चर्च, आर्थर हॅरी : (१८६५—९३७). ब्रिटीश वनस्पतिविज्ञ व वनस्पति-चित्रकार. यांचा जन्म प्लिमथ येथे झाला व शिक्षण ॲबर्स्टविथ येथील युनिव्हर्सिटी महाविद्यालयात झाले. जीझस महाविद्यालयात यांना विज्ञानातील शिष्यवृत्ती मिळाली होती पुढे १९१०–३० या काळात ते ऑक्सफर्ड येथे प्रपाठक होते. ⇨शैवले, परिस्थितिविज्ञान, पुष्प-यंत्रणा, ⇨पर्णविन्यास इ. विषयांत त्यांनी केलेल्या संशोधनावरून त्यांची विशेष कल्पकता दिसते. पुढे दिलेल्या त्यांच्या काही चांगल्यापैकी ग्रंथांवरून त्यांच्या विद्वत्तेविषयी आणि उद्योगप्रियतेसंबंधी कल्पना येते. थॅलॅस्सिओफायटा अँड द सबएरियल ट्रॅन्समायग्रेशन (१९१९), द बिल्डिंग ऑफ ॲन ऑटोट्रॉफिक फ्लॅजेलेट (१९१९), ऑन द इंटरप्रिटेशन ऑफ द फेनॉमेना ऑफ फायलोटॅक्सिस (१९२०), टाइप्स ऑफ फ्लोरल मेकॅनिझम (१९०८), ऑन द रिलेशन ऑफ फायलोटॅक्सिस टू मेकॅनिकल लॉज (१९०१–०४)
जमदाडे, ज. वि.