डी ड्यूव्हे, क्रिश्चन आर्. : ( २ ऑक्टोबर १९१७– ). बेल्जियन वैद्य. त्यांनी कोशिका (पेशी) विज्ञानात मोलाची भर घातली व त्याबद्दल त्यांना ॲल्बर्ट क्लोड व ⇨जॉर्ज एमील पॅलेड यांच्याबरोबर १९७४ चे वैद्यकाचे किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषित देण्यात आले. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. बेल्जियममधील लूव्हीं विद्यापीठाची वैद्यकाची पदवी (१९४१) व स्नातकोत्तर पदवी (१९४६) मिळविल्यावर त्यांनी काही काळ स्टॉकहोमच्या नोबेल इन्स्टिट्यूटमध्ये व वॉशिंग्टन विद्यापीठाच्या कार्ल कोरी इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन केले. नंतर ते लूव्हीं विद्यापीठात परत आले व पुढे तेथे कोशिकाविज्ञानाचे प्राध्यापक झाले. १९६२ साली त्यांनी अशाच प्रकारचे अर्ध वेळ काम रॉकफेलर विद्यापीठातही स्वीकारले. यूरोप व अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी त्यांचा सन्मान केला आहे.
क्लोड यांनी केंद्रोत्सारक (उच्च गतीने फिरणाऱ्या व केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेच्या तत्त्वाचा उपयोग करून पदार्थ अलग करणाऱ्या) उपकरणाच्या साहाय्याने कोशिकेतील घटक वेगळे केले व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने कोशिकेचा सविस्तर अभ्यास केला व नंतर डी ड्यूव्हे व पॅलेड यांनी क्लोड यांच्या तंत्रात सुधारणा केल्या व सूत्रकणिका, सूक्ष्मकाय (मायक्रोसोम), रिबोसोम, पेरॉक्सिसोम आणि लायसोसोम या कोशिकेच्या घटकांच्या व्याख्या निश्चित करून त्यांची कार्ये कोणती हे तपासून पाहिले. अशा तऱ्हेने या तिघांच्या कार्यामुळे कोशिकांमध्ये विशेषित असे अनेक घटक वा ग्रॅनेल्स असून ते पुढील कार्ये करू शकतात, हे कळून आले : पोषक द्रव्याचे पचन, कोशिकेत होणारी हानी भरून काढणे, कोशिकाद्रव्याचे (कोशिकेचे केंद्रक व बाह्य पटल यांच्यातील आधारक द्रव्याचे) संश्लेषण, चयापचयाचे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींचे) नियंत्रण व कोशिकेच्या बाह्य पटलावर हल्ला करणाऱ्या जंतूंचा नाश करणे. कोशिकांच्या दोषपूर्ण कार्यामुळे उद्भवणाऱ्या पुष्कळ रोगांवरील उपाय शोधण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जात आहे.
इ. स. १९५५ मध्ये डी ड्यूव्हे यांनी कोशिकाद्रव्यात लायसोसोम असतात, हे शोधून काढले. लायसोसोम विविध आकारांचे व आकारमानांचे असून ते प्राणी व वनस्पती यांच्या सर्व प्रकारच्या कोशिकांत आढळतात. पचन तंत्राप्रमाणे कार्य करणाऱ्या कोशिकेने आत घेतलेल्या सर्व प्रकारच्या द्रव्याचे लहान घटकांत रुपांतर करण्याची क्षमता असलेले एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारा प्रथिनयुक्त पदार्थ) लायसोसोमामध्ये असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच विषारी ठरू शकणारे रेणू लायसोसोमांमुळे नष्ट होतात. लायसोसोमांची कमतरता वा दोष यामुळे ग्लायकोजेनॉसीस (यकृत व प्लीहा यांची त्रासदायक स्थिती) व टेसाक्स (दृक् पटलावर तांबडा ठिपका येणे व नंतर अंधत्व येणे, वजन घटणे अशी लक्षणे असलेला रोग) हे रोग होतात.
याशिवाय कोशिकेच्या क्रियाप्रवणतेच्या पद्धती, तसेच लायसोसोम व पेरॉक्सिसोम यांची एंझाइमी प्रवणता शोधणे, मधुमेहात इन्शुलीन व ग्लुकागॉनाच्या क्रियेविषयीच्या कार्बोहायड्रेट चयापचयासंबंधीचे संशोधन इ. कार्येही त्यांनी केली आहेत.
ग्लुकोज अँड इन्शुलीन इन डायाबेटीज (१९४५) हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
ठाकूर, अ. ना.