चंडोल : हा एक चिमुकला गाणारा पक्षी आहे. याच्या सहा-सात जाती भारतात आढळतात. त्या सगळ्यांचा समावेश ॲलॉडिडी पक्षिकुलात केलेला आहे. या जातींपैकी एक जाती उत्तम गाणारी म्हणून प्रसिद्ध असून ती भारतात सगळीकडे आढळते. तिला ‘छोटा चंडोल’ म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव ॲलॉडा गुलगुला असे आहे.
छोटा चंडोल चिमणीएवढा असतो. शरीराची वरची बाजू तपकिरी डोक्यावर तपकिरी रंगाचा अस्पष्ट तुरा डोळ्याच्या वर फिक्कट पिवळा पट्टा पंख आणि शेपटी गडद तपकिरी खालची बाजू पिवळसर छाती करड्या रंगाची आणि तिच्यावर तपकिरी रेषा गळ्यावर तपकिरी ठिपके पाय आणि चोच पिवळसर तपकिरी असतात. नर व मादी सारखीच दिसतात.
सपाट प्रदेशातील आणि डोंगरावरील गवताळ कुरणे व शेते यांत राहणारा हा पक्षी आहे. तलावांच्या काठावरील दमट गवताळ जमिनींची याला विशेष आवड आहे. जमिनीवर अगदी दबून बसण्याची याची सवय आणि परिस्थितीशी जुळणारा याचा रंग यामुळे त्याच्या अगदी जवळ जाईपर्यंत तो आपल्याला दिसत नाही. जवळ गेल्यावर तो भुरदिशी उडतो तेव्हा दिसतो. जमिनीवर पडलेले धान्य, बिया व किडे हा खातो. यांची जोडपी वा लहान विस्कळित टोळकी असतात.
वसंत ऋतूत याच्या प्रियाराधनाला सुरुवात होते. या काळातील त्याचे गायन फार गोड असते व भराऱ्या प्रेक्षणीय असतात. बसलेल्या ठिकाणावरून तो सरळ उभा वर हवेत उडतो, पंख फडफडवीत व पाय लोंबते
ठेवून तो वर जात जात दिसेनासा होतो, वर जात असताना त्याचे सुरेल गायन सुरू असते. अगदी उंच गेल्यावर तो सु. ५–१० मिनिटे हवेतच स्थिर राहतो. पंख फडफडविणे व गायन चालूच असते. नंतर पंख मिटून घेऊन, एखादा दगड खाली पडावा त्याप्रमाणे तो काही अंतरापर्यंत खाली येतो पुन्हा पंख उघडून काही वेळ ते फडफडवतो, पुन्हा ते मिटून खाली येतो. अशा तऱ्हेने टप्प्याटप्प्याने थांबत थांबत तो खाली येतो. जमिनीपासून थोड्या अंतरावर आल्यावर एकदम तिरका सूर मारून ज्या ठिकाणावरून तो निघतो तेथे येऊन उतरतो. हे सगळे खेळ मादीच्या समोरच चालू असतात. पुष्कळदा कित्येक प्रतिस्पर्धी नर कुरणात एकाच वेळी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करताना दिसतात. कधीकधी बसलेला असातानाच हा गात असतो.
प्रजोत्पादनाचा काळ काहीसा अनिश्चित असला, तरी मुख्यतः फेब्रुवारी पासून जुलैपर्यंत असतो. एखाद्या मातीच्या ढेकळाच्या किंवा गवताच्या झुपक्याखाली असलेल्या वाटीसारख्या उथळ खळग्यात गवत टाकून हा घरटे तयार करतो. मादी फिक्कट तपकिरी करड्या वा पांढरट रंगाची २—४ अंडी घालते. त्यांच्यावर तपकिरी ठिपके वा रेषा असतात.
कर्वे, ज. नी.
“