टिनोफोरा : या संघातील प्राणी अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणारे) आणि समुद्रात राहणारे आहेत. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सर्व समुद्रांत जरी हे आढळत असले, तरी उष्ण कटिबंधातील समुद्रांत ते मुबलक असतात. हे प्राणी मुक्तप्लावी (स्वतंत्रपणे पोहणारे) असून बहुधा समुद्रपृष्ठाच्या जवळपास राहणारे आहेत परंतु काही समुद्रांत ३,००० मी. खोलीवरही ते आढळतात. यांचे शरीर श्लेषी (जेलीसारखे) व पारदर्शक असून अंधारात त्यांच्या शरीरांवरील कंकतपट्टांच्या (फणीसारख्या पट्टांच्या) खालून प्रकाश बाहेर पडत असतो. यांच्या सु. ८० जाती आहेत. ⇨जेलीफिशांशी (छत्रिक) यांचे थोडेबहुत साम्य असल्यामुळे पुष्कळ प्राणिशास्त्रज्ञ हा प्राणिसमूह सीलेंटेरेटा संघाचा एक वर्ग मानीत असत परंतु यांची संरचना बरीचशी भिन्न असल्यामुळे या प्राणिसमूहाला हल्ली स्वतंत्र संघाचे स्थान दिलेले आहे.

विशेष लक्षणे : या संघाची विशेष लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे आहेत : शरीर सामान्यतः दीर्घवृत्ताभ (लंबवर्तुळासारखे) किंवा गोल असून त्याच्या बाह्य पृष्ठावर कंकत-पट्टांच्या आठ ओळी असतात सममिती द्वि-अर (शरीराच्या काही भागात एका पातळीने दोन समान भाग होण्याची म्हणजे द्विपार्श्व व काही भागात मध्यातून जाणाऱ्‍या प्रतलाने दोन समान भाग होण्याची म्हणजे अरसमात्र स्थिती) असते आंतरिक नालांची (मार्गांची) व्यवस्था व संस्पर्शकांचे (स्पर्शज्ञानाच्या इंद्रियांचे) समोरासमोर असणारे स्थान यांमुळे मूळ अरीय सममिती बदलून द्विपार्श्व सममिती आणि अरीय सममिती यांच्या एकीकरणाने द्वि-अर सममिती उत्पन्न होते. बाह्यस्तर, अंतस्तर आणि मध्यश्लेषस्तर (दोन स्तरांच्या मध्ये असणारा जेलीसारखा अकोशिकी म्हणजे पेशींपासून न बनलेला स्तर) हे तीन आद्यस्तर असल्यामुळे हे प्राणी त्रिस्तरी असतात मध्यश्लेषस्तर पुष्कळ जाड असतो ⇨दंशकोशिका नसतात, पण आसंजक (चिकटणाऱ्‍या) कोशिका (कोलोब्लास्ट) असतात पचन तंत्रात मुख, ग्रसनी (घसा), इन्फंडिब्युलम (जठर, नसराळ्यासारखे इंद्रिय) आणि नालांची एक श्रेणी यांचा समावेश होतो तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) प्रसृत (पसरलेले) असते एक अपमुख (मुखाच्या विरुद्ध बाजूवर) ज्ञानेंद्रिय (संतुलन पुटी म्हणजे शरीराचा तोल सांभाळणारे ज्ञानेंद्रिय) असते प्राणी उभयलिंगी (नर व मादी यांची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असलेले) असतात जनन ग्रंथी पचन नालांच्या भित्तींवर असून जनन-कोशिका अथवा युग्मक (अंडी आणि शुक्राणू) अंतःस्तरापासून उत्पन्न होतात.

