झाकळ : (विरल धुके, मिस्ट). पृथ्वीच्या पृष्ठभागावरील क्षैतिज (क्षितिज समांतर) दृश्यमानता कमी करणारा (पृष्ठभागावर अंधुकता निर्माण करणारा) विरल धुक्यासारखा आविष्कार. वातावरणात जलबाष्पाबरोबरच मृदा, लवणे आणि काजळी यांसारख्या आर्द्रताग्राही (वातावरणातील जलबाष्प शोषून घेणाऱ्या) पदार्थांचे अतिसूक्ष्म कण इतस्ततः वावरत असतात. ह्या कणांची संख्या वाढली की, वातावरणाला धूसरता प्राप्त होते. रात्री पृथ्वीलगतच्या हवेचे तापमान जसजसे कमी होते तसतशी तिची सापेक्ष आर्द्रता (वातावरणाच्या एकक आकारमानातील ओलावा व त्या आकारमानात संतृप्तावस्था येईपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण होईपर्यंत मावेल एवढा ओलावा यांचे गुणोत्तर) वाढते. ही सापेक्ष आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास वातावरणातील मोठ्या कणांवर जलबाष्पाचे संद्रवण (द्रवीभवन) होते, मेघकण निर्माण होतात आणि दृश्यमानता कमी होते. हवा अधिकाधिक थंड होत गेल्यास तिची सापेक्ष आर्द्रता अधिकच वाढते. त्यामुळे हवेतील धूसरता तीव्रतर होते आणि दृश्यमानता कमी करणारा झाकळ हा आविष्कार अस्तित्वात येतो. ह्यापेक्षा हवा अधिक थंड झाल्यास सापेक्ष आर्द्रता ९० टक्क्यांपेक्षा जास्त होते व झाकळीचे दाट धुक्यात रूपांतर होते. धुक्यात केव्हाही क्षैतिज दृश्यमानता १,००० मी. पेक्षा जास्त नसते. झाकळीमध्ये ती नेहमी १,००० मी. पेक्षा अधिकच असते. ह्या दृष्टीने झाकळ हा आविष्कार विरल धुके या नावाने वर्णिला जातो.
धुके म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नीचस्तरमेघ (पृथ्वीपृष्ठावर पसरलेले क्षैतिज स्तरांच्या स्वरूपाचे मेघ), भौतिक दृष्ट्या झाकळ व धुके या दोहोंत फरक नसतो. इंटरनॅशनल क्लाऊड अॅटलासमध्ये पृथ्वीलगतच्या वातावरणीय थरात दृश्यमानता कमी करणाऱ्या, हवेत तरंगत राहणाऱ्या अतिसूक्ष्म जलीय बिंदूंचा किंवा ओल्या आर्द्रताग्राही कणांचा समूह म्हणजे झाकळ असे वर्णन केले आहे. झाकळीचा उद्भव झाल्यास करड्या रंगाच्या अतिविरल ढगांच्या आवरणाखाली चोहोबाजूंचे भू-दृश्य झाकले गेल्याचा भास होतो. वातावरणात भूपृष्ठाच्या लगतच्या थरात रात्रीच्या वेळी पर्यसन (तापापवर्तन) निर्माण झाल्यास (हवेत उंचीप्रमाणे तापमान कमी न होता ते वाढल्यास ) हवेचे ऊर्ध्वप्रवाह मंदावतात आणि मेघकण व आर्द्रताग्राही वस्तुकण भूपृष्ठाच्या जवळील थरात सांद्रीभूत होतात (एकत्र येऊन एकक आकारमानात संख्येने वाढतात). त्यामुळे जसजसे भूपृष्ठाचे तापमान घसरू लागते तसतशी दृश्यमानता कमी होत जाते आणि क्रमाक्रमाने धूसर, झाकळ व धुके असे आविष्कार प्रतीत होतात.
पहा : धुके धूसर.
चोरघडे, शं. ल.