झ्युंकैरू, गॅर्रा : (१७ सप्टेंबर १८५०–७ जुलै १९२३). प्रसिद्ध पोर्तुगीज कवी. फ्रेशू दि आश्पाद आसीन्ता येथे जन्म. कोईंब्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली (१८७३). पोर्तुगीज संसदेचा सभासद. बर्न येथे पोर्तुगीज प्रजासत्ताकाचा राजदूत म्हणूनही त्याने काम केले.
झ्युंकैरूने मुख्यतः औपरोधिक कवितांचे लेखन केले. मीश्तिसॅ नूप्सियॅ (१८६६, इं. शी. मिस्टिक नप्शल्स) ही त्याची पहिली उल्लेखनीय कविता स्वच्छंदतावादी वळणाची असून तीवर चराचरेश्वरवादाची छाया दिसते. त्याच्या अन्य उल्लेखनीय काव्यांपैकी अ मॉर्ति द् दों झ्युआंउ (१८७४, इं. शी. डेथ ऑफ डॉन व्हान) ही एक सामाजिक उपरोधिका असून तीतून समकालीन नैतिक मूल्यांवर त्याने प्रखर प्रहार केले. पोर्तुगालमध्ये ह्या उपरोधिकेचे संमिश्र स्वागत झाले. काहींनी ती प्रशंसिली, तर काहींनी तिच्यावर टीका केली. त्यानंतर अ व्हॅल्यीसि दु पांद्रि इतॅर्नु (१८८५, इं. शी. द ओल्ड एज ऑफ गॉड द फादर) मध्ये त्याने कॅथलिक ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे वर्चस्व, धार्मिक दांभिकता आणि असहिष्णुता यांवर बेदिक्कतपणे हल्ला केला. कारण ख्रिस्तोपदेश आणि कॅथलिक चर्चप्रणीत धर्मोपदेश ह्यांत त्याला विरोध दिसत होता. ख्रिस्ताबद्दल त्याला आदर होता परंतु कॅथलिक चर्चचा तो विरोधक होता. उश सींप्लिश (१८९२, इं. शी. द सिंपल) ह्या प्रासादिक भावकाव्यातून त्याच्या धर्मभावनेचे आणि ख्रिस्तभक्तीचे विलोभनीय दर्शन घडते.
क्रांतिकारक व मूर्तिभंजक वृत्तीच्या झ्युंकैरूने अलेंक्झांड्रिन वृत्तात लिहिलेल्या वादळी कवितेचा प्रभाव त्याच्या युगानंतरही टिकून राहिला. प्रकृतीने तो स्वच्छंदतावादी होता तथापि पुढे तो वास्तववादाकडे वळला आणि पोर्तुगीज साहित्यातील वास्तववादाचा जाहीरनामा त्याने लिहिला. लिस्बन येथे तो निधन पावला.
रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) गोखले, शशिकांत (म.)
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..