टरकाकडी : (हिं. गु. म. काकडी सं. लोमशी, मूत्रला, ग्रीष्म-कर्कटी क. दोड्डसंवति इं. स्नेक कुकंबर लॅ. कुकुमिस मेलो, प्रकार युटिलिसिमस कुल-कुकर्बिटेसी). ही ओषधीय [→ ओषधि] वेल सर्व भारतात (विशेषतः पंजाब व उत्तर प्रदेश) लागवडीत आहे. हिची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कुकर्बिटेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. फळे ३०–३५ सेंमी. लांब, दंडगोलाकृती, हिरवी, फिकट हिरवी साल गुळगुळीत अगर शिरायुक्त, कोवळेपणी लवदार कच्ची व पक्व फळे (गर्द नारिंगी) खाद्य कोशिंबिरीसारखे पदार्थ फळांपासून बनवितात. बिया लहान व चपट्या असून मिठाईत वापरतात. फळांतील मगज (गर) गोड, आंबट किंवा कधी कडू असतो. बियांतील तेल व पीठ खाद्य व औषधी असून डाळिंब्यांपासून उत्तेजक पेय बनते. तेल मूत्रल (लघवी साफ करणारे) व मुतखड्यावर उपयुक्त असून मेंदूस व शरीरास चांगले असते. बिया रेचक व ज्वरनाशी कच्चे फळ स्तभंक (आकुंचन करणारे), शीतक (थंडावा देणारे), पित्तविकांरावर उपयुक्त, चविष्ट पण पचनास जड, वातकारक व कफकारक असते. पक्व फळ पौष्टिक, दीपक (भूक वाढविणारे), श्रमपरिहारक, तृषाशामक (तहान शांत करणारे) असते. हिचे मूळ गर्भाशयाच्या वेदना (गरोदरपणी) कमी करते.

हा काकडीचा प्रकार असल्याने जमीन, खत, पाणी, मशागत वगैरे ⇨ काकडीप्रमाणे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात लावतात लागणीपासून दीड-दोन महिन्यांत फळे येऊ लागून पुढे महिन्यात दीड महिन्यात ती तयार होतील तशी व जून होण्यापूर्वी काढतात. हेक्टरमधून ४,०००–५,००० किग्रॅ. उत्पन्न मिळते.

पाटील, ह. चिं. क्षीरसागर, ब. ग.