टागोर, ज्योतिरिंद्रनाथ : (४ मे १८४९–४ मार्च १९२५). बंगाली साहित्यिक व कवी. कलकत्त्याच्या प्रख्यात टागोर (ठाकूर) घराण्यात जन्म. महर्षी देवेंद्रनाथ टागोरांचे ते पाचवे पुत्र व रवींद्रनाथांचे थोरले बंधू. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांची प्रतिमा बहुमुखी होती. लहानपणापासूनच ज्योतिरिंद्रनाथ साहित्य, संगीत, चित्रकला, अभिनय इ. विषयांच्या व्यासंगात दंग असायचे. मोठे झाल्यावर या सर्व विषयांत त्यांची असामान्य बुद्धीमत्ता प्रगट झाली. बंगाली नाट्यसाहित्य व नाट्याभिनय यांचा टागोर घराण्याने जो परिपोष केला, त्याचे पाठिराखे मुख्यतः ज्योतिरिंद्रनाथ होते. त्यांनी काही प्रहसनेही केली होती. बरीच संस्कृत व काही फ्रेंच नाटके त्यांनी बंगालीत अनुवादीत केली. किंचित जलयोग (१८७२), परुविक्रम नाटक (१८७४), सरोजिनी (१८७५), एमन कर्म आर करबना वा अलीक बाबू (१८७७), अश्रुमती नाटक (१८७९) इ. त्यांचे उल्लेखनीय नाट्यग्रंथ होत. मानमयी (१८८०) आणि पुनर्वसंत (१८९९) ही त्यांची संगीत नाटके होत. स्वतः उत्तम नट असल्यामुळे, रवींद्रनाथांच्या अनेक नाटकांतील भूमिका त्यांनी सुरेख वठविल्या होत्या. ज्योतिरिंद्रनाथ संगीतशास्त्रातही विशेष पारंगत होते आणि ते उत्तम गाणीही लिहीत.
भारती ह्या नियतकालिकाचे ज्योतिरिंद्रनाथ संस्थापक होते. हे पत्र सुरू करून नियतकालिकांच्या क्षेत्रात त्यांनी मोठेच कार्य केले. तत्त्वबोधिनी व संगीत प्रकाशिका या नियतकालिकांचेही ते काही काळ संपादक होते.
ज्योतिरिंद्रनाथांच्या नाटकांतून उत्कट देशप्रेम व जाज्वल्य देशाभिमान आढळतो. त्यांच्या काही प्रहसनांच्याद्वारे त्यांनी तत्कालिन समाजातील दुष्ट रूढींवर व चालीरींतीवर कोरडे ओढले. ज्योतिरिंद्रनाथांचे शिक्षण, शिस्त, प्रोत्साहन व मार्गदर्शन यांमुळे रवींद्रनाथांचे व्यक्तीमत्त्व घडले. ज्योतिरिंद्रनाथ नसते, तर आपण घडलोच नसतो, असे रवींद्रनाथांनी स्वतःच म्हटले आहे.
मराठी भाषा आणि साहित्यावरही ज्योतिरिंद्रनाथांचे प्रभुत्त्व होते. त्यांच्या जीवनातील शेवटचे महनीय कार्य म्हणजे, त्यांनी केलेला लोकमान्य टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीतारहस्याचा बंगाली अनुवाद होय. बंगालीत बसंत कुमार चतर्जी व मन्मथनाथ घोष यांनी त्यांची चरित्रेही लिहिली आहेत. त्यांचे समग्र ग्रंथ ज्योतिरिंद्रनाथ ग्रंथावली नावाने पाच खंडात प्रकाशित झाले आहेत. रांची येथे त्यांचे निधन झाले.
सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)