डायोराइट : खोल जागी तयार झालेला भरडकणी अग्निज खडक. हा मुख्यतः प्लॅजिओक्लेज (ऑलिगोक्लेज-अँडेसाइन, सु. २/३ ) व हॉर्नब्लेंड यांचा बनलेला असतो. यात थोडेसे कृष्णाभ्रक, ऑर्थोक्लेज व कधीकधी ऑजाइट व हायपर्स्थीन ही खनिजेही असतात. याचा एक तृतीयांश भाग काळ्या खनिजांचा बनलेला असतो. मॅग्नेटाइट, इल्मेनाइट, ॲपेटाइट (क्वचित झिर्कॉन व स्फीन) ही यातील गौण खनिजे होत. यात क्वार्ट्झ नसते किंवा थोडेसेच असते. याचा रंग करडसर, काळा व कधीकधी हिरवटही असतो. बहुधा कण सारख्याच आकारमानाचे असल्याने वयन (पोत) कणीदार असते. कधीकधी प्लॅजिओक्लेज वा हॉर्नब्लेंड यांचे मोठे स्फटिक यात असल्याने पृषयुक्त वयनही असते. पुष्कळदा यात प्रवाही व पट्टेदार संरचनाही असते. शिलापट्ट, भित्ती यांसारख्या अलग राशींच्या रूपात किंवा ग्रॅनाइट व गॅनोडायोराइटाच्या मोठ्या राशींच्या कडांशी ग्रॅनाइट, ग्रॅनोडायोराइट, गॅब्रो वगैरे खडकांच्या जोडीने हा आढळतो. जर्मनी व. उ. अमेरिकेत हा विपुल आढळतो. पुरेशी सिलिका असणारा शिलारस खोल जागी सावकाश निवून, ग्रॅनाइटी शिलारसाचे अल्पसिकत (कमी सिलिका असणाऱ्या) खडकांनी किंवा उलट संदूषण होऊन व त्यांच्यातील विक्रियांद्वारे संकरण होऊन वा कायांतरणाने म्हणजे जुन्या खडकांमध्ये घनस्थितीत बदल होऊन डायोराइट तयार होत असावा. यातील प्लॅजिओक्लेजाचे प्रमाण वाढल्यास ⇨ॲनॉर्थोसाइट, क्वार्ट्झ पाच टक्क्यांहून जास्त झाल्यास टोनॅलाइट (क्वार्ट्झ डायोराइट), पोटॅश फेल्स्पार पाच टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास ⇨माँझोनाइट आणि क्वार्ट्झ व पोटॅश फेल्स्पार ही दोन्ही वाढली, तर ⇨ग्रॅनोडायोराइट खडक बनतो.