद्यकीय व शास्त्रीय संशोधनांसाठी सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या व क्ष-किरणाचा उपयोग करून दिसणाऱ्या दृश्यांचे चित्रपट तयार करतात. बहुतेक मोठ्या संशोधन संस्थांत छायाचित्रणाचा विभाग असतो व त्या विभागाद्वारा संशोधनाचे माहितीपट तयार केले जातात व संस्थेतील कार्यकर्त्यांना बाहेरील माहितीपट दाखविले जातात.

उपप्रमाण (लहान मापांचे) चित्रपट : ३५ मिमी. फिल्म कॅमेरा आणि प्रकाशक्षेपक यंत्र फार अवजड असल्यामुळे झटपट काम करावयास अडचण पडते, हे लक्षात घेऊन फ्रान्समधील पाथे कंपनीने ९·५ मिमी. फिल्म कॅमेरा व त्यासाठी प्रकाशक्षेपक प्रथम तयार केले. त्यांचा प्रसार यूरोपात आणि हलके हलके इतर देशांत झाला. यानंतर अमेरिकेत १६ मिमी. फिल्मच्या निर्मितीस सुरुवात झाली. १६ मिमी. कॅमेरे आणि प्रकाशक्षेपक फारच सुटसुटीत व हलके बनविल्यामुळे ते लवकरच लोकप्रिय झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांचा उपयोग लष्करी, औद्योगिक व तांत्रिक शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला व हलके हलके त्याचे महत्त्व धंदेवाईक क्षेत्रातही वाढत गेले.


१६ मिमी.पेक्षा लहान म्हणजे ८ मिमी. फिल्म, फिल्म कॅमेरे आणि प्रकाशक्षेपक बाजारात आल्यानंतर त्यांचा प्रसार घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला. खऱ्या अर्थी ८ मिमी. फिल्म निराळी तयार करीत नाहीत. १६ मिमी. फिल्मच्या अर्ध्या भागावर प्रथम चित्रण करून नंतर तिची चक्री उलट्या बाजूने कॅमेऱ्यात परत भरतात म्हणजे उरलेल्या अर्ध्या भागावर चित्रण करता येते. फिल्मचे संस्करण झाल्यावर ती मधोमध कापून योग्य ठिकाणी जोडतात. यामुळे ८ मिमी. कॅमेरा वापरणे स्वस्त पडते. या फिल्मवरून १६ मिमी. फिल्मवर दुसरी प्रतही काढता येते. त्यामुळे बाजारात प्रथम आलेली ९·५ मिमी. फिल्म आणि इतर साहित्य प्रचारातून गेले आहे. निरनिराळ्या रुंदीच्या फिल्मचे वास्तविक आकार आ. २० मध्ये दाखविले आहेत.

इ.स. १९६५ सालानंतर सुपर ८ मिमी. फिल्म कॅमेरा व प्रकाशक्षेपक मिळू लागले. सुपर ८ मिमी.ची छिद्रे लांबट व अरुंद असल्यामुळे त्यावरचे चित्र जरा मोठ्या आकारात येऊ लागले, शिवाय त्यावर ध्वनिमुद्रण करता येत असल्याकारणाने व सतत अर्धा तास ती दाखविता येईल असे प्रकाशक्षेपक मिळत असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात ही फिल्म फारच उपयोगी ठरली आहे.

भारतातील व इतर देशांतील उत्तमोत्तम चित्रपटांच्या १६ मिमी. फिल्मच्या प्रती उपलब्ध असल्यामुळे फिरती चित्रपटगृहे, खेड्यातून चांगले चित्रपट व अनुबोधपट दाखवू शकतात. फक्त १६ मिमी. फिल्मचे चित्रपट दाखविणारी छोटी चित्रपटगृहे काही ठिकाणी चालतात. दूरचित्रवाणीसाठी १६ मिमी. फिल्मच्या कॅमेऱ्याचाच उपयोग करतात. १६ मिमी.चे चित्रपट आगबोटी व विमाने यांतील प्रवाशांना दाखविण्यासाठी फार सोयीचे असतात. अशा ठिकाणी ध्वनी एकाच ठिकाणाहून प्रक्षेपित न करता श्रवणटोपाद्वारे (हेडफोनद्वारे) प्रत्येक बैठकीस पुरवितात. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत नाही. काही वेळा एकच चित्रपट दोन वा अधिक भाषांत एकाच वेळी प्रक्षेपित करतात तेव्हा श्रवणटोपातून ऐकणे सोयीचे असते.

