घर्मग्रंथि : (स्वेद ग्रंथी). घाम उत्पन्न करणाऱ्या ग्रंथींना ‘घर्म ग्रंथी’ असे म्हणतात. या ग्रंथी अंतस्त्वचेमध्ये असतात. प्रत्येक ग्रंथी एका नळीच्या वेटोळ्याची बनलेली असून ती त्वचेच्या सर्वांत आतल्या थरात असते. त्या नळीचे टोक सरळ येऊन त्वचेच्या बाहेरच्या थरांत वळणे घेऊन पृष्ठभागावर उघडते. या नळीच्या वेटोळ्याला केशिका (सूक्ष्म रक्तवाहिन्या) आणि तंत्रिका (मज्जा) यांचा भरपूर पुरवठा असल्यामुळे घामाची निर्मिती जरूरीप्रमाणे होते. या तंत्रिका अनुकंपी तंत्रिका तंत्राच्या (स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या तंत्रिकांच्या यंत्रणेच्या) शाखा असून त्यांच्या उत्तेजनामुळे ग्रंथीमधील घामाचे प्रमाण वाढते. प्रौढ शरीरात अदमासे २५ लक्ष घर्म ग्रंथी असतात. या ग्रंथी शरीरावरील त्वचेमध्ये सर्वत्र सारख्या प्रमाणात नसतात. कपाळ, वरचा ओठ, मान, छाती वगैरे भागात त्यांची संख्या जास्त असल्यामुळे तेथे घाम जास्त येतो. निव्वळ पाण्यासारखा आणि वासरहित घाम स्रवणाऱ्या घर्म ग्रंथींना ‘इक्राइन’(स्रावी) आणि दुधाळ रंगाचा दर्पयुक्त घाम स्रवणाऱ्या घर्म ग्रंथींना ‘अपोक्राइन’(अपभेदक) घर्म ग्रंथी असे म्हणतात. इक्राइन ग्रंथी सर्व शरीरावर असतात अपोक्राइन ग्रंथी काखा, जननेंद्रिये, जांघा, कान व नाक आणि तुरळक प्रमाणात पाठीवर असतात. त्या ग्रंथीच्या स्रावावर सूक्ष्मजंतूंची क्रिया झाल्यास त्याला ‘घामट’ दर्प येतो.
घामाचे पृथःकरण केल्यास त्यात ९९·५% पाणी आणि ०·५% घन पदार्थ विरघळलेले असतात. घन पदार्थांत सोडियम क्लोराइडाचे प्रमाण सर्वाधिक असते. यूरिया आणि दुग्धाम्ल लवण (लॅक्टिक अम्लाचे लवण) थोड्या प्रमाणात असतात.
सर्वसाधारण प्रौढ व्यक्तीमध्ये रोज सरासरी १,५०० मिलि. इतका घाम स्रवला जातो. असाधारण परिस्थितीत एका दिवसात १० लि. इतकाही घाम जाऊ शकतो. असा फार घाम आला, तर त्याबरोबर शरीरातील लवणे बाहेर गेल्यामुळे स्नायूंत पेटके येणे वगैरे लक्षणे दिसतात. ती लक्षणे कमी करण्यासाठी पोटात वा नीलेतून मिठाचा विद्राव द्यावा लागतो.
सभोवतालचे तापमान, हवेतील बाष्प, शारीरिक श्रम, शरीरातील उष्णतेमध्ये होणारी वधघट व भावनोद्रेक यांवर घाम स्रवण्याची क्रिया अवलंबून असते. उन्हाळ्यात घाम जास्त येतो. शारीरिक श्रम केल्यास हिवाळ्यातही पुष्कळ घाम येतो. भीती, राग वगैरे भावनोद्रेकांमुळेही घाम जास्त येतो.
घामाचे दोन प्रकार आहेत. सर्व दिवसभर विसरण पद्धतीने (झिरपण्याच्या पद्धतीने) त्वचेतून जाणाऱ्या घामाला ‘अलक्षित’ (न समजणारा) घाम म्हणतात. प्रत्यक्ष दिसणाऱ्या घामाला ‘लक्षित’ घाम म्हणतात. अलक्षित प्रकाराने दिवसातून सु. ६०० मिलि. पाणी उत्सर्जित होते.
घामाच्या बाष्पीभवनामुळे शरीराची उष्णता कमी होते. पर्यायाने, शरीरातील उष्णता वाढली, तर ती कमी करणे हे घर्म ग्रंथींचे मुख्य कार्य आहे. घामावाटे निरुपयोगी पदार्थ उत्सर्जित करणे हे दुय्यम कार्य आहे. अधोथॅलॅमसामधील (मोठ्या मेंदूच्या पुढच्या भागाच्या मध्य भागाचा थॅलॅमसाच्या खालील भागामधील) उष्णता नियंत्रक केंद्राकडून उष्णता नियंत्रणाचे कार्य होत असते. त्या केंद्रातील कोशिका (पेशी) अधिक उष्णतेने उत्तेजित झाल्या म्हणजे तेथे उत्पन्न होणारी प्रेरणा तंत्रिका तंतुमार्गे अनुकंपी तंत्रिका तंतुद्वारे घर्म ग्रंथीकडे पोहोचली म्हणजे घाम उत्पन्न होऊन उष्णतेचे नियंत्रण होते. शरीराची उष्णता योग्य मर्यादेत आल्यानंतर घाम येणे बंद होते. या उष्णता नियंत्रणाचे कार्य ‘इक्राइन’ जातीच्या घर्म ग्रंथींमार्फत होते. अपोक्राइन ग्रंथींचे मुख केशमुलाशी असून त्याच्या स्रावाचा उष्णता नियंत्रणाशी संबंध नसतो.
शिरोडकर, शा. ना.
“