चर्च-संगीत : सर्व धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्मातही प्रार्थना, प्रार्थनामंदिर आणि संगीत यांचा निकटचा संबंध आहे. रोमन कॅथलिक पंथाने नवव्या शतकाच्या सुमारास बहुधुनपद्धतीचा अंगीकार केल्यामुळे पाश्चात्त्य संगीताचा पाया घातला गेला. पुढे कंठसंगीत आणि ऑर्गन संगीत यांची वाढही मुख्यतः चर्चच्या आधारे झाली. चांट, कॅंतिकल, ट्रोप, लिटर्जी, ⇨कॅंताता, ⇨ ऑरेटोरिओ इ. संगीतप्रकारांना जन्म देण्यात व विकसित करण्यात चर्चचे कार्य महत्त्वाचे ठरले. चर्चच्या आश्रयाने उदयास आलेले धर्मकेंद्रित संगीत ते चर्चसंगीत होय. वर निर्दिष्ट केलेल्या संगीतप्रकारांची लक्षणे पाहता चर्चसंगीताला दीर्घ व वैविध्यपूर्ण परंपरा असल्याचे दिसून येते.
ख्रिस्ती धर्मातील स्थित्यंतरांनुसार चर्च-संगीताचे स्वरूपही बदलत गेले. रोमन कॅथलिक, जर्मन आणि अँग्लिकन प्रॉटेस्टंट या धर्मपंथांचा या संदर्भात प्रामुख्याने उल्लेख करता येईल. सर्व परिवर्तनांत प्रमुख प्रेरणा म्हणून एका द्वंद्वाचा उल्लेख करता येईल. चर्चबाहेर लोकप्रिय असलेल्या लौकिक संगीताचा प्रभाव चर्च-संगीतावर पडू न देण्याचा कटाक्ष ठेवला पाहिले, असे मानणारा पक्ष आणि लोकांना आकर्षून घेण्याचा एक मार्ग म्हणून लौकिक संगीताचे विशेष चर्च-संगीतात सामावून घ्यावेत, हा विचार मांडणारा दुसरा पक्ष यात नेहमी द्वंद्व चालू होते. त्याचाच एक भाग म्हणून वाद्यसंगीताला चर्च-संगीतात स्थान असावे की नसावे, याबद्दलही परस्परविरोधी भूमिका घेतल्या गेल्या. या संदर्भात शब्दांना गौणत्व प्राप्त करून देणारे वाद्यसंगीत धर्मभावनेला पोषक नव्हे, असा विचार मांडण्यात आला.
या सर्व अवस्थांतून गेलेले पाश्चात्त्य चर्च-संगीत हे अर्वाचीन पाश्चात्त्य संगीतविश्वातही आपले विशिष्ट स्थान टिकवून आहे. डन्स्टबल (सु. १३७०–१४५३), पॅलेस्ट्रीना (सु. १५२५–९४), विल्यम बर्ड (सु. १५४३–१६२३), हेन्री पर्सेल (सु. १६५८–९५), हॅंडल (१६८५–१७५९), पेर्गोलेसी (१७१०–३६), मोट्सार्ट (१७५६–९१), बेथोव्हन (१७७०–१८२७) या संगीतकारांप्रमाणेच आधुनिक काळातील एल्गार (१८५७–१९३४), स्ट्राव्हिन्स्की (१८८२– ), ब्रिटेन (१९१३– ) या संगीतकारांनीही चर्च-संगीतात मोलाची भर टाकली आहे.
रानडे, अशोक