प्रक्षेपणगृह : चित्रपटगृहातील ज्या खोलीतून चित्रपटाचे प्रक्षेपण पडद्यावर करतात तिला प्रक्षेपणगृह म्हणतात. या खोलीत प्रकाशक्षेपक, ध्वनिमुद्रिका वाजविणारे यंत्र (रेकॉर्ड प्लेअर), चित्रकाच (स्लाइड) प्रक्षेपक इ. साधने असून चित्रपटगृहाच्या पडद्यांची उघडझाप, दिवे, पंखे इत्यादींवर नियंत्रण ठेवणारे विजेचे स्विच असतात. या खोलीच्या शेजारीच फिल्म चक्रीवर गुंडाळण्याची व फिल्म जोडण्याची यंत्रे एका टेबलाला जोडलेली असतात. शिवाय फिल्म व्यवस्थित ठेवण्यासाठी कपाटे व पेट्या ठेवलेल्या असतात. वेळप्रसंगी उपयोगी पडावी म्हणून आग विझविण्याची साधने आजूबाजूला ठेवतात.

आ. २१. चित्रपट प्रक्षेपणाच्या प्रकाशक्षेपक यंत्रातील मांडणी : (१) परावर्तक, (२) कार्बनी प्रज्योत, (३) सतत फिरणारी झडप, (४) सुरक्षा झडप, (५) खिडकी, (६) भिंग संच, (७) थांबून थांबून फिरणारे दंत चक्र (हे दंतचक्र खालच्या बाजूस मोठे करून दाखविले आहे, अ - माल्टीज क्रॉस), (८) उत्तेजक दिवा, (९) प्रकाशविद्युत् घट, (१०) प्रक्षेपित करावयाच्या फिल्मची चक्री, (११) प्रक्षेपित करून झालेल्या फिल्मची चक्री, (१२) चुंबकीय ध्वनिग्राहक पेटी, (१३) प्रकाशीय ध्वनी पेटी.मोठ्या शहरातील प्रक्षेपणगृहात दोन प्रकाशक्षेपक असतात. त्यामुळे एका प्रकाशक्षेपकातील चक्रीचे प्रक्षेपण संपल्याबरोबर दुसऱ्या प्रकाशक्षेपकातील चक्रीचे प्रक्षेपण सुरू करता येते. शिवाय नवीन चित्रपटगृहांत ३५ मिमी. व ७० मिमी. रुंदीची फिल्म दाखविणारे प्रकाशक्षेपकही ठेवतात [→ प्रकाशक्षेपक चित्रपटगृह]. चित्रपट प्रक्षेपणासाठी वापरीत असलेल्या यंत्रातील मांडणी आ. २१ मध्ये दाखविली आहे. दाखवावयाच्या फिल्मवरील ध्वनिमुद्रण ज्या पद्धतीने केलेले असेल त्यानुसार चुंबकीय ध्वनिग्राहक पेटी किंवा प्रकाशीय ध्वनी पेटी वापरतात.

चित्रपटाचा पडदा : चित्रपट दाखविण्यासाठी पूर्वी स्वच्छ पांढऱ्या रंगाचा पडदा वापरीत असत. त्याचा आकार ठरलेला नसे. आजही फिरत्या चित्रपटाचे पडदे असेच असतात. जेव्हा कायम स्वरूपाची चित्रपटगृहे बांधण्यात येऊ लागली तेव्हा ते पडदे ठराविक लांबी व उंचीच्या प्रमाणात ठेवून व चौकटीवर ताणून नीटनेटके बसवण्यात येऊ लागले. बोलपटनिर्मितीस सुरुवात झाल्यावर पडदे छिद्रित कापडाचे किंवा प्लॅस्टिकचे बनविण्यात येऊन त्यांच्या मागच्या बाजूस ध्वनिक्षेपक लावण्यात आले.

चित्रपट प्रेक्षकांची संख्या वाढू लागल्यामुळे साहजिकच पडद्याचा आकार मोठा करावा लागला. चित्रपटाच्या प्रकाशक्षेपकाच्या दिव्याची मर्यादा ठराविक असल्यामुळे प्रकाश परावर्तित करणाऱ्या पडद्यांची जरुरी भासू लागली. त्यासाठी ॲल्युमिनियमासारख्या दिसणाऱ्या रंगाचा किंवा सूक्ष्म आकाराच्या काचेच्या गोलकांचा पातळ थर दिलेले पडदे तयार करण्यात आले. अशा पडद्यावरील चित्रपट फार रुंद चित्रपटगृहातील भिंतीजवळच्या जागेवरून सारख्या प्रमाणात तेजस्वी दिसत नाहीत म्हणून असे पडदे फक्त लांबट आकाराच्या अरुंद जागेत वापरतात.

