टॉलेमी राजे :ईजिप्तवर इ. स. पू. ३२३–इ. स. पू. ३० च्या दरम्यान राज्य करणारे मॅसिडोनियन वंशातील राजे. लागस ह्या मॅसिडोनियातील एका सरदाराचा पहिला टॉलेमी–सोटर (इ. स. पू. ३६४–२८४) हा मुलगा. तो अलेक्झांडर द ग्रेटच्या लष्करात एक प्रमुख सेनापती होता. इ. स. पू. ३२३ मध्ये अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याची शकले झाली त्या वेळी ईजिप्तवर पहिला टॉलेमी क्षत्रप होता. त्याने क्रीट, सीक्लाडीझ, सिरिया, पॅलेस्टाइन, फिनिशिया, सेमॉस, लेझ्बॉस, सॅमोथ्रेस आणि हेलस्पाँट हे प्रदेश जिंकून ईजिप्तच्या राज्यात समाविष्ट केले आणि स्वतः राजा हा किताब धारण केला. त्याला सोटर म्हणजे सेव्हियर हा किताब लोकांनी दिला. त्याने अलेक्झांड्रिया येथे राजधानी स्थापून एक वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय स्थापन केले. त्याने शिक्षणाचा प्रसार केला आणि स्वतः अलेक्झांडरच्या स्वाऱ्यांचा इतिहास लिहिला. आपल्या उतारवयात त्याने ‘सेरापीज’ नावाचा एक धर्मपंथ सुरू केला होता. इ. स. पू. २८५ मध्ये त्याने आपल्या दुसऱ्या मुलास गादीचा वारस नेमले.
दुसरा टॉलेमी-फिलाडेल्फस (इ. स. पू. ३०८–२४६) हा पहिल्या टॉलेमीचा मुलगा. तो इ. स. पू. २८५ मध्ये गादीवर आला. त्याने सिरिया आणि इजीअन समुद्र यांतील युद्धे पुढे चालविली. त्याने आपल्या राज्यातील विद्वानांना आश्रय देऊन कला व विद्या यांस प्रोत्साहन दिले व उर्वरित आयुष्य ॲलेक्झांड्रिया शहर सुंदर करण्यात खर्ची घातले.
तिसरा टॉलेमी–यूर्जेटीझ (इ.स. पू. २८२ ?–२२१) हा दुसऱ्या टॉलेमीचा मुलगा. तो इ. स. पू. २४६ मध्ये गादीवर आला. त्याने सारडीझ व बॅबिलन काबीज करून हिंदुस्थानपर्यंत धडक मारली होती. सिल्युसिडी घराण्यातील दुसरा अँटायओकस ह्याबरोबर त्याचे युद्ध सुरू झाले. त्यात त्याने अँटायओकसचा पराभव करून त्याचा काही प्रदेश घेतला. शिवाय थ्रेस जिंकून ते आपल्या राज्यास जोडले. ह्याच्या अमदानीत टॉलेमींचे राज्य खूप विस्तारले. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक देवळे बांधली.
चौथा टॉलेमी–फिलॉपाटॉर (इ. स. पू. २२१?–२०३) हा तिसऱ्या टॉलेमीचा मुलगा. तो इ. स. पू. २२३ मध्ये गादीवर आला. त्याने तिसऱ्या अँटायओकसचा पराभव केला. त्याच्या मृत्यूनंतर मॅसिडॉनचा पाचवा फिलिप आणि तिसरा अँटायओकस ह्यांनी संयुक्तपणे ईजिप्तवर स्वारी केली परंतु पहिल्या टॉलेमीच्या कारकीर्दीत झालेल्या मैत्रीच्या तहानुसार रोमने दोघांचा पराभव केला.
पाचवा टॉलेमी–इपिफनीझ (इ. स. पू. २१०–१८०) हा चौथ्या टॉलेमीचा मुलगा. तो इ. स. पू. २०३ मध्ये गादीवर आला. तो अज्ञान असल्यामुळे ह्या वेळी ईजिप्तवर रोमचे वर्चस्व होते. तिसऱ्या अँटायओकसने त्याबरोबर मैत्रीचा तह करून त्यास आपली मुलगी क्लीओपात्रा दिली व रोमवर स्वारी केली तथापि ईजिप्त तटस्थ राहिला. ह्याने मल्लविद्येस उत्तेजन दिले व धर्मगुरूंना सवलती दिल्या. त्याने इ.स. पू. १९६ साली रोझेटा दगडावर आपली एक त्रैलिपिक आज्ञा खोदून घेतली.
