डायोनायसस : प्राचीन ग्रीसमधील एक लोकप्रिय पुरुषदेवता. वनस्पती, सुफलता, मद्य यांचा तो देव मानला जाई. दुःखपरिहार करणारी देवता, वाग्देवता तसेच संगीत व काव्य यांची स्फूर्तिदात्री देवता म्हणूनही तो मानला जाई. ‘बॅकस ’ असेही त्याचे नाव आढळते. शेती सुफल करणारा व मद्य आणणारा देव म्हणून त्याची प्रसिद्धी होती.
ग्रीक पुराणकथेनुसार डायोनायसस हा झ्यूस आणि कॅडमसची कन्या सेमली यांचा पुत्र. जन्म थीब्झ येथे.
सेमलीचा मत्सर करणाऱ्या हेराच्या सांगण्यावरून सेमलीने झ्यूसकडून असे वचन घेतले, की त्याने त्याच्या मूळ दिव्यरूपात तिच्यापुढे यावे. त्याप्रमाणे झ्यूस आपल्या मूळ विजेच्या दिव्यरूपात सेमलीपुढे प्रगट होताच, सेमली जळून खाक झाली. झ्यूसने सेमलीच्या उदरातील गर्भ स्वतःच्या मांडीत दडवून वाचविला. नंतर यथाकाल झ्यूसच्या मांडीतून ज्या मुलाचा जन्म झाला, तोच डायोनायसस. बाल डायोनायससला प्रथम सेमलीची बहीण आयने हिने आणि नंतर पऱ्यांनी न्यासा पर्वतावर वाढविले. डायोनायससबाबतच्या विविध कथा ग्रीक पुराणकथेत आहेत.
डायोनायसस हा मुळात आशियातील थ्रेको-फ्रिजीयन देव असावा असे अभ्यासक मानतात. इ. स. पू. १२०० च्याही पूर्वीपासून तो ग्रीकांना ज्ञात होता व त्याची तेथे उपासना होत होती. होमर आणि हीसिअडनेही त्याचा आपल्या साहित्यात उल्लेख केला आहे. मूलतः थ्रेस व फ्रिजीया येथून त्याचा उपासनासंप्रदाय ग्रीसमध्ये आल्याचे दिसते. थ्रेस आणि फ्रिजीया येथील त्याच्या उपासनेत उपासक झपाटलेल्या अवस्थेत अथवा डायोनायससशी तद्रूप होऊन तसेच मद्यपान करून बेभानपणे नृत्य करीत आणि त्याला पशूंचा बली अर्पण करीत. बली देण्यात येणाऱ्या पशूला फाडून, त्यांचे तुकडे तुकडे करून ते मांस उपासक खात. त्याच्या उपासनेतील हा उच्छृंखल उत्सवाचा (ऑर्गी ) विधी महत्त्वाचा भाग असे. ग्रीसमधील त्याच्या उपासनेत मात्र हा विधी बराच सौम्य झाला.
ग्रीसमध्ये डायोनायससच्या उपासनेचा परिचय व प्रसार होताच ग्रीक धर्मात गूढवाद आणि उपासनेतील उच्छृंखल उत्सव हे विशेष प्रविष्ट झाले. डायोनायससचे उपासक दुधाची किंवा मद्याची कारंजी जमिनीतून निर्माण करण्याचे चमत्कार करतात तसेच त्यांच्या अंगी केवळ हाताने बोकड वा बैल फाडून त्याचे तुकडे तुकडे करणे अशा प्रकारच्या अलौकिक शक्ती वास करतात, अशा समजुती प्रचलित होत्या. डायोनायससने आपल्या उपासनासंप्रदायाचा प्रसार करून आपले देवत्व सर्वांना सक्तीने वा खुशीने मान्य करावयास लावल्याच्या अनेक कथा ग्रीक पुराणांत आढळतात.
डायोनायससला ‘लायस’ म्हणजे आपल्या भक्तांची चिंता हरण करून त्यांना संगीत व काव्याची स्फूर्ती देणारा देवही म्हटले जाई. त्याचा संबंध डिथिरॅम गीते, शोकात्मिका आणि सुखात्मिका यांच्याशी होता. अथेन्स, क्रीट व सिटी डायोनायसीया येथे होणाऱ्या नाट्यस्पर्धा त्याच्याच उत्सवप्रसंगी होत असत. त्याचे स्त्रीपुरुष सेवक वा भक्त ‘बॅकँटिस’ म्हणून ओळखले जात. त्याच्यासमवेत ‘सॅटर्स’ आणि ‘सायलीनाय’ ह्या गौणदेवताही असत. देवासुर युद्धात त्याने देवांचा पक्ष घेतल्याचीही कथा आढळते. नॅक्सॉस येथील ॲरिॲडनी (क्रीटन मातृदेवता) हिच्याशी डायोनायससचे साहचर्य असून ती त्याची पत्नी मानली जाई. त्यांचा विवाहसमारंभ दरवर्षी तेथे उत्सवपूर्वक साजरा होई.
डेल्फाय येथील पुरोहित अपोलोप्रमाणेच डायोनायससलाही भविष्य जाणणारा देव असे मानीत. तो सुफलतेचा देव असल्यामुळे त्याच्या उपासनाविधीत लिंगास प्राधान्य होते. तो पशूंचीही रूपे धारण करताना दिसतो. त्याचे साहचर्य बैल, चित्ता, सिंह, वाघ, साप, बोकड इत्यादींशी आढळते.
कोमल, स्त्रीसदृश चर्या असणारा सुंदर देव म्हणून कलेत त्याचा आविष्कार आढळतो. हातात द्राक्ष वा मद्यचषक तसेच द्राक्षवेलींनी वेढलेला दंड, दाढी वाढलेली अशा रूपातील तसेच बालरूपातीलही त्याच्या अनेक मूर्ती आढळतात.
सुर्वे, भा. ग.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..