टिनोफोरा व सीलेंटेरेटा यांतील साम्य व भेद : टिनोफेरा आणि सीलेंटेरेटा या संघांतील प्राण्यांमध्ये पुढील बाबतींत साम्य दिसून येते : मूलभूत अरीय सममिती शरीराच्या मुख्य अक्षाभोवती (मुखअपमुख अक्ष) विभागांची मांडणी असते मध्यस्तर श्लेषी असतो देहगुहा (शरीरातील पोकळी) नसते शाखा असलेली जठरवाहिनी गुहा (पचन आणि परिवहन या दोन्ही कार्यांकरिता उपयोगी पडणारी गुहा) असते अंग-तंत्रांचा अभाव असतो तंत्रिका-जाल (मज्जांचे जाळे) प्रसृत असते.

टिनोफोरांची पुढील लक्षणे सीलेंटेरेटांच्या लक्षणांहून भिन्न आहेत : यूक्लोराखेरीज इतर टिनोफोरांत दंशकोशिका नसतात मध्यस्तरापासून स्नायु-कोशिका उत्पन्न होतात कंकत-पट्टांच्या आठ ओळी पचन तंत्राची प्रगत संरचनात्मक संघटना अपमुख संतुलन पुटीचे अस्तित्व आणि आसंजक कोशिकांचे अस्तित्व.

वर्गीकरण : टिनोफोरा संघाचे टेंटॅक्युलेटा आणि न्यूडा असे दोन वर्ग पाडलेले आहेत. टेंटॅक्युलेटा वर्गातील प्राण्यांना दोन लांब अपमुख संस्पर्शक असतात या संस्पर्शकांना आवरण असते किंवा नसते आवरण असले, तर संस्पर्शक त्याच्या आत ओढून घेता येतात. या वर्गात पुढील चार गण आहेत : (१) सिडिप्पिडिया : शरीर वाटोळे संस्पर्शक शाखित असून आवरणाच्या आत ओढून घेता येतात. उदा., हॉर्मिफोरा, प्ल्युरोब्रेकिया. (२) लोबेटा : शरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असते दोन मोठ्या मुख-पाली (मुखाच्या दोन्ही बाजूंस असलेल्या मांसल गोलसर वळ्या) असतात संस्पर्शकांना आवरण नसते. उदा., डेइओपिया, बोलिनॉप्सिस. (३) सिस्टिडिया : शरीर लांब फितीसारखे असते. उदा., सेस्टस व्हेनेरिस, ९० सेंमी. लांब व ५ सेंमी. रुंद उष्ण कटिबंधातील समुद्रात आढळतो. (४) प्लॅटिटीनिया : शरीर वरून खाली (मुख – अपमुख अक्षावर) दबलेले. उदा., टेनोप्लॅना, जाल्फिएला. न्यूडा वर्गातील प्राण्यांना संस्पर्शक नसतात. शरीराचा आकार अंगुस्तानासारखा मुख रुंद ग्रसनी फार मोठी जठरवाहिनीनालांना पुष्कळ शाखा आसतात. उदा., बेरोई.

आ. १. हॉर्मिफोराची संरचना : (१) मुख, (२) ग्रसनी, (३) संस्पर्शकाचे आवरण, (४) संस्पर्शक-नाल, (५) रेखांशित-नाल, (६) इन्फंडिब्युलम, (७) संतुलन पुटी, (८) संस्पर्शक, (९) कंकत-पट्ट, (१०) रेखांशित-नाल, (११) ग्रसनी-नाल.

शरीराची संरचना : हॉर्मिफोरा किंवा प्ल्युरोब्रेकिया या वंशाच्या कोणत्याही एखाद्या जातीच्या अभ्यासाने टिनोफोरांच्या  संरचनेची माहिती मिळू शकते. या वंशांच्या जाती जगभर आढळतात.

