टेलर, फ्रेडरिक विन्झ्लो : (२० मार्च १८५६–२१ मार्च १९१५). शास्त्रीय व्यवस्थापनाचा प्रवर्तक. जन्म जर्मनटाउन, फिलाडेल्फिया येथे. शिक्षण ‘जर्मनटाउन अकादमी’ आणि न्यू हँपशर येथील ‘फिलिप्स एक्झीटर अकादमी’मध्ये. डोळे बिघडल्यामुळे त्याच्या हार्व्हर्डमधील उच्च शिक्षणात खंड पडला. १८७५ मध्ये दृष्टी पूर्ववत् सुधारल्यानंतर टेलर फिलाडेल्फियातील ‘एंटरप्राइज हैड्रॉलिक वर्क्स’ मध्ये फर्माकार व यंत्रकार म्हणून उमेदवारी करू लागला. तीन वर्षांनी तो ‘मिडव्हेल स्टील कंपनी’त शिरला व लवकरच तेथील प्रमुख अभियंता बनला (१८८४). १८८१ मध्ये टेलरने टेनिसमधील दुहेरी राष्ट्रीय सर्वविजेतेपद पटकाविले त्याच वर्षी मिडव्हेल स्टील कंपनीमध्ये व्यवस्थापन शास्त्रातील पायाभूत ठरणाऱ्या ‘काल-क्रियामापनपद्धती’चा सर्वप्रथम वापर केला. वैयक्तिक कामगारावर बारकाईने लक्ष ठेवून व त्याच्या कार्यामधील वाया जाणारा काळ व हालचाली यांचे निराकरण करून, त्याची कार्यक्षमता तसेच सबंध कारखान्याची उत्पादनक्षमता वाढविणे शक्य असल्याचे टेलरने सिद्ध केले. कामगार संघटनांकडून ‘टेलर पद्धती’ला अतिशय विरोध झाला असला, तरी उत्पादनाचे सुयोजन करण्यासाठी त्या पद्धतीचे मूल्य निर्विवाद मोठे होते त्याचप्रमाणे उत्पादनतंत्रांच्या विकासावर पडलेला त्या पद्धतीचा प्रभाव प्रचंड होता. पश्चिमी राष्ट्रांमधील शक्तिप्रचालित यंत्रांच्या योगे जेव्हा औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले होते, त्याच सुमारास औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय तत्त्वाधिष्ठित अशी कला आहे, हे सिद्ध करण्याचे प्रयत्न टेलरने चालविले होते.

रात्रीचा अभ्यास करून टेरलने ‘स्टीव्हन्स तंत्रविद्यासंस्थे’मधून १८८३ साली यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. मिडव्हेल कंपनीचा प्रमुख अभियंता असतानाच त्याने एका नवीनच यंत्रशाळेचा अभिकल्प आणि रचना तयार केली. १८८४ मध्ये टेलरने लूएझ स्पूनर या युवतीशी विवाह केला. त्या वेळी त्याच्या मालकीची चाळिसांवर पेटंटे होती. शास्त्रीय व्यवस्थापनाविषयी आवड असल्यामुळे मिडव्हेलमधील नोकरीचा त्याने राजीनामा दिला. १८९०–९३ या काळात तो ‘मॅन्युफॅक्चरिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी’चा सरव्यवस्थापक होता. येथूनच त्याने ‘व्यवस्थापन सल्लागार अभियंता’ म्हणून स्वतंत्र व्यवसायाला प्रारंभ केला. अनेक मान्यवर संस्थांना त्याने मार्गदर्शन केले. अखेरीस तो ‘बेथलहेम स्टील कॉर्पोरेशन’चा सल्लागार झाला (१८९८–१९०२). येथेच असताना टेलरने जे. मॉन्सेल व्हाइट. (१८५६–१९१२) या सहकाऱ्याबरोबर पोलादाला विशिष्ट उष्णता देण्याची एक महत्त्वाची ‘टेलर-व्हाइट प्रक्रिया’ शोधून काढली. ती आधुनिक वेगवान उपकरणनिर्मितीला फारच उपकारक ठरली. उत्पादनामध्ये अधिक वेग, गती येण्यासाठी टेलरने अनेक तंत्रांचा आणि अभियांत्रिकीय उपकरणांचा शोध लावला. निर्मिती, विक्रय अथवा प्रशासन प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे मूल्यमापन करण्यासाठी टेलरने पद्धतशीर सूत्रे तयार केली. दुकाने, कार्यालये व कचेऱ्या आणि औद्योगिक संयंत्रे यांसाठी त्याने शोधून काढलेल्या शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती कित्येक उद्योगधंद्यांत, विशेषतः पोलाद उद्योगात, यशस्वीपणे राबविल्या गेल्या.

टेलरने वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी प्रकृतीच्या कारणास्तव नोकरी सोडली व उर्वरित आयुष्य विविध विद्यापीठे व व्यावसायिक संस्था ह्यांमधून व्याख्याने देण्यात घालविले. ‘अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल एंजिनअर्स’ या संस्थेने १९०६ मध्ये टेलरला अध्यक्षपद देऊन सन्मानित केले, तर त्याच वर्षी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाने त्याला डी.एस्‌सी. ही पदवी देऊन गौरविले. वरील संस्थेच्या ट्रॅन्झॅक्शन्स या नियतकालिकातून टेलरचे पुढील मान्यवर ग्रंथ प्रसिद्ध झाले : नोट्स ऑन बेल्टिंग (१८९४), पीस-रेट सिस्टिम (१८९५), शॉप मॅनेजमेंट (१९०३) व ऑन द आर्ट कटिंग मेटल्स (१९०६), द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हा सुविख्यात ग्रंथ १९११ मध्ये प्रसिद्ध झाला. १९११ साली टेलरने ‘सोसायटी टू प्रमोद द सायन्स ऑफ मॅनेजमेंट’ ही संस्था स्थापण्यासाठी पुष्कळ परिश्रम घेतले या संस्थेस त्याच्या मृत्युनंतर ‘टेलर सोसायटी’ असे नाव देण्यात आले.

यंत्रशाळा व्यवस्थापनविषयक टेलर पद्धती व इतर पद्धती ह्यांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या ‘हाउस ऑफ रेप्रेझेंटेटिव्ह्‌ज’च्या एका विशेष समितीपुढे १९१२ मध्ये दिलेल्या साक्षीमुळे टेलरची कीर्ती अधिकच वाढली. फिलाडेल्फियामध्ये तो फुफ्फुसदाहाने निधन पावला.

 पहा : शास्त्रीय व्यवस्थापन. 

संदर्भ : Copley, F. B. Frederick W. Taylor : Father of Scientific Management. 2. Vols, New York, 1923.

गद्रे, वि. रा.