टेक्कलकोटा : कर्नाटक राज्यातील नवाश्मयुगीन आणि ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींचे स्थळ. हे बेल्लारी जिल्ह्यात बेल्लारीच्या उत्तरेस सु. ४३ किमी.वर सिरुगुप्पा तालुक्यात सिरुगुप्पा रस्त्यावर वसले आहे. लोकसंख्या १०,९२९ (१९७१). इ. स. १०२१ च्या एका कोरीव लेखात या गावाचा पपेकळ्ळू असा उल्लेख आहे. याचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही पण विजयानगरच्या अवनतीनंतर येथे हनुमप्पा नायक हा पाळेगार होता. त्याने अमरेश्वर मंदिराजवळ एक किल्ला बांधला होता पण त्याचे अवशेष उपलब्ध नाहीत. या किल्ल्यावरूनच टेक्कलकोटा हे नाव रूढ झाले असावे. पुढे ते अदवानीच्या मुसलमान गव्हर्नरच्या आधिपत्याखाली गेले व १७७५ मध्ये ते हैदर अलीने जिंकले. टिपूनंतर ते ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.
डॉ. नागराज राव यांनी १९६३–६४ मध्ये येथे उत्खनन केले. या उत्खननात तीन भिन्न सांस्कृतिक कालखंडांतील वस्त्यांचे अवशेष मिळाले. पहिली वस्ती नवाश्मयुगीन काळातील असून तिचा कार्बन १४ पद्धतीनुसार इ. स. पू. सु. १७८० ते १६१५ असा काळ येतो. घासून धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, राखी रंगाची मृत्पात्रे, गोल आकडाच्या कुडाच्या झोपड्या, दगडी फरशांच्या तुकड्यांची घरातील जमीन, शेतातून कुळीथाची लागवड आणि शेतीस उपयोगी ठरणाऱ्या जनावरांचे पालन ही या पहिल्या वस्तीची काही वैशिष्ट्ये होत. दुसऱ्या कालखंडात तांबे व ब्राँझ यांच्या वस्तूंचा वापर सुरू झालेला दिसतो. जोर्वेसारखी मृत्पात्रे येथे वापरात आली होती आणि जोर्वे संस्कृतीप्रमाणेच लहान मृत मुलांचे दफन दोन कुंभांत करण्याची पद्धत येथे प्रचलित झाली होती. या वस्तीचा काळ कार्बन १४ पद्धतीनुसार इ. स. पू. सु. १६१० असा येतो. तिसरी वस्ती लोहयुगीन असून तिचा काळ इ. स. पू. सु. ३३५ येतो. याशिवाय येथे दगडांची व हाडांची हत्यारे आणि शिंपल्यांच्या अनेक वस्तू आढळल्या. येथील तांब्याची एकमेव कुऱ्हाड व इतर पाच तांब्याच्या वस्तू, दोन सुवर्णालंकार व जनावरांचे अवशेष वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या अवशेषांवरून नवाश्मकाळात येथील मानवी जीवन समृद्ध होते आणि जनावरांना माणसाळविणे, मृत्पात्रे बनविणे व शेती हे उद्योग इथे भरभराटले होते, असे दिसते. सामान्यतः दगडाचाच प्रामुख्याने उपयोग होत असे आणि तांब्याचा वापर क्वचित होता. मलहोत्रांनी मानवी सांगाड्याचा अभ्यास करून येथील मानव मेडिटेरिनिअन व प्रोटो-ऑस्ट्रलॉइड या मिश्रवंशाचा असावा, असे अनुमान काढले आहे.
संदर्भ :Nagaraja Rao, M. S. The Stone-Age Hill-dwellers of Tekkalakota, Poona, 1965.
देव, शां. भा.