हॉर्मिफोरा प्लुमोझा ही एक सामान्य जाती असून ती भूमध्य समुद्रात आढळते. या जातीचे प्राणी कुंभाकृती असून शरीराचा व्यास सु. ५–२० मिमी. असतो. शरीर पारदर्शक असून त्याच्या रुंद टोकाकडच्या दोन्ही बाजूंवर असलेल्या दोन पिशव्यांतून प्रत्येकी एक लांब, भरीव, संकोचशील संस्पर्शक निघालेला असतो. हे मुख्यतः अनुदैर्घ्य (उभ्या) स्नायु-तंतूंच्या जुडग्याचे बनलेले असतात. संस्पर्शक पिशवीच्या आत पूर्णपणे ओढून घेता येतो. संस्पर्शकापासून पुष्कळ पार्श्व शाखा निघालेल्या असून त्यांच्यावर आसंजक कोशिका असतात. या कोशिकांपासून एक प्रकारचा चिकट स्राव निघतो व त्याला लहान प्लवकजीव (पाण्यात तरंगणारे सूक्ष्म जीव) चिकटतात. संस्पर्शक आखडून घेऊन आणि वाकवून हे जीव मुखात ढकलले जातात.

आ. २. आसंजक कोशिका (कोलोब्लास्ट) : (१) आसंजक पिंडिका, (२) कुंडलित तंतू, (३) सरळ तंतू.

शरीराच्या अरुंद टोकावर मुख असते आणि याच्या विरुद्ध म्हणजे रुंद अपमुख टोकावर संतुलन पुटी असते. मुखाच्या जवळपासच्या बाह्य पृष्ठभागावरून निघून जवळजवळ संतुलन पुटीपर्यंत गेलेले आणि एकमेकांपासून सारख्या अंतरावर असलेले आठ रेखांशिक (एका ध्रुवापासून दुसऱ्‍या ध्रुवापर्यंत गेलेले) पक्ष्माभिकायुत (हालचालींस उपयुक्त अशा केसासारख्या वाढींनी युक्त) पट्टे असतात. त्यांना कंकत-पट्ट म्हणतात. ही टिनोफोरांची चलनअंगे होत. या पट्टांवर लांब पक्ष्माभिकांच्या आडव्या रांगा असतात. प्रत्येक रांगेतील पक्ष्माभिकांचे बुडाशी सायुज्जन (एकीकरण) झालेले असल्यामुळे ती फणीसारखी दिसते. या कंकतांच्या लयबद्ध हालचालींमुळे हे प्राणी मंद गतीने पोहत पुढे जातात.

मुख एका लांबट, चपट्या ग्रसनीत अथवा मुखपथात उघडते व ग्रसनी एका लहान कोष्ठात (इन्फंडिब्युलममध्ये) उघडते. या प्राण्यांच्या शरीरात आढळणाऱ्‍या सगळ्या नाल-तंत्रांचे उगमस्थान इन्फंडिब्युलम होय. सर्व टिनोफोरांमध्ये या नाल-तंत्रांची व्यवस्था सारखीच असते. परिघीय नालांपैकी अत्यंत महत्त्वाचे नाल पुढील होत : कंकत-पट्टांच्या खाली असणारे रेखांशिक-नाल, संस्पर्शकांच्या बुडाला जाणारे संस्पर्शकनाल आणि ग्रसनीच्या बरोबर जाणारे ग्रसनी-नाल. सगळ्या नालांना पक्ष्माभिकायुत अंतःस्तर-कोशिकांचे अस्तर असते परंतु ग्रसनीचे अस्तर मात्र पक्ष्माभिकायुक्त बाह्यस्तर-कोशिकांचे असते. संस्पर्शकांना चिकटलेले प्राणी गिळल्यानंतर ग्रसनीत जातात. ग्रसनीच्या भित्तीत असणाऱ्‍या ग्रंथिकोशिकांच्या पाचक स्रावामुळे बहुतेक अन्नाचे या ठिकाणी पचन होते. न पचलेले अन्न अथवा क्षेप्यद्रव्य (निरुपयोगी पदार्थ) मुखातून बाहेर टाकले जाते.

आ. ३. संतुलन पुटी : (१) संतुलनाश्म, (२) हंडीसारखे झाकण, (३) पक्ष्माभिकायुत प्रसीता, (४) स्प्रिंग, (५) ध्रुवीय पट्ट.

