घृत : तूप. आयुर्वेदात मुख्यतः गाईचे तूप. प्राणिज द्रव्यांमधले हे सर्वश्रेष्ठ द्रव्य. हे जितके जुने तितके उत्कृष्ट कार्य करणारे. हे उत्तम संस्कारक्षम व योगवाही आहे. स्वतः वात व पित्तनाशक असल्यामुळे वात व पित्तनाशक द्रव्यांचा संस्कार चांगला होऊन ते उत्कृष्ट कार्यकारी होतेच पण कफनाशक द्रव्यांचाही संस्कार यावर उत्तम होतो. ते त्या द्रव्यांच्या संस्कारांनी कफनाशकही होते. ते मधुर, सौम्य, मृदू, शीतवीर्य, स्निग्ध, गुरू असून अग्निदीपक आहे. स्मृती, मेधा, कांती, स्वर, लावण्य, सौकुमार्य, ओज, तेज, बल व आयुष्य वर्धक असून शुक्रधातू व दृष्टी यांना हितकर व रसायन आहे. उन्माद, अपस्मार, शूल, व्रण, दुष्टव्रण, कोणतेही वातपित्तजन्य रोग, विशेषतः जुने रोग नष्ट करते. याला सर्वस्नेहोत्तम म्हटले आहे.
जोशी, वेणीमाधवशास्त्री