ट्यूलिप : पलांडू कुलातील [⟶ लिलिएसी] ट्यूलिपा वंशातील कोणत्याही वनस्पतीला ट्यूलिप हे सर्वसाधारण नाव आहे. या वंशात सु. १६० जाती असून त्या जंगली अवस्थेत इटलीपासून जपानपर्यंत पसरल्या आहेत. ट्यूलिपा गेस्नेरिआना या ‘बागेतील ट्यूलिप’ (गार्डन ट्यूलिप) या नावाने ओळखल्या गेलेल्या जातीचे असंख्य प्रकार शेकडो वर्षांच्या निवड पद्धतीतून निर्माण झाले आहेत. आकर्षक फुलांसाठी ही वनस्पती प्रसिद्ध असून तिची अभिवृद्धी (लागवड) कंदांपासून करतात. खोड सर्वसाधारणपणे ६० सेंमी.  उंचीचे असते परंतु काही बुटक्या प्रकारांत त्याची उंची ७ सेंमी. एवढीच असते, खोडाला शाखा नसतात आणि तळाला दोन किंवा अधिक चिवट, लांब व अरुंद अथवा अंडाकृती पाने असतात. पेल्याच्या अगर घंटेच्या आकाराची फुले खोडाच्या टोकाला प्रत्येक खोडावर एक याप्रमाणे येतात व ती विविध रंगांची व आकर्षक असतात. फुलांत एकेरी आणि दुहेरी असे प्रकार आहेत. एकेरी प्रकारात तीन संदले आणि तीन प्रदले सारख्याच रंगाची असतात. केसरदले ६ किंजमंडल संयुक्त, तीन किंजदलांचा मिळून तयार झालेला किंजल्काला तीन शाखा असतात [⟶ फूल]. फळात (बोंडात) तीन कप्पे व त्यांत पुष्कळ चपटी बीजे असतात.

बागेतील ट्यूलिपचे सु. ४,००० प्रकार वर्णिले गेले आहेत. हॉलंडमध्ये बागेतील ट्यूलिपची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. बेल्जियम, इंग्लंड, वायव्य अमेरिका आणि ब्रिटिश कोलंबिया या देशांतही या कंदांची व्यापारी प्रमाणावर लागवड होते. मध्यम प्रकारच्या चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत या वनस्पतीची वाढ चांगली होते.

तुर्कस्तानातून सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात बागांतून लावण्याच्या ट्यूलिपची प्रथम आयात झाली आणि लवकरच त्याला इंग्लंड आणि हॉलंडमध्ये लोकप्रियता प्राप्त झाली. त्यानंतर त्याचे महत्त्व इतके वाढले की, भरभराटीत असलेला एका दारू गाळण्याचा कारखाना ट्यूलपे ब्रासेरी या ट्यूलिपच्या प्रकारच्या एका कंदाच्या मोबदल्यात विकला गेला. १६३० च्या सुमारास इंग्लंडमध्ये ट्यूलिपच्या एका कंदाची किंमत १०० ते १७० पौंडांच्या दरम्यान होती. सेम्पेर ऑगस्टस या प्रकारच्या एका कंदाची किंमत  डॉलरच्या हिशेबात ५,२०० डॉलर होती असा उल्लेख आढळतो

व्हायरसजन्य रोगांमुळे पोषक वनस्पतींचे कमी-जास्त प्रमाणात नुकसान होते. परंतु ट्यूलिपच्या फुलामध्ये व्हायरसजन्य रोगांमुळे विविध रंगांच्या छटा निर्माण होतात आणि असा विविध छटांच्या फुलांच्या कंदांना बाजारात फार मागणी असते. व्हायरसजन्य रोगामुळे वनस्पतीचे कोणतेच नुकसान होत नाही.

हळव्या व गरव्या अशा प्रकारांची एकत्र लागवड केल्यास फुलांचा बहर सु. दोन महिन्यापर्यंत टिकून राहतो. कंद जमिनीत पुष्कळ वर्षे टिकू शकतात, परंतु दोन अगर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ते तसे ठेवीत नाहीत. ते खणून साफ करुन पुढे लागवडीसाठी वापरण्याकरिता थंड जागी ठेवतात.

 गोखले, वा. पु., चौधरी, रा. मो.