झाक्स, यूलिउस फोन : (२ ऑक्टोबर १८३२–२९ मे १८९७). जर्मन वनस्पतिवैज्ञानिक. वनस्पतींच्या अनेक क्रियावैज्ञानिक घटनांसंबंधी मूलभूत संशोधन प्रथम त्यांनी केले. प्रकाशसंश्लेषण (सूर्यप्रकाशात हरितद्रव्याच्या साहाय्याने पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड यांच्यापासून साधी कार्बोडायड्रेटे तयार होण्याची क्रिया) व संवेदनाक्षमता ही त्यांची महत्त्वाची संशोधनक्षेत्रे होती. यांचा जन्म ब्रेस्लौ (रोक्लॉ) येथे झाला. १८५१ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी प्राग येथे वनस्पती क्रियावैज्ञानिक जे. ई. पुरकिन्ये यांच्याकडे रुजू झाले. १८५६ मध्ये पीएच्. डी. पदवी संपादन केल्यावर ते तेथेच सन्मान्य पण अधिकृत अध्यापक झाले त्यांचा विषय वनस्पतींतील क्रियाविज्ञान हा होता. त्यानंतर १८५९ मध्ये ते सॅक्सनीत, १८६१–६७ मध्ये पॉपल्सडॉर्फमध्ये (बॉनजवळ), १८६७-६८ मध्ये फ्रायबर्ग येथे अध्यापक आणि शेवटी १८६८–९७ पर्यंत वुर्ट्सबर्ग विद्यापीठात वनस्पतिविज्ञानाचे शाखाप्रमुख म्हणून राहिले.
ते उत्कृष्ट शिक्षक असून त्यांच्या प्रयोगशाळेत संशोधनाकरिता जगातील सर्व भागांतून वनस्पतिवैज्ञानिक येत असत. ब्रिटिश व अमेरिकन वनस्पतिवैज्ञानिकांवर त्यांचा प्रभाव पडलेला असून त्यांच्या पाठ्यपुस्तकांची इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. वनस्पतिविज्ञानाच्या सर्व शाखांत त्यांच्या संशोधनाचा वाटा होता, तथापि क्रियाविज्ञानाच्या विकासाला त्यांचे श्रम अधिक कारणीभूत झाले. ⇨अंकुरणातील आकारवैज्ञानिक व क्रियावैज्ञानिक तपशिलाबाबत आणि सूक्ष्म रासायनिक पद्धतीसंबंधी आधारभूत माहिती त्यांनीच दिली असून १६९९ मध्ये जे. वुडवर्ड यांनी प्रथम उपयोगात आणलेल्या ‘जल-संवर्धन’ [⟶ मृद्हीन कृषि] पद्धतीस त्यांनी पुन्हा उजाळा दिला व पोषणविषयक समस्या सोडविण्यास त्याचा उपयोग केला. हरितकणूंत (जीवद्रव्यातील हरितद्रव्ययुक्त विशेष कणांत) आढळणारे स्टार्चाचे कण [⟶ प्रकाशसंश्लेषण] हे त्यातील प्रक्रियेचे पहिले दृश्य फल असते, हा शोध त्यांचाच असून प्रकाशानुवर्तित्व (प्रकाशाकडे अगर विरुद्ध वाढणे) व गुरुत्वानुवर्तित्व (गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने अगर विरुद्ध वाढणे) यांचे निदर्शन करण्याकरिता ‘क्लिनोस्टॅन’ या उपकरणाचा शोध व उपयोगही त्यांनीच प्रथम केला वर्धिष्णू भागांतील कोशिकांची (पेशींची) मांडणी व संरचना, वृद्धीतील लंबन (लांब वाढण्याच्या) क्रियेतील आवर्तिता, प्रकाशाच्या भिन्न तरंगलांबींचे वृद्धीवर होणारे परिणाम, हिरव्या पानांतील सात्मीकरणाची प्रक्रिया व बाष्पोच्छ्वास-प्रवाहासंबंधीचा विचोषणसिद्धांत इत्यादींच्या संशोधनाचे श्रेय त्यांनाच दिले जाते.
त्यांचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : Handbuch der Experimental Physiologie der Pflanzen (१८६५), Lehrbuch der Botanik (१८६८), Vorlesungen über Pflanzenphysiologie (१८८२) व Geschichte der Botanik (१८७५). ते वुर्ट्सबर्ग येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.