झेफीर लिली : (इं. चॉकोलेट फ्लॉवर, फ्लॉवर ऑफ द वेस्ट विंड लॅ. झेफिरँथस रोझिया कुल-अँमारिलिडेसी). ही लहान कंदयुक्त ⇨ओषधी मूळची अमेरिकेतील (क्यूबा) असून शोभेकरिता सर्वत्र बागेत लावलेली आढळते. पाने मूलज (जमिनीतील मुळापासून अगर खोडापासून निघालेली), साधी, अरुंद फितीसारखी, चकचकीत, नरम, काहीशी मांसल, हिरवी, गुळगुळीत, बिनदेठाची आणि लांब असतात. तिला वर्षातून तीनदा बहार येतो व दर वेळी एकदम येतो. फुले मध्यम आकाराची, सच्छद, गुलाबी आणि प्रत्येक फूल स्वतंत्र, लांब व पोकळ देठावर येते. हिरवळीवर, मोठ्या वृक्षाखाली किंवा वाफ्याच्या कडेला लावल्यास फुले असताना उत्तम शोभा देते. पाकळ्या सहा, खाली जुळलेल्या व वर सुट्या असून पिवळे जर्द परागकोश ठळकपणे दिसतात. किंजपुट तीन दलांचा, अधःस्थ व तीन कप्प्यांचा असतो [⟶ फूल] फळ (बोंड) तीन शकलांनी फुटते. यालाच ‘गुलछबू’, ‘भुईकमळ’ असे कोणी म्हणतात. बिया अनेक. इतर सामान्य शारीरिक लक्षणे मुसळी कुलात [⟶ ॲमारिलिडेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. कंद गोलसर असून नवीन लागवडीकरिता मार्च-एप्रिलात किंवा ऑक्टोबरात पाच ते सात सेंमी. खोल लावतात व तितकेच अंतर दोन कंदांत ठेवतात. खतावलेली जमीन व भरपूर सूर्यप्रकाश हिला आवश्यक असतो. फुले सकाळी उमलतात व रात्री मिटतात. फुले येऊन गेल्यावर कंद तेथेच राखतात. ते दर तीन वर्षांनी काढून अलग करून पुन्हा लावणे चांगले. पांढऱ्या, लाल आणि पिवळ्या फुलांच्या जातीही लोकप्रिय आहेत.
जमदाडे, ज. वि.
“