टेनिसन, ॲल्फ्रेड : (६ ऑगस्ट १८०९–६ ऑक्टोबर १८९२). इंग्रज कवी. समर्झबी, लिंकनशर येथे जन्मला. लाउथ येथे आरंभीचे काही शिक्षण घेतल्यानंतर केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात त्याने प्रवेश घेतला. तथापि प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे पदवी घेण्यापूर्वीच शिक्षण सोडावे लागले (१८३१). बालपणापासून टेनिसनला काव्यरचनेचा छंद होता. ट्रिनिटी कॉलेजात शिकत असताना काव्यरचनेबद्दल त्याला ‘चॅन्सलर्स गोल्ड मेडल’ मिळाले होते. जेम्स टॉमसन, पोप, स्कॉट, मिल्टन आणि विशेषतः बायरन ह्यांच्या अनुकरणाकडे त्याची प्रारंभीची प्रवृत्ती होती. पोएम्स चीफ्ली लिरिकल (१८३०) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर १८३२ मध्ये पोएम्स हा त्याचा दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘लोटस ईटर्स’, ‘द लेडी ऑफ शॅलट’, ‘द पॅलेस ऑफ आर्ट’ ह्यांसारख्या त्याच्या श्रेष्ठ कविता त्यात अंतर्भूत होत्या. १८३३ मध्ये आर्थर हॅलम हा टेनिसनचा केंब्रिजच्या शिक्षणकाळापासून जिवाभावाचा स्नेही बनलेला उमदा सुहृद मरण पावला. ह्या घटनेने टेनिसनच्या मनाला आलेली विव्हलता इतकी तीव्र होती, की ती कित्येक वर्षे त्याच्या मनात खोलवर राहिली. त्यानंतर दीर्घकाळपर्यंत अनेक प्रकारच्या अडचणींना आणि मनस्तापांना त्याला तोंड द्यावे लागले. त्याच्या तीन भावांचा मानसिक आजार, प्रेमाची सफलता होण्याला लागलेला विलंब, आर्थिक अरिष्टे इ. सहन करीत असताना त्याचे काव्यलेखन मात्र खंडित झाले नाही. आदर्श नायकाची व्हिक्टोरियन युगातील संकल्पना साकारणाऱ्या ‘युलिसीझ’ ह्या कवितेची तसेच आर्थर हॅलमच्या मृत्यूतून स्फुरलेल्या आणि पुढे ‘इन मेमोरियम ए. एच्. एच्.’ ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या उत्कट विलापिकांपैकी काहींची रचना त्याने ह्याच काळात केली. दीर्घ कालावधीनंतर, १८४२ मध्ये पोएम्स ह्याच नावाने त्याचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. पहिल्यात १८३० आणि १८३२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या काव्यसंग्रहांतील वेचक कविता संकलित केलेल्या होत्या, तर दुसऱ्यातील नव्या होत्या. ह्या काव्यसंग्रहांच्या प्रकाशनानंतर मात्र एक प्रमुख कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित होत गेली. टॉमस कार्लाइल, चार्ल्स डिकिन्झ ह्यांसारख्या समकालीन श्रेष्ठींची मैत्री त्याला लाभली. १८५० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘इन मेमोरियम… ’ ह्या विलापिकामालेला फार मोठे यश आणि प्रसिद्धी मिळाली. इतकेच नव्हे, तर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिचा अनुग्रह त्याला प्राप्त झाला. त्याच वर्षी त्याला इंग्लंडचा राजकवी करण्यात आले. त्यानंतरच्या त्याच्या उल्लेखनीय काव्यरचनेत ‘मॉड’ (१८५५) ही कविता, राजा आर्थर आणि त्याचे सरदार ह्या अदभुतरम्य विषयावरील ‘द आयडिल्स ऑफ द किंग’ (१८५९) ही काव्यमाला आणि ‘ईनक आर्डन’ (१८६४) हे कथाकाव्य, ‘लोक्सली हॉल सिक्स्टी यीअर्स आफ्टर’ ही कविता, बेकेट हे नाटक इत्यादींचा समावेश होतो. टेनिसनची कविता विपुल आणि विविध प्रकारची आहे. भावकविता, कथाकाव्ये, चिंतनपर कविता, गाणी, सुनीते, नाट्यगीते ह्यांचा त्यांत अंतर्भाव होतो. बेकेटखेरीज आणखी काही पद्यनाटकेही त्याने लिहिली.