पडद्यावर जी प्रतिमा पडते ती तेजस्वी असावयास पाहिजे. यासाठी पडद्यावर पडणारा प्रकाश किती असावा याबद्दलचे आंतरराष्ट्रीय प्रमाण ठरलेले आहे.


पडद्याचा आकार : पडद्याची रुंदी व उंची यांचे गुणोत्तर ठरलेले असते. जसजसे चित्रपट बनविण्याचे नवनवीन प्रकार प्रचारात आले तसतसे नव्या गुणोत्तरांचे पडदे तयार करण्यात आले. रुंदी व उंची यांच्या गुणोत्तरास प्रसर गुणोत्तर म्हणतात. चित्रपटनिर्मितीच्या प्रारंभापासून पडद्याचा आकार ४ : ३ या प्रसर गुणोत्तरात होता. बोलपटाची सुरुवात झाल्यावर फिल्ममधील चित्राचा काही भाग ध्वनिमुद्रणासाठी वापरण्यात आल्याने हे प्रसर गुणोत्तर थोडे बदलले. यानंतर १९५३ साली सिनेमास्कोपची सुरुवात झाल्यावर पडद्याचा आकार अधिक रुंद होऊन तो ८ : ३ किंवा २·६६ : १ या प्रसर गुणोत्तराचा झाला.

मोठ्या आकाराचा पडदा लावण्यासाठी काही चित्रपटगृहांत सुधारणा करावी लागली. चित्रपटात मूर्तस्वरित ध्वनी प्रचलित झाल्यावर चित्रपटगृहातील पडद्याच्या मागे एकाच्या जागी तीन ते पाच ध्वनिक्षेपक बसविण्यात येऊ लागले. आधुनिक चित्रपटगृहात पडद्याचा आकार सहज बदलण्याची व्यवस्था असते, तर काहींत आकार दर्शविणारे पट्टे ठेवीतच नाहीत.

परावर्तक पडदा : पडद्याच्या फार जवळून चित्रपट पाहिल्यास डोळ्यावर फार ताण पडतो व पडद्याच्या कडेजवळील चित्राचे भाग विकृत दिसतात. त्यामुळे पडद्याजवळील जागा रिकामी ठेवावी लागते. याकरिता व अधिकाधिक प्रेक्षकांना एकाच वेळी चित्रपट पहाता यावा या उद्देशाने पवई (मुंबई) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील गणिताचे प्राध्यापक चं. रा. मराठे यांनी एक परावर्तक पडदा शोधून काढलेला आहे. यात एक अनुस्फुरक (प्रकाश पडल्यावर चमकणारा) परंतु अर्धपारदर्शक पडदा वापरतात. प्रकाशक्षेपकामधून यावर पडणारे चित्र मागील बाजूने पाहिल्यास स्पष्ट दिसते, मात्र अक्षरे व बाजू उलट दिसतात. या पडद्याच्या मागे एक पॉलिएस्टरचा परावर्तक (आरसा) बसविलेला असतो. पडद्यावरील प्रतिमा या परावर्तकामुळे उलट होऊन परावर्तकामागे पडद्याइतक्याच अंतरावर दिसते. या रचनेमुळे प्रेक्षागृहाचे दोन भाग होऊन दोन्ही भागांतील प्रेक्षकांना लांबूनच चित्रपट बघता येतो.

आ. २२. परावर्तक पडदा : (१) प्रकाशक्षेपक, (२) मुख्य पडदा (अर्धपारदर्शक), पॉलिएस्टरचा परावर्तक, (४) प्रतिबिंबित पडदा, (५) प्रेक्षागृह.

अशा प्रेक्षागृहाची रचना आ. २२ मध्ये दाखविली आहे. या रचनेमुळे प्रेक्षकांच्या बैठकांच्या संख्येत कमीत कमी ३०% वाढ होते.

