टागोर, देवेंद्रनाथ : (१५ मे १८१७ –१९ जानेवारी १९०५). महर्षी देवेंद्रनाथ टागोर (ठाकूर) म्हणून प्रख्यात असलेले बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्याकार आणि ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू. राजा (प्रिन्स) द्वारकानाथ टागोरांचे देवेंद्रनाथ हे ज्येष्ठ पुत्र. रवींद्रनाथांचे वडील. देवेंद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे त्यांच्या जोडासाँको भागातील प्रसिद्ध वाड्यात झाला. द्वारकानाथ टागोर हे राममोहन रॉय यांचे सहकारी होते. लहानपणीच देवेंद्रनाथांना राजा राममोहन रॉय यांचे सान्निध्य लाभले. बालवयात तसेच किशोरवयातही ते राममोहन रॉय यांच्या विद्यालयात शिकले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची विद्यालयात ख्याती होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा शारदा देवींशी विवाह झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्याच्या हिंदू महाविद्यालयात झाले. राममोहन रॉय यांचे कनिष्ठ पुत्र देवेंद्रनाथांचे सहाध्यायी होते. राममोहन रॉय यांच्या नंतर देवेंद्रनाथ ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले व त्यांनी समाजाच्या कार्याला उत्कृष्ट वळण दिले.
शिक्षणप्रसार व लोककल्याणकारी कार्यात देवेंद्रनाथांनी आपले सर्व जीवन वेचले. सर्वतत्त्वदीपिका सभा (१८३२), तत्त्वबोधिनी सभा (१८३९), हिंदू हितार्थी विद्यालय (१८४६), समाजोन्नतिविधायिनी सुहृदसमिती, नॅशनल असोसिएशन (१८५१) इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि त्यांद्वारे धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जागृती केली. हिंदू महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीवर असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. बोलपूर येथील ब्रह्मचर्याश्रम देवेंद्रनाथांनीच स्थापन केला होता. रवींद्रनाथांनी पुढे त्याचे रूपांरत जगप्रसिद्ध ‘शांतिनिकेतन’मध्ये व नंतर ‘विश्वभारती’मध्ये केले.
पाश्चात्त्य संस्कृतीच्या नव्या झगझगाटाच्या वातावरणात देवेंद्रनाथांनी भारतीय सनातन अध्यात्माची प्रतिष्ठा मानून स्वतःच्या विचाराने व आचाराने तिचा पुरस्कार केला. राममोहन रॉय यांनी सुरू केलेल्या ब्राह्मो समाजाच्या कार्याला त्यांनीच यथोचित वळण दिले. तत्त्वबोधिनी पत्रिका (स्था. १८४०) ह्या ब्राह्मो समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिकाद्वारे बंगाली गद्याच्या वाटचालीस त्यांनी गती देऊन मोठाच हातभार लावला. भारदस्त वैचारिक गद्यलेखनाची परंपरा बंगालीत ह्या पत्रिकेने सुरू झाली. ह्या पत्रिकेचे पहिले संपादक अक्षयकुमार दत्त होते. देवेंद्रनाथांची ब्राह्मो धर्मावरील निरूपणे व ब्राह्मो समाजातील व्याख्याने ह्या पत्रिकेत नियमितपणे प्रसिद्ध होत असत. त्यामुळे लोकजागृती होऊन समाजाच्या ध्येयधोरणांचा व विचारांचा प्रसार होण्यास खूपच मदत झाली. ऋग्वेदाच्या बंगाली अनुवादास प्रथम देवेंद्रनाथांनीच हात घातला. ब्राह्मधर्म (२ खंड, १८४९, १८५०) हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाही सखोल अभ्यास केला होता. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत (बांगला भाषाय संस्कृत व्याकरण, १८४५) प्रथम त्यांनीच लिहिले. स्वरचित जीवनचरित (१८९८) हे त्यांचे आत्मचरित्र फारच मनोरंजक आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्राचे पुढे सत्येंद्रनाथ टागोर आणि इंदिरा देवी ह्या दोघांनी देवेंद्रनाथ ठाकूरेर स्वरचित जीवनचरित नावाने इंग्रजीत भाषांतरही केले. ब्राह्मो धर्मासंबंधीची देवेंद्रनाथांची मते व विचार त्यांच्या ब्राह्मोधर्मेर व्याख्यान (२ खंड, १८६१, १८६६) वगैरे पुस्तकांत संकलित आहेत. आत्मतत्त्वविद्या (१८५२), ब्राह्मधर्मेर मत ओ बिश्वास (१८६०) इ. त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ होत.
देवेंद्रनाथांच्या अंतःकरणात वास्तव्य करणारा साहित्यिकच द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांच्या साहित्यगुरू होय. देवेद्रनाथांमधील खरा साहित्यिक त्यांच्या स्वतःच्या आनुषंगिक लेखनात व्यक्त झालेला नसून, तो त्यांनी आप्तेष्टांनी व स्नेह्यासोबत्यांना अनौपचारिकपणे लिहिलेल्या पत्रांमधून आणि आत्मचरित्रांतून व्यक्त झाला आहे. अक्षयकुमार दत्त, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या बरोबरीने देवेंद्रनाथही, स्वतःच्या नकळत नव्या बंगाली गद्याची जडणघडण करीत होते. त्यांची ही गद्यशैली त्यांच्या मुलांनी, विशेषतः द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांनी उचलली व खूपच विकसित केली.
देवेंद्रनाथांच्या ब्राह्मधर्म ह्या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचे मराठीत गद्य भाषांतर बा. बा. कोरगावकर यांनी १९२७ मध्ये आणि याच ग्रंथाचे मराठीत पद्यात्मक भाषांतर शाहाजी प्रतापसिंहमहाराज यांनी ब्रह्मसावंत ५८ मध्ये केले आहे. शांतिनिकेतन येथे देवेंद्रनाथांचे निधन झाले.
“