झोरावरसिंग, जनरल : (?–१२ डिसेंबर १८४१). पश्चिम तिबेटवर स्वारी करून विजय मिळविणारा पहिला भारतीय धाडसी सेनापती. जम्मू -काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात एका गावी डोग्रा रजपूत कुटुंबात जन्म. महाराजा रणजितसिंगाच्या लष्करात साधा सैनिक म्हणून भरती होऊन आपल्या लष्करी व प्रशासकीय गुणवत्तेवर त्याने वझीर हा सन्मान मिळविला. १८३८–४१ या काळात ५,००० मी. पेक्षा अधिक उंचीवरील बर्फमय तिबेट प्रदेशात लष्करी कामगिरी करून, लडाख आणि बल्टिस्तान हे भाग त्याने जम्मू-काश्मीर राज्याला जोडले. १८४१ मध्ये तिबेट मुक्त करण्यासाठी लेहपासून कूच करून वाटेत रूडोक, ताशीगाँग व गार्टोक घेऊन मानस सरोवरापर्यंत त्याने मजल मारली. कार्टुंग व ताक्लाकोट येथे चिनी सैन्याशी लढाया झाल्या. त्या प्रसंगी चिनी सेनापतीस पळ काढावा लागला व त्याचा मानतलाई ध्वज झोरावरसिंगने हस्तगत केला. शेवटी मानस सरोवरापाशी तीर्थपुरी येथे भयंकर थंडी असताना चिनी सैन्याचा डोग्रा सेनेवर हल्ला होऊन त्यात झोरावरसिंग ठार झाला.
दीक्षित, हे. वि.