मोटारगाडीसह चित्रपटगृह : (ड्राइव्ह इन थिएटर). चांगली हवा असलेल्या दिवशी मोटारगाडीतूनच चित्रपट पाहण्याची सोय असलेली खुली चित्रपटगृहे अमेरिकेत व इतर देशांत प्रचलित होऊ लागली आहेत. ही चित्रपटगृहे शहराच्या बाहेर असतात. अशा चित्रपटगृहाच्या आराखड्याचा एक नमुना आ. २३ मध्ये दाखविला आहे. एका खुल्या जागेत प्रत्येकाला आपल्या गाडीतून चित्रपट पाहता यावा म्हणून टप्प्याटप्प्याने उतार बनवून ही जागा बनवितात. याची रचना इतर चित्रपटगृहांप्रमाणे प्रक्षेपणाचा पडदा हा बिंदू धरून गोलाकार करतात. साधारण चित्रपटगृह ६०० ते ७०० गाड्या राहू शकतील एवढ्या आकारमानाचे असते. साधारण पडद्याचा आकार २० मी. रुंद व १५ मी. उंच असतो. हा पडदा छप्पर असलेल्या जागेत ठेवतात त्यामुळे तो वारा पाऊस इत्यादींपासून सुरक्षित असतो. ध्वनीसाठी प्रत्येक गाडीला स्वतंत्र ध्वनिक्षेपक तिकिटाबरोबर देण्यात येतो व तो ज्या ठिकाणी गाडी उभी करतात त्या ठिकाणी एका लहान खांबावर असलेल्या ध्वनिप्रवाह आणणाऱ्या खोबणीस जोडता येतो.

आ. २३. मोटारगाडीसह चित्रपटगृह : (१) मोटारगाड्या आत नेण्याचा दरवाजा, (२) तिकीट विक्रीची जागा, (३) मोटारगाड्या बाहेर नेण्याचा दरवाजा, (४) मुख्य कार्यालय, (५) चित्रपट दाखविण्याचा रुंद पडदा, (६) मोटारगाड्या उभ्या करण्याच्या जागा, (७) चित्रपट प्रक्षेपणाची खोली, (८) पाण्याचे नळ वगैरे, (९) आवाराची उंच भिंत.

चित्रपट प्रक्षेपणाची खोली प्रेक्षकाला त्रासदायक होणार नाही अशा रीतीने बांधण्यात येते. चित्रपटाचा पडदा मोठा असल्याकारणाने अतिशय तेजस्वी प्रज्योत दिवा प्रक्षेपणासाठी वापरावा लागतो. काही चित्रपट निर्माते अशा खुल्या चित्रपटगृहासाठी फिल्मची फिक्की प्रत मुद्दाम तयार करतात. याशिवाय विश्रांतिगृहे, स्वच्छतागृहे, तिकीटविक्री, मुख्य कार्यालय इत्यादींसाठी एक स्वतंत्र इमारत अशा चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असते.

भारतात अशा प्रकारची चित्रपटगृहे बांधण्यासाठी काही ठिकाणी आराखडे तयार करण्यात आले आहेत.

रुंद पडद्याचे चित्रपट : विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून १९५२ पर्यंत चित्रपटनिर्माते नेहमी ३५ मिमी. रुंदीच्या फिल्मचा वापर करीत असत. १९२६ साली बोलपटास सुरुवात झाली. ध्वनिमुद्रण प्रकाशीय पद्धतीने चित्रपटाच्या फिल्मवरच करण्यात आल्यामुळे चित्रचौकटीचा आकार बदलावा लागला.

आपल्याला दोन डोळ्यांनी जितके मोठ्या कोनाचे दृश्य दिसते तितके नेहमीच्या चित्रपटात दिसत नाही म्हणून त्याचे आकारमान वाढविण्यासंबंधी अनेक प्रयोग करण्यात आले. निरनिराळ्या रुंदीच्या फिल्म आणि त्यांवर मुद्रित अनेक ध्वनिमार्ग असलेले चित्रपट तयार होऊ लागले. काही निर्माते ३५ मिमी. फिल्मचा वापर करून नव्या आकारमानात चित्रपट करीत. मोठ्या आकारमानाच्या चित्रपटासाठी काही कंपन्यांनी ३५ मिमी. फिल्मवर ७ ध्वनिमार्ग मुद्रित केलेले आहेत. काही चित्रपट ६५ मिमी. व ७० मिमी. रुंदीच्या फिल्मवर घेण्यात आले.

चित्रपट धंद्यात १९५२–६८ या काळात बऱ्याच नवनवीन कल्पना पुढे आल्या. त्यांत प्रामुख्याने लक्षात येणारी गोष्ट म्हणजे फिल्मची रुंदी वाढली म्हणून चित्रचौकटीचे आकारमान वाढले. चित्रचौकटीच्या आकारमानात जसा फरक पडला तसाच मूर्तस्वरित ध्वनिमुद्रणाच्या यशामुळे ध्वनिमुद्रणमार्गाच्या जागा व त्यांची संख्या कमीजास्त झाली. नव्या गरजेप्रमाणे चित्रपटाच्या फिल्मची रुंदी वाढून ती ७० मिमी.पर्यंत गेली. चित्रणासाठी व प्रक्षेपणासाठी नव्या तऱ्हेची भिंगे बनविण्यात आली. हे नव्या आकारमानाचे चित्रपट सिनेमास्कोप, व्हिस्टाव्हिजन, टेक्निरामा इ. नावांनी त्यांच्या निर्मितीच्या विशिष्ट पद्धतीनुसार ओळखण्यात येऊ लागले. यांपैकी काही पद्धतींचे वर्णन खाली दिले आहे.


