डाकोर : गुजरात राज्याच्या खेडा जिल्ह्यातील हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १६,०९२ (१९७१). हे पश्चिम रेल्वेच्या आणंद—ग्रोधा या लोहमार्गावरील आणंदपासून सु. ३२ किमी. आहे. तेथे द्वारकाधिशाचे (श्रीकृष्णाचे) मंदिर असून श्रीकृष्णास रणछोडजी किंवा डाकोरजी असे म्हणतात. फार पूर्वी डंकमुनींनी उग्र तपश्चर्येने शंकराला प्रसन्न करून घेतल्यामुळे ते लिंगरूपाने येथेच राहिले, त्यावरून डंकक्षेत्र–डंकपूर–डाकोर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. येथे अनेक मंदिरे असून रणछोडजीचे ५१ मी. × ४६ मी. मंदिर प्रमुख आहे. त्याचे शिखर २४ मी. उंच असून त्यावर सोन्याचा कळस आहे. रणछोडजीची चतुर्भुज उभी मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. पहिल्या लहान मंदिराची पेशवेकाळात वाढ झाली. बडोद्याच्या नरेशांनी सुवर्णाचा देव्हारा दिला. दिवसातून सहा वेळा कोणासही पादस्पर्शपूर्वक दर्शन घेता येते. रणछोडजीचे दर्शन घेतल्याशिवाय द्वारकेची यात्रा सफल होत नाही, अशी श्रद्धा आहे. मंदिरासमोर ८०० मी. लांब व २०० मी. रुंद गोमती तलाव आहे. तलावाच्या ईश्वर घाटावर श्री डंकनाथ, महादेव, गणपती इत्यादींची मंदिरे आहेत. येथे दर पौर्णिमेस भाविकांची फार गर्दी असते आणि कार्तिकी पौर्णिमेस मोठी यात्रा भरते.
“