व्हिक्टोरियन युगातील इंग्रजी कवितेचा प्रमुख प्रतिनिधी म्हणून टेनिसन ओळखला जातो. नादमधुर शब्दयोजना, रेखीव आणि संयत अशी पद्यबंधांची रचना, भावनावेग तीव्रतेने प्रकट करण्याची शक्ती हे टेनिसनच्या भावकवितेचे विशेष आहेत. तथापि एक प्रेषित आणि नीत्युपदेशक म्हणूनही तत्कालीन समाजाने त्याच्याकडे पाहिले. कारण त्या काळातील शास्त्र आणि धर्मकल्पना यांच्यातील संघर्ष, कर्तव्ये व हक्क यांच्याविषयी निर्माण झालेल्या नव्या जाणिवा, स्त्री-पुरुष समानतेच्या कल्पनेचे होऊ लागलेले स्वागत या गोष्टींचाही ऊहापोह टेनिसनच्या कवितेत आढळत होता. विसाव्या शतकारंभीच्या इंग्रजी समीक्षेने व्हिक्टोरियन कला-जीवनमूल्यांविषयी प्रखर प्रतिक्रिया व्यक्त केली, तेव्हा ह्या प्रमुख व्हिक्टोरियन कवीची कविताही अटळपणे त्या प्रतिक्रियेचे एक लक्ष्य बनली. विशुद्ध भावकवीच्या भूमिकेपासून दूर जाऊन आपल्या कवितेत त्या काळाला रुचणारा उच्च मध्यम वर्गीय नीत्युपदेश टेनिसनने आणला, अशीही टीका त्याच्या कवितेवर झाली. समकालीन कलामूल्यांचा, अभिनिवेशांचा व लोकाभिरुचीचा प्रभाव–विशेषतः इंग्लंडचा राजकवी झाल्यानंतर – टेनिसनवर पडणे अपरिहार्य होते. त्यामुळे स्वच्छंदतावादाशी नाते सांगणारा त्याच्यातील उत्कट भावकवी थेटपर्यंत, समग्रपणे, प्रकट होऊच शकला नाही, असा अभिप्राय त्याच्या काव्यासंबंधी व्यक्त केला जातो. टेनिसनच्या विरुद्धची प्रतिक्रिया पुढे थोडा काळ इतकी तीव्र होती, की काही समीक्षकांनी श्रेष्ठ कवी म्हणून त्याचे स्थानही नाकारले. तथापि त्यानंतरच्या काळात टेनिसनच्या पुनर्मूल्यांकनाचे प्रयत्न झालेले असून टी. एस्. एलियटसारख्या समीक्षकांनी त्याच्या बाबतीत स्वागतशील दृष्टी दाखविली आहे. आता त्याच्या श्रेष्ठ स्थानाविषयी दुमत राहिलेले नाही. ॲल्डवर्थ येथे तो निवर्तला. त्याच्या समग्र कविता आणि नाट्यकृती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केल्या आहेत (१९५३).
संदर्भ :
1. Auden, W. H. Tennyson : A Selection and Introduction, London, 1946.
2. Boum, P. F. Tennyson Sixty Years After, London, 1949.
3. Bradley, A. C. The Reaction Against Tennyson, London, 1929.
4. Buckley, J. H. Tennyson, Cambridge, 1960.
5. Killham, J. Ed. Critical Essays on the Poetry of Tennyson, London, 1960.
6. Lucas, F. L. Tennyson, London, 1957.
7. Nicolson, Harold, Tennyson : Aspects of His Life, Character and Poetry, London, 1960.
8. Tennyson, Hallam, Alfred Lord Tennyson : A Memoir, 2 Vols., London, 1897.
देशपांडे, मु. गो.
“