आ. २४. सिनेरामा पद्धत : (१) तीन फिल्मांचा तीन भिंगांचा कॅमेरा, (२) एकाच वेळी चित्रित झालेल्या तीन फिल्मांच्या चौकटी, (३) प्रकाशक्षेपक, (४) सहा ध्वनिग्राहकांमधून मिळालेला ध्वनी एकाच फिल्मवर मुद्रित करणारे यंत्र, (५) निरनिराळ्या ध्वनिमार्गांना जोडलेले ध्वनिक्षेपक, (६) पडदा.

सिनेरामा : एफ्‌. वॉकर यांनी सिनेरामा या रुंद पडद्यावर दाखविण्याच्या पद्धतीचा शोध लावून १९५२ साली या पद्धतीने पहिला चित्रपट दाखविला. त्यासाठी लागणारी उपकरणे व सामग्री त्यांनीच बनविली होती. या पद्धतीत तीन स्वतंत्र कॅमेरे एकत्रित चालविले जात असून ते दृश्याच्या तीन भागांचे स्वतंत्र चित्रण करतात. तिन्ही कॅमेऱ्यांची भिंगे एकाच चावीने फिरविता येतात. प्रत्येक कॅमेऱ्यासाठी त्याची फिल्म स्वतंत्र जागेत भरावी लागत असून त्या तिन्ही फिल्म एकाच वेगाने फिरतात. शिवाय सर्व भिंगांची मिळून एकच झडप असते म्हणून तिन्ही फिल्म एकाच वेळी प्रकाशित होतात. तिन्ही भिंगे ४८° आडव्या व ५५° उभ्या अशा आकारमानाचे चित्रण करतात. या कॅमेऱ्यासाठी ३५ मिमी. फिल्म चालते व जवळजवळच्या दोन्ही भिंगांनी घेतलेली चित्रे २° नी एकमेकांवर येतात आणि तिन्ही चित्रांचा एकत्रित कोन १४०° होतो. उजव्या बाजूचा कॅमेरा डाव्या / भागाचे दृश्य घेतो, तर डाव्या बाजूचा उजव्या / भागाचे आणि मधला अर्थातच मधल्या / म्हणजे त्याच्या समोरील भागाचे दृश्य घेतो.

या पद्धतीत फिल्म सहा छिद्रांनी पुढे सरकत जाते म्हणून नेहमीप्रमाणे २४ चित्रचौकटींऐवजी २६ चौकटी दर सेकंदास पुढे जाण्याची त्यात व्यवस्था असते म्हणून चित्रपटात कंपने दिसत नाहीत. या कॅमेऱ्यावर घेतलेला चित्रपट उभ्या अरुंद पट्ट्या जोडून बनविलेल्या अतिवक्राकार पडद्यावर दाखवितात. त्यामुळे या चित्रपटात त्रिमितीचा भास निर्माण होऊन पाहणाऱ्याला आपण चित्रपटातीलच एक व्यक्ती आहोत असे वाटते. चित्रणासाठी फिल्मच्या दोन्ही बाजूंच्या छिद्रणांमधील संपूर्ण जागा वापरतात. फिल्मवरील चित्रांच्या दोन्ही बाजूंच्या कडा मुद्दाम पुसट करतात त्यामुळे प्रक्षेपणाच्या जवळजवळ येणाऱ्या कडांचे मीलन चांगले होते. अशा चित्रपटाचे ध्वनिमुद्रण मूर्तस्वरित असून ते एका ३५ मिमी. फिल्मवर निराळे घेऊन चुंबकीय पद्धतीने निरनिराळ्या सात मार्गांवर मुद्रित करतात. त्यांतील ५ मार्ग पडद्यामागील पाच ध्वनिक्षेपकांना व उरलेले दोन मार्ग चित्रपटगृहाच्या दोन्ही बाजूंच्या ध्वनिक्षेपकांना जोडलेले असतात. यांशिवाय एक आठवा ध्वनिक्षेपक विशेष आवाजासाठी मधल्या प्रकाशक्षेपकाच्या बाजूला असतो. समोरच्या चित्राच्या प्रसर गुणोत्तरात प्रेक्षकांच्या जागेप्रमाणे बदल करतात. मधल्या प्रकाशक्षेपकासमोर ते २·०६ : १ असे असते. सिनेरामा निर्मितीमुळे रुंद पडद्यावर दाखवावयाच्या निरनिराळ्या पद्धतींची सुरुवात व प्रगती झाली. ही पद्धत आ. २४ मध्ये दाखविली आहे.

