झरिया : बिहार राज्याच्या धनबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध कोळसाक्षेत्र. लोकसंख्या ४५,२३६ (१९७१). हे धनबादजवळ सु. १० किमी., दामोदर नदी खोऱ्यात असून याने सु. २८२ चौ. किमी. क्षेत्र व्यापलेले आहे. येथे पहिली खाण १८९३ मध्ये सुरू झाली. १८९४ मध्ये येथे लोहमार्गाची सोय झाल्यामुळे कोळसाउत्पादनात झपाट्याने वाढ झाली. या क्षेत्रात एकूण ११४ खाणी आहेत. बिहारला या खाणींतून ९०% कोळशाचे उत्पादन मिळते. १९०६ पासून येथील कोळशाचे उत्पादन राणीगंज खाणीपेक्षा जास्त निघू लागल्यामुळे भारतात या क्षेत्राचा कोळसाउत्पादनात अग्रक्रम आहे. कोकसाठी उपयुक्त असलेल्या बिट्युमेनस कोळशाचे येथे उत्पादन होते. खाणी जास्त खोल नसल्यामुळे कोळसा काढणे सोपे जाते. सध्या कोळसाउत्पादनाच्या आधुनिक उत्पादनतंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. येथे एक महाविद्यालय असून धनबाद–झरिया मोटारवाहतूक सतत चालू असते. याच्या जवळच धनबाद रेल्वे स्थानक, ‘इंडियन स्कूल ऑफ माइन्स अँड अप्लाइड जिऑलॉजी ’ व ‘नॅशनल फ्यूएल रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्था आहेत, तसेच सिंद्रीचा प्रसिद्ध खतकारखानाही आहे.
कांबळे, य. रा.