टोरिचेल्ली, एव्हांजेलिस्ता : (१५ ऑक्टोबर १६०८–२५ ऑक्टोबर १६४७). इटालियन गणितज्ञ व भौतिकीविज्ञ. वायुभारमापकाच्या तत्त्वाच्या शोधाकरिता प्रसिद्ध. त्यांचा जन्म फाएन्झा येथे झाला. १६२७ साली ते रोमला बेनेडिक्टाइन कास्टेल्ली या गणिताच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली गणित व विज्ञानाचे अध्ययन करण्यास गेले. गॅलिलीओ यांच्या गतीवरील कार्याचे उत्सुकतेने वाचन करून त्यांनी प्रक्षेपी गतीच्या विश्लेषणाचे व्यापकीकरण केले व त्या विषयावर De motu gravium (१६४०, प्रसिद्धी १६४४) हा विवेचक ग्रंथ लिहिला. १६४१ साली गॅलिलीओ यांनी त्यांना फ्लॉरेन्स येथे पाचारण केले. गॅलिलिओ यांच्या जीवनातील शेवटचे तीन महिने ते त्यांचे विद्यार्थी व साहाय्यक होते. गॅलिलीओ यांच्या मृत्यूनंतर त्यांची ग्रँड-ड्यूकल गणितज्ञ आणि गणिताचे प्राध्यापक म्हणून फ्लॉरेन्टाइन ॲकॅडेमीत नेमणूक झाली. १६४३ साली त्यांनी गॅलिलीओ यांच्या शोधांचा विस्तार करून हवेला वजन असते व शोषण पंपाने १०·०६ मी. उंचीपेक्षा वर पाणी खेचता येत नाही, हे सिद्ध केले. ⇨ द्रायुयामिकीमधील खालील प्रमेय त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. ‘द्रवाने भरलेल्या भांड्याच्या बाजूस भोक पाडले असता त्यातून बाहेर पडणाऱ्या चिळकांडीचा वेग हा द्रवाच्या पातळीपासून भोकापर्यंत गुरूत्वाकर्षणाखाली पडणाऱ्या द्रवाच्या थेंबाच्या वेगाबरोबर असतो’. हवेचा दाब मोजण्याविषयीचे त्यांचे प्रयोग महत्त्वाचे असून वायुभारमापकाचे संशोधक म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. वायुभारमापकातील पाऱ्यावरील निर्वात प्रदेशास तसेच वायुभारमापकाच्या नळीला त्यांचेच नाव दिले आहे. दूरदर्शकावर व साध्या सूक्ष्मदर्शकावर बरेच प्रयोग करून त्यांनी या वेळी उपलब्ध असलेल्या दूरदर्शकांपेक्षा जास्त प्रभावी दूरदर्शक तयार केला होता. लांबी, क्षेत्रफळ व घनफळ काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अविभाज्यकांच्या पद्धतीच्या उपयोगातील फायदा लक्षात घेऊन ⇨अन्वस्ताच्या क्षेत्रफळासंबंधीच्या आपल्या ग्रंथात त्यांनी या पद्धतीचा उपयोग केला व विकासही केला. १६४४ साली त्यांनी Opera geometrica हा ग्रंथ लिहिला. ते फ्लॉरेन्स येथे मरण पावले.
फरांदे, र. कृ.