इ. स. १९६४ नंतर सिनेरामा चित्रपट ६५ मिमी.च्या एकभिंगी कॅमेऱ्यावर तयार करण्यात आले व ते ७० मिमी.च्या एकाच प्रक्षेपकावरून दाखवितात. त्यांतील काही अल्ट्रापॅनॅव्हिजन भिंगाने तर काही गोलाकार भिंगाने घेतात.

आ. २५. सिनेमास्कोप : (अ) फिल्मवरील दाबलेले चित्र, (आ) पडद्यावर दिसणारे चित्र.

सिनेमास्कोप : ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स या कंपनीने सिनेमास्कोप ही पद्धत शोधून काढली. १९५३ मध्ये या पद्धतीनुसार पहिला चित्रपट तयार करण्यात आला. त्यासाठी एकाच फिल्मवर चित्रण व मूर्तस्वरित ध्वनिमुद्रण करतात आणि ती फिल्म रुंद पडद्यावर दाखविता येते. प्रतिमेचे आकुंचन करणाऱ्या (ॲनामॉर्फिक) भिंगाचा उपयोग ३५ मिमी. फिल्मवर चित्रपट काढण्यासाठी केल्यामुळे त्यावर येणारे चित्र रुंदीच्या दोन्ही बाजूंनी दाबल्यासारखे येते. पण असेच भिंग प्रकाशक्षेपकावर लावल्यामुळे दाबलेले चित्र प्रक्षेपणाच्या वेळी पूर्ववत रुंद होते. असे चित्र आ. २५ मध्ये दाखविले आहे. असे भिंग कॅमेऱ्याच्या किंवा प्रकाशक्षेपकाच्या नेहमीच्या भिंगावर लावावे लागत असल्यामुळे बॉश अँड लॉम्ब कंपनीने एक एकत्रित भिंग बनविले. हे सुधारित भिंग वापरण्यास सोईचे पडते.

सिनेमास्कोपच्या फिल्मवर चार चुंबकीय मूर्तस्वरित ध्वनिमार्ग असतात व फिल्मवर यासाठी जागा मिळावी म्हणून बाजूची छिद्रे लहान आकाराची पाडलेली असतात. तीन ध्वनिमार्ग पडद्याच्या मागे स्वतंत्रपणे सिनेमास्कोप ध्वनिक्षेपकांना जोडलेले असतात व चौथा ध्वनिमार्ग पडद्याच्या पुढील ध्वनिक्षेपकाला विशेष आवाजासाठी जोडलेला असतो. पडद्यावरील चित्राचे प्रसर गुणोत्तर २·५५ : १ असे असते. सिनेमास्कोप चित्रपटाचा ध्वनिमार्ग चुंबकीय-प्रकाशीय बनविता येतो. अशी प्रत दोन्ही तऱ्हेच्या प्रकाशक्षेपकांवरून दाखविता येते. त्याचप्रमाणे फक्त प्रकाशीय ध्वनिमार्ग असलेली प्रत पण छापतात. परंतु तिचे प्रसर गुणोत्तर २·३४ : १ असे असते.


सिनेमास्कोप ५५ ही पद्धत ट्‌वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स या कंपनीने १९५६ साली तयार करून प्रचारात आणली. यासाठी एक निराळा कॅमेरा वापरतात आणि त्यासाठी ५५·२५ मिमी. एवढी रुंद फिल्म वापरतात त्यामुळे मूळ चित्र नेहमीच्या चित्राच्या दुप्पट आकारात येते. या मोठ्या आकारमानाच्या व्यस्त फिल्मवरून नेहमीच्या ३५ मिमी. फिल्मवर सिनेमास्कोपच्या आकारमानात सम फिल्म काढतात, तिचे प्रसर गुणोत्तर २·५५ : १ एवढे असते त्यामुळे चित्रपट नेहमीच्या सिनेमास्कोपपेक्षा अधिक स्पष्ट दिसतो.

टेक्निरामा : ही पद्धत टेक्निकलर कॉर्पोरेशनने १९५६ मध्ये तयार केली. हिच्या कॅमेऱ्यातील फिल्मची सरक उजवीकडून डावीकडे आडवी होत असून तिने नेहमीच्या (३५ मिमी.) चित्रचौकटीच्या दुप्पट आकाराचे चित्र घेतले जाते. पुढे वर्णन केलेल्या व्हिस्टाव्हिजन पद्धतीप्रमाणे हिच्या चित्रचौकटीचे प्रमाण असते. अशा प्रकारे घेतलेले चित्र फिल्मवर छापताना सिनेमास्कोपसारखे छापतात. त्यामुळे ते नेहमीच्या सिनेमास्कोप प्रकाशक्षेपकाद्वारे दाखविता येते.

