डॉप्लर, क्रिस्टिआन योहान : (२९ नोव्हेंबर १८०३–१७ मार्च १८५३). ऑस्ट्रियन गणिती व भौतिकीविज्ञ. ध्वनी व प्रकाश तरंगांसंबंधीच्या ‘डॉप्लर परिणाम’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या आविष्काराचे संशोधक म्हणून विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म सॉल्झबर्ग येथे झाला. सॉल्झबर्ग व व्हिएन्ना येथे शिक्षण घेतल्यानंतर ते प्राग येथील तंत्र विद्यालयात गणिताचे प्राध्यापक (१८४१) व पुढे व्हिएन्ना विद्यापीठात प्रायोगिक भौतिकीचे प्राध्यापक व विद्यापीठाच्या फिजिकल इन्स्टिट्यूटचे संचालक (१८५०) झाले.
त्यांनी १८४२ साली एका निबंधाद्वारे त्यांचा विख्यात ‘डॉप्लर परिणाम’ प्रसिद्ध केला. ध्वनीच्या बाबतीत हा परिणाम १८४५ मध्ये सी. एच्. डी. बॉइस बालॉट यांनी प्रायोगिक रीत्या पडताळून पाहिला. प्रकाशाच्या बाबतीत या परिणामाचे योग्य स्पष्टीकरण ए. फीझो यांनी १८४८ मध्ये दिले. ताऱ्यांची गती व तारकायुग्मे यांच्या अभ्यासासाठी डॉप्लर परिणामाचा उपयोग करण्यात येतो. डॉप्लर व्हिएन्ना येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.