संतुलन पुटी अपमुख ध्रुवावर असते. या ठिकाणी एक उथळ खळगा असून त्याला पक्ष्माभिकायुत उपकलेचे (बाहेरचे मोकळे पृष्ठ अथवा एखाद्या नळीचे अथवा गुहेचे आतले पृष्ठ झाकणाऱ्या ऊतकाचे म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचे) अस्तर असते. या खळग्यापासून अनुप्रस्थ (आडव्या) पातळीत प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे दोन अरुंद पक्ष्माभिकायुत ध्रुवीय पट्ट निघालेले असतात. पुटीत मध्यभागी कॅल्शियममय कणांचा बनलेला एक संतुलनाश्म असून त्याला खळग्यातून निघालेल्या S च्या आकाराच्या अतिशय मोठ्या सायुज्जित पक्ष्माभिकांच्या चार जुडग्यांनी आधार दिलेला असतो. या जुडग्यांना स्प्रिंग म्हणतात. प्रत्येक स्प्रिंगपासून पक्ष्माभिकायुत प्रसीतांची (खोबणींची) एक जोडी बाहेर पडून शरीराच्या त्याच चतुर्थांशात असलेल्या दोन कंकत-पट्टांना जाते. संतुलनाश्म आणि त्याला आधार देणाऱ्या स्प्रिंगा सायुज्जित पक्ष्माभिकांपासून बनलेल्या एका पारदर्शक पालथ्या हंडीखाली झाकलेल्या असतात. या ज्ञानेंद्रियाचा उपयोग मुख्यतः शरीराचा तोल सांभाळण्याकरिता होतो. ध्रुवीय पट्ट घ्राणेंद्रियाचे (नाकाचे) कार्य करतात, असा समज आहे.

आ. ४. हॉर्मिफोराच्या शरीराच्या अनुप्रस्थ छेदाचा आरेख : (१) प्लावी पट्ट (२) रेखांशिक-नाल, (३) संस्पर्शकाचे आवरण, (४) अंडाशय, (५) वृषण, (६) ग्रसनी अथवा मुखपथ.

टिनोफोरा संघातले सगळे प्राणी उभयलिंगी असतात. जनन ग्रंथी रेखांशिक-नालांमध्ये असतात. प्रत्येक रेखांशिक-नालाच्या एका बाजूवर, त्याच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत पसरलेला अंडाशय असून त्याच्या समोरच्या बाजूवर तसाच पसरलेला वृषण (पुं-जनन ग्रंथी) असतो. पक्व झालेले अंडाणू आणि शुक्राणू नालांच्या सुषिरकात (पोकळीत) पडतात तेथून ते इन्फंडिब्युलममध्ये जातात व तेथून ते ग्रसनीत जाऊन अखेरीस मुखामधून बाहेर पडतात. अंड्यांचे निषेचन (फलन) बाहेर समुद्राच्या पाण्यात होते. निषेचित अंड्यांच्या विकासाने प्रौढ प्राणी तयार होतात.

टिनोफोरांच्या शरीराचे बाह्यपृष्ठ पक्ष्माभिकायुत बाह्यस्तर-कोशिकांनी आच्छादिलेले असते आणि ग्रसनीला आतून याच कोशिकांचे अस्तर असते. अंतःस्तर पक्ष्माभिकायुत असून इन्फंडिब्युलम आणि त्यापासून निघणाऱ्‍या सगळ्या नालांना त्याचे अस्तर असते. शरीराचा बहुतेक भाग पारदर्शक, जेलीसदृश मध्यश्लेषस्तराने व्यापलेला असतो. स्नायुतंतू बाह्यस्तर व अंतःस्तर यांच्या खाली असून भ्रूणाच्या मध्यस्तर-कोशिकांपासून तयार झालेले असतात.

कर्वे, ज. नी.