सिनेमिरॅकल : इ.स. १९५८ मध्ये शोधून काढण्यात आलेली ही पद्धत बहुतेक बाबतीत सिनेरामाप्रमाणेच असते. परंतु हीत उजव्या बाजूचे चित्रण उजवीकडील कॅमेऱ्याने, मध्य भागाचे मधल्या कॅमेऱ्याने व डाव्या बाजूकडील चित्रण डाव्या कॅमेऱ्याने व प्रक्षेपणही त्याच क्रमाने करतात. पडद्यावरच्या आकृतीचे प्रसर गुणोत्तर २·३३ : १ असते. आवाजासाठी ३५ मिमी.ची निराळी फिल्म असून तीवर ७ ध्वनिमार्गांचे मुद्रण करतात.

किनेपॅनोरामा : ही पद्धत सोव्हिएट रशियाच्या ई.एम्‌.गोल्डोव्हस्की या शास्त्रज्ञांनी आणि मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ सिनेमॅटोग्राफी या संस्थेने मिळून १९५८ साली तयार केली. ही पद्धत बऱ्याच बाबतीत सिनेरामा आणि सिनेमिरॅकल यांच्याप्रमाणे आहे. ध्वनिमुद्रण ३५ मिमी.च्या स्वतंत्र फिल्मवर नऊ ध्वनिमार्गांवर केलेले असते. सिनेरामा किंवा सिनेमिरॅकलच्या प्रकाशक्षेपकावर हे चित्रपट दाखविता येतात.

टेक्निस्कोप : ही पद्धत टेक्निकलर कॉर्पोरेशनने १९६४ साली तयार केली. यासाठी ३५ मिमी.ची फिल्म वापरतात. चित्रणासाठी नेहमीचे भिंग वापरतात पण चित्र फक्त दोन छिद्रांच्या उंचीत बसविले जाते त्यामुळे व्यस्त फिल्म बनविण्यास अर्धा खर्च येतो. सम फिल्मची छपाई करताना ते नेहमीच्या ३५ मिमी. फिल्मवर चार छिद्रांच्या अंतरात छापतात. त्यामुळे सम फिल्मचे प्रसर गुणोत्तर २ : १ राहते. व्यस्त फिल्म दोन छिद्रांच्या अंतरात घेतल्यामुळे चित्राचे प्रसर गुणोत्तर २·३५ : १ असते व चित्रण दर सेकंदाला २४ चित्रचौकटी याच वेगाने करतात. चित्रपट कोणत्याही सिनेमास्कोपच्या प्रकाशक्षेपकावरून दाखविता येतो.

व्हिस्टाव्हिजन : पॅरॅमाऊंट पिक्चर्सने व्हिस्टाव्हिजन पद्धतीचा चित्रपट १९५४ साली प्रथम तयार केला. या पद्धतीत चित्रण करताना फिल्म उजवीकडून डावीकडे अशी आडवी सरकते. त्यामुळे प्रत्येक चित्रचौकट आठ छिद्रांची रुंद आणि अदमासे २५ मिमी. उंच असते. म्हणून चित्र नेहमीच्या चित्रापेक्षा दुप्पट मोठे येऊन त्याची व्यस्त प्रत चांगल्या प्रतीची बनते. या व्यस्त फिल्मवरून बनविलेल्या चित्राचे प्रसर गुणोत्तर १·९६ : १ एवढे असते. प्रक्षेपणासाठी आडवा चालणारा प्रकाशक्षेपक असतो पण त्यावरून चित्र फारच मोठे दिसते म्हणून त्याचा उपयोग फारसा करीत नाहीत. नेहमीच्या वापरासाठी ३५ मिमी. फिल्मवर प्रत काढल्यामुळे चित्रपट अधिक स्पष्ट दिसतो. ३५ मिमी. वरील प्रतीचे प्रसर गुणोत्तर १·३३ : १ पासून २ : १ असे असते.

सुपरस्कोप २३५ : इ.स. १९५४ मध्ये आर के ओ. पिक्चर्स या कंपनीने शोधून काढलेल्या या पद्धतीच्या चित्रणासाठी नेहमीच्या कॅमेऱ्याचा व फिल्मचा उपयोग करतात. चित्रणासाठी फिल्मच्या दोन्ही बाजूंच्या छिद्रातील जागा वापरतात. परंतु नेहमीच्या चित्रचौकटीचा वरचा व खालचा भाग झाकून सिनेरामाच्या आकारात चित्रण करतात. या फिल्मवरून तिची छपाई करताना प्रतिमेचे आकुंचन करणाऱ्या भिंगाचा उपयोग करतात त्यामुळे ती कोणत्याही सिनेमास्कोपच्या प्रकाशक्षेपकावर वापरता येते.

