घातपात : ‘सॅबोटाज’ या मूळ फ्रेंच संज्ञेचा घातपात हा मराठी पर्याय आहे. एखादे चालू कार्य हाणून पाडण्यासाठी त्या कार्यात व्यत्यय आणून केलेले आततायी व अनिष्ट कृत्य म्हणजे घातपात. साधारणपणे घातपात हा शब्दप्रयोग जाणूनबुजून केलेले कोणतेही घातक कृत्य दर्शविण्यासाठी वापरण्यात येत असला, तरी विशेषत्वाने त्याचा वापर एखादी लष्करी कारवाई हाणून पाडण्यासाठी, योजनापूर्वक करण्यात येणारी प्रतिलष्करी घातपाती कारवाई, या अर्थीच केला जातो. दुसऱ्या जागतिक महायुद्धात दोन्ही पक्षांनी वापरलेल्या परिणामकारक घातपाती योजनांवरून वरील अर्थाने हा शब्द रूढ झाला आहे. १९१० मध्ये फ्रेंच रेल्वे कर्मचाऱ्यांनी संपकाळात रूळांचे तळपाट (स्लीपर) कापून आपला विरोध दर्शविला. फ्रेंच भाषेत तळपाटाला ‘सॅबो’ (Sabot) म्हणजे ‘लाकडी जोडा’ म्हणतात. या सॅबोपासूनच ‘सॅबोटाज’(Sabotage) शब्द रूढ झाला.
आर्थिक, राजकीय किंवा सामाजिक बदलासाठी स्वातंत्र्यासाठी आणि जुलमी व अन्यायी अशा स्वकीय शासनाच्या उच्चाटनासाठी व्यक्तिगत वा सांघिक घातपाती कृत्ये करण्यात येतात. दहशत (टेररिझम) व घातपात हे विघ्वंसक विरोधाचे दोन प्रकार आहेत. भारतातील स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात भारतीय जनतेने अनेकदा घातपाताचा अवलंब केल्याचे दाखले सापडतात. बँका व सरकारी खजिने लुटणे पोलीसांच्या, लष्कराच्या बराकी, ठाणी उद्ध्वस्त करणे वीज उत्पादन व वीजपुरवठा बंद पाडणे संदेशवहन यंत्रणा विस्कळीत करणे रेल्वे, पूल, स्टेशने उडवून देणे करबंदी करणे परकीयांना मदत करणाऱ्या स्वकीयांना हरतऱ्हेने त्रास देणे कारखाने व यंत्रांची मोडतोड करणे वगैरेंसारखी कृत्ये ही घातपाती कृत्येच होत. अशा घातपातामुळे शासनयंत्रणा खिळखिळी होऊन मध्यवर्ती सत्ता दुबळी होते. राज्यकर्ते असा घातपात करणाऱ्यांचा अत्यंत निर्घृणतेने सूड घेतात.
विसाव्या शतकात यूरोपात व दक्षिण अमेरिकेत जे काही मुक्तिसंग्राम वा क्रांत्या झाल्या, त्यांत दहशतवादाबरोबरच घातपाताचाही अवलंब मोठ्या हिरिरीने करण्यात आला. अमेरिकेच्या यादवी युद्धातही हा प्रकार अवलंबिण्यात आला. आफ्रिकेतील ब्रिटिश व फ्रेंच साम्राज्यसत्तांविरुद्ध झालेल्या लढ्यांतही घातपात करण्यात आले. गनिमी युद्धतंत्रात घातपातावर मोठा भर दिला जातो. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी जर्मनव्याप्त प्रदेशातील जनतेला जर्मनांना विरोध करण्याची चेतावणी देऊन त्यांच्याकरवी घातपाताची कृत्ये घडवून आणली.
याउलट जर्मनीने पंचमस्तंभियांकरवी दोस्तसैन्याच्या पिछाडीस घातपात घडवून आपल्या चढाईचा कार्यक्रम सुलभ केला. या महायुद्धात लष्करी छत्रीधारी सैन्य व कमांडो हेही घातपाताकरिता वापरण्यात आले. राजकीय सत्तास्पर्धा तसेच विशिष्ट राजकीय मतप्रणाली यांमुळे घातपाताचा पुरस्कार आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर रुळत चालल्याचे दिसते.
पहा : कमांडो गनिमी युद्धतंत्र.
दीक्षित, हे. वि.