टोपी माकड : सस्तन प्राण्यांच्या नरवानर (प्रायमेट्स) या गणातील सर्कोपिथेसिडी या कुलातले हे माकड आहे. याचे शास्त्रीय नाव मॅकाका रेडिएटा आहे. महाराष्ट्रात याला माकड किंवा ‘लाल मांग’ म्हणतात. भारताच्या दक्षिण भागात हे मुख्यतः राहते. याची वस्ती पश्चिमेस मुंबईपर्यंत व पूर्वेस गोदावरीपर्यंत आढळते. त्रावणकोरमधील टोपी माकडांची मॅकाका रेडिएटा डायल्यूटा या स्वतंत्र प्रजातीत गणना केली आहे.
सपाट मैदानी प्रदेशात त्याचप्रमाणे डोंगरावरदेखील ही राहतात. यांचे मोठाले कळप असून एका कळपात २०–३० माकडे असतात. कळपात लहान-मोठे नर, माद्या व पिल्ले असतात.
हे माकड मध्यम आकाराचे असून वृक्षवासी असल्यामुळे त्याची शेपटी बरीच लांब असते. ढुंगण टेकून किंवा उकिडवे बसलेल्या माकडाची उंची जेमतेम ६० सेंमी. असते इतर माकडांपेक्षा याचे शेपूट लांब असून ते डोक्यासह शरीरापेक्षा अधिक लांब असते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन ६–९ किग्रॅ. व मादीचे ३–४ किग्रॅ. भरते. त्याच्या डोक्याभोवती लांब काळ्या केसांचे टोपीसारखे एक वलय असते, म्हणून याला टोपी माकड म्हणतात. टोपीच्या केसांनी कपाळ पूर्णपणे झाकलेले नसते. कारण या जागी वलयाचे केस आखूड असून मध्ये भांग पडल्याप्रमाणे ते दोन्ही बाजूंना नीट वळलेले असतात. टोपी माकडाच्या अंगावरील केसांना रंग व्यक्तिपरत्वे व ऋतुपरत्वे वेगवेगळा असल्याचे दिसून येते. हिवाळ्यात सामान्यतः तो चकचकीत हिरवा तपकिरी असतो खालचे भाग पांढुरके असतात पण उन्हाळा सुरू होताच त्यांची चकाकी नाहीशी होऊन ते खरखरीत होतात आणि त्यांचा रंग विटून पिवळसर करडा होतो.
टोपी माकडे बुद्धिमान असतात. पाळलेली व शिकवलेली माकडे मोठे छान खेळ करून दाखवितात. माकडांचे खेळ करणारे लोक ही माकडे घेऊन सर्वत्र हिंडताना दिसतात.
फळे, पाने, कोंब, किडे, त्यांची अंडी, कोळी, काय हाताला येईल ते, हे प्राणी खातात. माणसाच्या वस्तीपासून दूर जंगलात राहणारी टोपी माकडे बहुधा भित्री असतात पण मनुष्य वस्तीच्या जवळ राहणाऱ्यांना माणसाचे मुळीच भय वाटत नाही. ही माकडे पिकांची व फळांची फार नासाडी करतात. कॉफीचे मळे आणि माडांच्या बागा यांच्यावर संधी मिळेल तेव्हा ते हल्ले चढवतात. फळाच्या आणि धान्याच्या दुकानदारांना यांचा फार त्रास सहन करावा लागतो. ही माकडे अतिशय खोडकर आहेत. घरावरची कौले उसकटून फेकून देणे हा ह्या खोडकर प्राण्यांचा मोठा आवडता छंद आहे, म्हणून पुष्कळ लोक छपरांवर काटे पसरून ठेवतात.
यांच्या सामाजिक जीवनाची त्याचप्रमाणे प्रजोत्पादनाच्या काळाविषयी नीटशी माहिती नाही. गर्भावधी सहा महिन्यांचा असतो असे म्हणतात. पिल्लाला चार-पाच वर्षांत प्रौढत्व येते. पाळीव माकड १२–१५ वर्षे जगते.
कानिटकर, बा. मो.
“