टॉड-एओ : इ.स. १९५५ मध्ये शोधून काढलेल्या या पद्धतीत ३५ मिमी.पेक्षा रुंद फिल्मचा उपयोग प्रथम करण्यात आला. ६५ मिमी. रुंदीच्या फिल्मचे बी. ओब्राअन यांनी तयार केलेले एकच भिंग कॅमेऱ्याला लावून चित्रण करतात. फिल्मची सर्व जागा चित्रणासाठी वापरतात. ७० मिमी. रुंदीच्या फिल्मवर छपाई करून उरलेल्या जागेत सहा ध्वनिमार्ग ठेवतात. त्यातील दोन्ही छिद्रणांच्या दोन्ही बाजूंस दोन ध्वनिमार्ग असून आतील बाजूस एक असतो. या कॅमेऱ्यासाठी खास भिंगे बनविलेली असून ती त्यांच्या प्रतिमा घेण्याच्या अंशावरून ओळखतात. त्यात ३७°, ४८°, ६८° आणि १२८° असे प्रकार असतात. प्रक्षेपण केलेल्या चित्राचे प्रसर गुणोत्तर २·२ : १ असते. १९५९ साली शोधून काढण्यात आलेली सुपर पॅनॅव्हिजन ही पद्धत टॉड-एओ सारखीच आहे.

एम. जी. एम. ६५ : ही चित्रपटनिर्मितीची पद्धत मेट्रो गोल्डविन मेयर कंपनीने आखून त्याप्रमाणे पहिला चित्रपट १९५५ मध्ये तयार केला. या पद्धतीत व्यस्त फिल्म ६५ मिमी.वर प्रथम बनवितात व ती पाच छिद्रणानंतर एक चित्र याप्रमाणे पुढेपुढे जाते. कॅमेऱ्याला पॅनॅव्हिजन कंपनीने तयार केलेले भिंग वापरल्यामुळे चित्र लांबीच्या बाजूने दाबले गेल्यासारखे येते व त्यामुळे चित्रपट्टीवर जास्त चित्रण करता येते. या व्यस्त फिल्मवरून ७० मिमी. फिल्मवर छपाई करतात व ती ७० मिमीच्या खास भिंग असलेल्या प्रकाशप्रक्षेपावरून दाखवितात सिनेमास्कोप प्रकाशक्षेपकावरून दाखविण्यासाठी एम. जी. एम. ६५ ची प्रत ३५ मिमी. फिल्मवर काढतात. तिच्या तीन प्रकारच्या आवृत्त्या काढतात. एकीत फक्त प्रकाशीय व दुसरीत फक्त चुंबकीय ध्वनिमुद्रण असते, तर तिसरीत चुंबकीय-प्रकाशीय असे दोन्ही प्रकारचे असते.

अल्ट्रापॅनॅव्हिजन : ही पद्धत एम. जी. एम. ६५ सारखीच आहे. फक्त चित्रणासाठी १·३३ : १ च्या ऐवजी १·२५ : १ या दाबाचे प्रतिमा आकुंचक भिंग वापरतात.

पहा : कॅमेरा; छायाचित्रण; ध्वनिमुद्रण व पुनरुत्पादन प्रकाशक्षेपक.

संदर्भ : 1. The American Society of Cinematographers, The American Cinematographer’s Manual, Holywood, 1966.

2. Clark, C. G. Professional Cinematography, Hollywood. 1964.

3. Cricks, R. H. (Martin, A. J. Ed.) The Complete Projectionist, London, 1949.

4. Gordon, J. Motion Picture Production for Industry, New York, 1961.

5. Halas, J. Manvell, R. The Technique of Film Animation, New York, 1959.

6. Happe, L. B. Basic Motion Picture Technology, London, 1971.

7. Lehrburger, E. Film Making, London, 1962.

8. Resiz, K. The Technique of film Editing, London, 1961.

9. Souto, H. M. R. The Technique of the Motion Picture Camera, London, 1967.

10. Spottiswood, R. A Grammar of the Film, Berkeley and Los Angeles, 1962.

11. Spottiswood., R. Film and its Techniques, London, 1952.

12. Taylor, D. Pictorial History of the Movies, New York, 1943.

13. Wheeler, L. J. Principles of Cinematography, London, 1969.

ओक, ना. चिं.