झाब्लॉट्स्की, फ्रानट्सीशेक : (२ जानेवारी १७५० ?–१० सप्टेंबर १८२१). पोलिश कवी व नाटककार. जन्म व्हॉल्हिनिया येथे. बरीच वर्षे कारकुनाचा आणि खाजगी शिक्षकाचा व्यवसाय केला. पुढे धर्मोपदेशक झाला. पन्नासहून अधिक पद्यसुखात्मिका त्याने लिहिल्या आहेत. Zobobonnik (१७८१, इं. शी. द फ्लर्टिंग डँडी ) ही त्याची सर्वश्रेष्ठ सुखात्मिका. आपल्या बऱ्याचशा सुखात्मिकांची कथानके त्याने फ्रेंच सुखात्मिकांवरून घेतली असली, तरी त्याने त्यांना अस्सल पोलिश पेहराव चढवला आणि पोलिश जीवनावर उपरोधप्रचुर भाष्य केले. पोलिश राष्ट्रीय रंगभूमीवर ह्या सुखात्मिका फार प्रभावी ठरल्या त्यांनी तिला नवे चैतन्य दिले. झाब्लॉट्स्कीने उद्देशिकादी काव्यरचनाही केली आहे. Dziela ह्या नावाने त्याचे सर्व साहित्य सहा खंडांत प्रसिद्ध करण्यात आले आहे (१८२९–३०). कॉन्स्कोवोला येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.