चंबा : हिमाचल प्रदेश राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण तसेच पूर्वीच्या चंबा संस्थानची राजधानी. लोकसंख्या ११,८१४ (१९७१). हे रावी नदीच्या उजव्या तीरावर, सिमल्याहून सु. १८५ किमी. वायव्येस वसलेले आहे. दहाव्या शतकापासूनची अनेक मंदिरे व त्यांचे अवशेष येथे पहावयास मिळतात. यांपैकी लक्ष्मीनारायणाचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. वास्तुशैलीच्या दृष्टीने (लाकडावरील कोरीवकाम) सर्वच मंदिरे प्रेक्षणीय आहेत. येथे ज्वारी, बाजरी, तांदूळ, लोकर, मध, लाकूड, सुती कपडे आणि फळे यांचा मोठा व्यापार चालतो. तसेच कशिदाकाम आणि चप्पल बनविण्यासाठी हे विशेष प्रसिद्ध आहे. येथील चंबा शाली, चंबा रुमाल व चंबा चप्पल भारतभर प्रसिद्ध आहेत. येथे संग्रहालय, कापड गिरण्या, औषधांचे कारखाने वगैरे आहेत. पुरातत्वीय अवशेषांच्या दृष्टीने चंबा विशेष महत्त्वाचे आहे.

कापडी, सुलभा