डायना : रोमन देवतासमूहातील एक स्त्रीदेवता. मुळात ती एक वनदेवता मानली जाई. ग्रीक देवता आर्टेमिस आणि डायना ह्या एकच असल्याचे मानले जाते. डायना (आर्टेमिस) ही ज्यूपिटर (झ्यूस) व लेटोना (लेटो) यांची कन्या व अपोलोची जुळी बहीण. ती निष्कलंक कुमारी तसेच वनदेवता व पारधदेवता मानली जाई. तिच्या ग्रीक रूपानुसार वन्य प्राण्यांचीही ती स्वामिनी होती. सुफलतेशी असलेल्या डायनाच्या घनिष्ठ संबंधामुळे स्त्रिया गर्भधारणा व्हावी म्हणून तसेच प्रसूती सुलभ व्हावी व नवजात बालकाचे संरक्षण व्हावे म्हणून तिची उपासना करीत.
डायनाचा मुळात चंद्राशी संबंध दिसत नाही तथापि तिचे आर्टेमिसशी तादात्म्य प्रस्थापित झाल्यानंतर,
आर्टेमिसचा चंद्राशी असलेला संबंध डायनाशीही जोडला जाऊन ती चंद्रदेवता व नंतर प्रकाशाची देवता बनली.
डायनाच्या उपासनेचे लॅटिन लीगमध्ये अरिशीआ व ॲव्हन्टाइन येथील दोन प्रमुख संप्रदाय होते. रोमच्या दक्षिणेस अरिशीआजवळ नेमी सरोवराच्या काठी ‘डायना नेमोरेन्सिस’ म्हणजे वनदेवता डायना नावाचे तिचे प्रमुख केंद्र होते. लॅटिन लीगमधील सर्वांचेच हे प्रमुख उपासनाकेंद्र असल्यामुळे त्याला राजकीय दृष्ट्याही महत्त्व होते. व्हर्बीयस हा वीरदेव तसेच ईजीरिया ही देवी या गौण देवतांसमवेत डायनाची तेथे उपासना होत असे. सुरुवातीस लॅटिन लीगमध्ये रोमचा अंतर्भाव नव्हता पण नंतर रोमकडे लॅटिन लीगचे नेतृत्व आल्यावर डायनाचा उपासनासंप्रदाय रोममध्येही आला. रोममधील ॲव्हन्टाइन टेकडीवर एका उपवनात डायनाचे मंदिर उभारले गेले. १३ ऑगस्ट (आइड्स) हा तिच्या उत्सवाचा प्रमुख दिवस होता व ह्या दिवशी स्त्रिया तिची मनोभावे पूजा करीत. अरिशीआ येथील तिच्या मंदिरातही स्त्रिया तिला पुष्पमाला अर्पण करीत तसेच हातात दीप वा मशाल घेऊन मिरवणुकीने तेथे जाऊन आपले नवस फेडत. डायनाच्या उपासनेत सुरुवातीच्या काळात कुमारिकांना आणि नंतर विवाहित स्त्रियांना महत्त्व प्राप्त झाले तथापि अरिशीआ येथील तिचा पुरोहित मात्र मुक्त झालेला पुरुष-गुलामच असे. डायना ही खालच्या वर्गाची, विशेषतः गुलामांची संरक्षक देवता मानली जाई. १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तिच्या उत्सवप्रसंगी सर्व गुलामांना सुटी दिली जाई. आधीच्या गुलाम पुरोहिताचा नव्या गुलामाने द्वंद्वात वध केला म्हणजे प्रथेनुसार तो तिचा नवा पुरोहित बने. आर्टेमिस-टोरोपोलस हिला नरबली देण्याच्या ग्रीक प्रथेशी ह्या प्रथेचे साम्य दिसते. धार्मिक खेळांच्या वेळी रोममध्ये ॲव्हन्टाइन-डायनाची व अपोलोची संयुक्तपणे उपासना होई. आर्टेमिस ही लावण्यवती चंद्रदेवता, पारधदेवता, वनदेवता व मातृदेवता वा आदिमाता ह्या स्वरूपांतही उपासनेत होती. आशिया मायनरमधील इफसस येथील तिचे मंदिर जगातील सात प्राचीन आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून प्रख्यात होते. डायना-आर्टेमिस यांचा कलेतही सुंदर आविष्कार आढळतो. हातात मशाल वा धनुष्य, पाठीवर बाणांचा भाता आणि जवळ हरीण वा शिकारी कुत्रा, अशी त्यांची सुंदर शिल्पे आहेत.
सुर्वे, भा. ग.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..