डोनेट्स नदी : रशियातील डॉन नदीची एक प्रमुख उपनदी. लांबी १,०५० किमी. जलवाहन क्षेत्र सु. १,००,००० चौ. किमी. ही मध्यरशियाच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून दक्षिणेस बेलगोरॉडवरून आणि खारकॉव्हच्या पूर्वेने वाहत जाऊन मग आग्नेयीस वळून डोनेट्स द्रोणीप्रदेशात कॉन्स्टँटिनोपलच्या खाली डॉनला मिळते. हिला डावीकडून अस्कॉल व आइडार आणि उजवीकडून लॅगून या नद्या मिळतात. डोनेट्स द्रोणीप्रदेशातील उद्योगांस या नदीच्या पाण्याचा मुख्यतः उपयोग होतो परंतु त्यामुळे जलप्रदूषण फार होते. डिसेंबर ते मार्च नदी गोठल्यामुळे वाहतुकीस उपयोगी पडत नाही. एरव्ही मुखापासून २१० किमी. पर्यंत ती वाहतुकीस उपयोगी पडते. त्यासाठी १९१४ पासून जलपाशांची (लॉक्स) सोय केलेली आहे. हिचे पाणी एका कालव्याने डोनेट्स शहराला पुरविलेले आहे. नदीत व औद्योगिक विभागात पाण्याचा तुटवडा पडल्यामुळे १९७० नंतर नीपर नदीचे पाणी कालव्याने आणून या नदीत सोडले आहे.

लिमये, दि. ह.