चतुर्थ कल्प : (क्वाटर्नरी). भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. या कालविभागाला चतुर्थ कल्प व या कल्पात या तयार झालेल्या खडकांना चतुर्थ संघ म्हणतात. हा कल्प सु. २० लाख वर्षांपूर्वी म्हणजे तृतीय कल्पानंतर (सु. ६·५–१·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) सुरू झाला असून तो अजून चालू आहे. हा नवजीव महाकल्पाचा सर्वांत नवीन विभाग आहे. मात्र त्याचा कालावधी इतका कमी आहे की, काहींच्या मते तो तृतीय कल्पाचाच भाग मानावा. याचे ⇨प्लाइस्टोसीन व रीसेंट (होलोसीन, अभिनव) हे विभाग पाडतात. प्लाइस्टोसीन सहा लाख तर रीसेंट विभाग ११,००० वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे मानतात.
या काळातील निक्षेप (खडकांच्या राशी) मुख्यतः उत्तर गोलार्धामध्ये आढळतात. वाळू, गोटे, जलोढ (पाण्याच्या प्रवाहाने वाहून आणलेला गाळ), नदीतील दगडगोटे, विटांकरिता लागणारी माती, धोंडेमाती इत्यादींचे निक्षेप प्रामुख्याने आढळतात.
जलवायुमानातील (दीर्घकालीन सरासरी हवामानातील) प्रचंड तफावत हे या कल्पाचे वैशिष्ट्य आहे. तृतीय कल्पाच्या मानाने हा थंड असून या काळात हिमाचे थर मध्य यूरोपापर्यंत व उत्तर अमेरिकेच्या मध्यापर्यंत आले होते आणि अंटार्क्टिकाजवळील बर्फाचे थर जास्त जाड आणि पसरलेले होते. हळूहळू हे हिम-बर्फाचे थर आता आहेत तेथपर्यंत मागे गेल्याने जलवायुमान सौम्य झाले. जीवाश्मांशिवाय (जीवांच्या अवशेषांशिवाय) हीमोढ (हिमनदीने वाहून आणलेला गाळ), उचलले गेलेले समुद्रकिनारे, धोंडेमाती, ओरखडे असणारे खडक इ. हिमानी (हिमनदीमुळे होणाऱ्या) क्रिया सुचविणारे पुरावेही आढळतात.
निर्वंश सस्तन प्राण्यांचे विपुल जीवाश्म प्लाइस्टोसीन काळात आढळतात. तसेच सध्या असणाऱ्या (उदा., मॉलस्का) प्राण्यांचे जीवाश्मही सापडतात. वनस्पतींचे जीवाश्म, आदिम मानवाचे सांगाडे, हत्यारे, कलावस्तू वगैरेही चतुर्थ कल्पातील निक्षेपांत आढळतात. प्लाइस्टोसीन काळाच्या मानाने रीसेंटमध्ये कमी जीवाश्म आढळतात.
भारतात या काळात हिमनद्या असल्याचे बिनतोड पुरावे मिळत नसले, तरी इतर गोष्टींवरून तेव्हा येथे अतिशीत जलवायुमान असल्याचे दिसते व उत्तर भारतात याचे स्पष्ट पुरावे मिळतात. दक्षिणेकडील निलगिरी, शेवराय, पलनी आणि पारसनाथ या उंच भागांत आढळलेले आणि काश्मीर, दीवाळ इ. भागांत आढळलेले प्राणी व वनस्पती सारखेच आहेत. फक्त शीत हवामानात जगणारे हे जीव राजस्थानच्या उष्ण व वाळवंटी भागातून दक्षिणेकडे जाणे शक्य नाही. म्हणजे ते चतुर्थ कल्पातील हिमयुगातच दक्षिणेकडे आले असावेत. त्या काळी राजस्थानाचे जलवायुमान शीतोष्ण असून तेथील काही ठिकाणी हिमही होते.
काश्मिरातील हिमनादेय केरवा निक्षेप, उत्तर सतलज व नर्मदा-तापी यांच्या तळाची मृदा, राजस्थानातील रेताड टेकाडे, पोटवार निक्षेप हे सर्व हिमोढ आहेत. पंजाब-सिंधमधील पिवळी व पूर्व किनाऱ्यावरील माती याच काळात निक्षेपित झाली आहे. भारतातील कॅंब्रियन पूर्व (सु.५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) निक्षेपांखालोखाल विस्ताराच्या दृष्टीने चतुर्थ कल्पातील निक्षेपांचाच क्रम लागतो. त्यांचे वर्गीकरण पुढील कोष्टकाप्रमाणे करतात.
काळ व वय (वर्षे) |
जलवायुमान |
भारतीय निक्षेप |
जीवविकास |
उत्तर प्लाइस्टोसीन (८० हजार) |
चतुर्थ हिमनादेय अवधी तृतीय अंतर हिमनादेय अवधी |
आधुनिक मृतिका पोटवार मृतिका |
आधुनिक जीव |
मध्य प्लाइस्टोसीन (२,५०,००० — ४,००,०००) |
तृतीय हिमनादेय अवधी
द्वितीय अंतर हिमनादेय अवधी |
नर्मदेची मृत्तिका नर्मदेची मृत्तिका |
नर्मदा नदी प्रकारचे जीव |
पूर्व प्लाइस्टोसीन (६,००,०००) |
द्वितीय हिमनादेय अवधी प्रथम अंतर हिमनादेय अवधी प्रथम हिमनादेय अवधी |
हिमनादेय खडक हिमनादेय खडक पिंजा प्रदेशातील धोंडेमाती |
घोडा, हत्ती, हिप्पोपोटॅमस. घोडा, हत्ती, डुक्कर. गेंडा, शिवाथेरियम. |
चतुर्थ कल्पाचे क्वाटर्नरी हे इंग्रजी नाव जे. देन्वाये यांनी १८२९ साली सुचविले (त्यामुळे १७६० सालापासून चालत आलेल्या प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय या नावांत भर पडली. प्राथमिक व द्वितीय या संज्ञा आता वापरात नाहीत. मात्र तृतीय आणि चतुर्थ या वापरल्या जातात).
संदर्भ : 1. Charlesworth, J. K. The Quaternary Era, 2 Vols., London, 1957.
2. Moore, R. C. Historical Geology, New York, 1953.
ठाकूर, अ. ना.
“