सहावा टॉलेमी–फिलोमीटॉर (इ. स. पू. १८६–१४५) हा पाचव्या टॉलेमीचा मुलगा. तो इ. स. पू. १८० मध्ये अल्पवयात गादीवर आला. चौथ्या ॲटायओकसने त्यावर स्वारी करून त्यास पकडले (इ. स. पू. १७०). तेव्हा अँलेक्झांड्रियाच्या नागरिकांनी त्याच्या भावास (आठवा टॉलेमी) गादीवर बसविले. त्या वेळी अँटायओकसने सहाव्याच्या बाजूने युद्ध करण्याचे ठरविले पण दोघे भाऊ एकत्र आले आणि क्लीओपात्राच्या (आईच्या) मदतीने ते राज्य करू लागले.
सातवा टॉलेमी–नीऑस फिलॉपाटॉर (इ. स. पू. १६१–१४४), आठवा टॉलेमी–यूर्जेटीझ (इ. स. पू. १८४–११६) आणि नववा टॉलेमी–सोटर वा लथायरस (इ. स. पू. ? –८१) या तीन राजांच्या कारकीर्दीविषयी तसेच त्यांचे काळ यांविषयी निश्चित माहिती मिळत नाही. शिवाय आठवा व नववा यांचा अनुक्रमे नववा व दहावा टॉलेमी असाही उल्लेख आढळतो. या तिघांनी सु. ३७ वर्षे म्हणजे इ .स. पू. १०८ पर्यंत ईजिप्तवर राज्य केले. या काळात ईजिप्तमधील गादीसाठी भाऊबंदकी चालू होती.
दहावा टॉलेमी–अलेक्झांडर (इ. स. पू. ?–८८) हा नवव्या टॉलेमीचा मुलगा. तथापि हा नववा व अकरावा टॉलेमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. आपल्या सावत्र आईस मारल्यामुळे त्याच्या विरुद्धही बंड होऊन त्यात तो मारला गेला.
अकरावा टॉलेमी–अलेक्झांडर (इ. स. पू. ८०–५८) हा आठव्या टॉलेमीचा अनौरस पुत्र. त्याच्या कारकीर्दीत नागरिकांनी पुन्हा बंड केले व इ. स. पू. ५८ मध्ये त्यास हाकलले परंतु रोमच्या मदतीने त्याने गादी मिळविली.
बारावा टॉलेमी (इ. स. पू. ६१ ?–४७) हा अकराव्या टॉलेमीचा मुलगा. तो पॉम्पी ह्या रोमन सरदाराच्या सल्ल्याने राज्य करीत असे. शिवाय त्याच्या ⇨ क्लीओपात्रा ह्या बहिणीचेही तत्कालीन राजकारणात फार प्रस्थ होते. ती त्याची पुढे पत्नी व सहराज्यकर्ती झाली. तो अपघातात मरण पावला. क्लीओपात्राने धाकटा भाऊ तेरावा टॉलेमी (इ. स. पू. ४७–४४) बरोबर लग्न करून काही दिवस राज्य केले. नंतर तिने त्याचा खून केला.
चौदावा टॉलेमी–सीझेरियन (इ. स. पू. ४४–३०) हा क्लीओपात्रा व सीझरचा मुलगा. या वेळी ईजिप्त पूर्णतः रोमच्या ताब्यात गेला होता. याच्या मृत्यूनंतर टॉलेमी वंश संपुष्टात आला.
या राजघराण्यातील पुरुषांनी सामान्यतः आपल्या बहिणींशी व एकाने तर आपल्या मुलीशी लग्न केले. तसेच या घराण्यात भाऊ, बहीण व आई यांचेही खून झाले. या घराण्यातील राजांच्या कारकीर्दीत साम्राज्यविस्ताराबरोबरच ईजिप्तने सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत खूप प्रगती केली. टॉलेमी राजांनी विद्वानांना राजाश्रय देऊन कला, विद्या व वाङ्मय ह्यांस प्रोत्साहन आणि उत्तेजन दिले. पहिल्या टॉलेमीने ॲलेक्झांड्रिया ही नवीन राजधानी वसवून तेथे वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय स्थापिले. त्यापुढील राजांनी ॲलेक्झांड्रियास अधिक कलात्मक स्वरूप दिले, कालवे काढले, सुवर्णचलनपद्धती अंमलात आणून व्यापारास व शेतीस उत्तेजन दिले. एक वैशिष्ट्यपूर्ण दीपगृह बांधून जगातील आश्चर्यांत भर घातली. त्यामुळे ह्या काळात ईजिप्त हे एक सुसंपन्न आणि वैभवशाली राष्ट्र झाले.
संदर्भ :1. Beven, E. R. A History of Egypt Under the Ptolemaic Dynasty, London, 1927.
2. Mahaffy, J. P. The Empire of the Ptolemies, 1895.
देशपांडे, सु. र.