टेरझागी, कार्ल : (२ ऑक्टोबर १८८३–२५ ऑक्टोबर १९६३). ऑस्ट्रियात जन्मलेले अमेरिकन स्थापत्य अभियंते. ⇨ मृदा यामिकी (बाह्य प्रेरणेमुळे मातीवर होणाऱ्‍या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र) या स्थापत्य अभियांत्रिकीच्या महत्त्वाच्या शाखेचे जनक. त्यांचा जन्म प्राग येथे झाला. १९०४ मध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतर भूविज्ञानाचाही अभ्यास केला. पहिल्या महायुद्धात त्यांनी ऑस्ट्रियाच्या विमानदलात नोकरी केली परंतु १९१६ मध्ये इस्तंबूल येथील इंपीरियल स्कूल ऑफ एंजिनियर्स या संस्थेच्या निमंत्रणावरून येथे नोकरी स्वीकारली. युद्ध संपल्यानंतर इस्तंबूलमधील रॉबर्ट कॉलेज या अमेरिकन संस्थेत त्यांची नेमणूक झाली. कोणत्याही बांधकामाचा पाया, मातीचा दाब आणि उतारांचे स्थैर्य यांसंबंधी बरेच संशोधन पूर्वी झालेले होते, परंतु टेरझागी यांनी स्वतः संशोधन करून यांसंबंधीचे विस्कळीत ज्ञान एकत्र करण्याचे व सर्वसमावेशक संकल्पना मांडण्याचे महत्कार्य केले. या कार्याच्या आधारे त्यांनी १९२५ मध्ये Erdbaumechanik हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला.

टेरझागी १९२५ मध्ये अमेरिकेस गेले व तेथे आपल्या संकल्पनांचा स्वीकार होण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले व त्याचबरोबर अनेक बांधकामांच्या प्रकल्पांत सल्लागार अभियंता म्हणूनही काम केले. १९२९ मध्ये व्हिएन्ना तांत्रिक विद्यापीठात नव्यानेच सुरू झालेले मृदा यामिकीचे प्राध्यापकपद त्यांनी स्वीकारले. १९३८ मध्ये ते पुन्हा अमेरिकेला गेले आणि तेथे हार्व्हर्ड विद्यापीठात १९४६–५६ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. याच वेळी त्यांचा तांत्रिक सल्ला देण्याचा व्यवसायही वाढत गेला. त्यांनी ईजिप्तमधील आस्वान धरणाच्या तांत्रिक रचनेत सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून विशेष कामगिरी बजावली. याशिवाय शिकागोमधील भुयारी रस्ते, कॅनडातील केनी धरण, फ्रान्समधील सेरे पोन्सोन धरण, रशिया व भारतातील अनेक धरणे यांच्या बांधकामासंबंधी तसेच मेक्सिको शहरातील काही भागांच्या खचण्यासंबंधीच्या संशोधनाबाबत त्यांनी बहुमोल सल्ला दिला. मृदा यामिकी या विषयावरील त्यांचा थिऑरेटिकल सॉइल मेकॅनिक्स हा १९४३ साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ आजही महत्त्वाचा मानण्यात येतो. ते विंचेस्टर (मॅसॅचूसेट्स) येथे मृत्यू पावले.

ओक, शा. चिं.