चक्रवर्ती, बिहारीलाल : (२१ मे १८३५—२५ मे १८९४). आधुनिक गीतिकवितेचे (गीतकाव्याचे) जनक म्हणून प्रसिद्ध असलेले बंगाली कवी. शालेय शिक्षण फारसे झाले नाही परंतु संस्कृत साहित्याचा त्यांचा चांगला व्यासंग होता. वाल्मीकी आणि कालिदास यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. इंग्रजी साहित्याचाही त्यांनी स्वतंत्रपणे अभ्यास केला. प्राचीन बंगाली साहित्याविषयी त्यांना विशेष प्रेम होते.
बिहारीलाल यांच्या साहित्यसाधनेला पूर्णिमा (१८५८) या त्यांनी सुरू केलेल्या मासिकाच्या द्वारे सुरुवात झाली. स्वप्नदर्शन नावाचा गद्य निबंधग्रंथ हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. त्यांनी पूर्णिमा, साहित्यसंक्राति व अबोधबंधु (१८६६) ही मासिके संपादिली होती. त्यांच्या बहुतेक कविता या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. संगीत शतक, बंधुवियोग (१८६३), निसर्ग संदर्शन (१८६९), वंग सुंदरी (१८६९),सारदा मंगल (१८७९), साधेर आसन सा (१८८८) हे त्यांचे उल्लेखनीय काव्यसंग्रह होत. सारदा मंगल काव्य सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे काव्य सर्वस्वी आत्मलक्ष्यी व कल्पनाप्रवण आहे. पाच सर्गांत ते विभागले आहे. त्याला आख्यान असे नाहीच.
बिहारीलाल कवीपेक्षा विचारवंत म्हणूनच अधिक प्रसिद्ध होते. त्यांच्या कवितेत अभिनिवेशाला प्राधान्य लाभल्याने पुष्कळदा भावना थिटी पडते. तरीही रवींद्रनाथ, कृष्णकमल भट्टाचार्य, द्विजेंद्रनाथ टागोर, अक्षयकुमार बडाल वगैरे मंडळी बिहारीलाल यांच्या काव्याची मनापासून भोक्ती होती. इतकेच नव्हे, तर रवींद्रनाथ त्यांना आपले काव्यगुरू मानीत. रवीद्रनाथांच्या सुरुवातीच्या कवितांवर बिहारीलाल चक्रवर्तींच्या काव्याची छाप दिसते.
बिहारीलालांच्या कवितेत बाह्यालंकरणाचा साज नाही, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास आहे. म्हणूनच त्यांचे काव्य स्वयंस्फूर्त, अंतःकरणापासून वाटते. त्यांची कल्पनाशक्ती जशी मौलीक, तशीच भाषाही चमकदार आहे. आपल्या काव्यभाषेत तत्सम व तद्भव शब्दांची सारखीच प्रतिष्ठा राखण्यात बिहारीलालांचे मोठेच कर्तृत्व व्यक्त झाले आहे.
सेन सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..