चन्नव्वा राणी : (सु. १७७८–सु. १८३२). बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर संस्थानची शूर राणी. बेळगावजवळ धुळप्पा देसाई या सामान्य इनामदाराच्या कुटुंबात जन्मली. कित्तूरचा मल्लेसर्जा हा संस्थानिक तिच्या सौंदर्यावर भाळला आणि त्याने तिच्याशी लग्न केले. पती मल्लेसर्जा १८१६ साली वारला व तिची वडील सवत रूद्रम्मा हिचा मुलगा शिवलिंग रूद्रसर्जा हा गादीवर आला. हा मानी पुरूष होता. पण दुर्देवाने त्याला १८२४ सालीच मृत्यूने गाठले. त्याला मुलगा नसल्यामुळे चन्नव्वाने एका मुलास लोकसंमतीने दत्तक घेऊन त्याच्या नावाने ती राज्य कारभार पाहू लागली. कंपनी सरकारला ही गोष्ट मान्य न होऊन त्याने पोलिटिकल एजंट थॅकरे यास युद्धाचा हुकूम दिला. कॅ. ब्लॅंकने सैन्य घेऊन कित्तूरवर चढाई केली. चन्नव्वा बहादुरीने लढली. या लढाईत थॅकरे, कॅ. ब्लॅंक मारले गेले. नंतर इंग्रजांनी मोठे सैन्य पाठवून कित्तूर हस्तगत केले. चन्नव्वाच्या पराभवानंतर तिची प्रत्यक्षात काय स्थिती झाली, यासंबंधी फारशी माहिती ज्ञात नाही. काहींच्या मते तिने आपल्या रुद्रम्मा या सवतीसह मलप्रभा नदीत आत्महत्या केली असावी तर काहीजण ती इंग्रजांची कैदी होऊन बैलहोंगलच्या किल्ल्यात सु. पाच वर्षे बंदीवासात होती व तिथेच मरण पावली, असे अनुमान काढतात. स्वाभिमान व शौय या गुणांमुळे कर्नाटकात ती झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या तोडीची मानली जाते.
“