झटका : (ॲटॅक). पूर्वसूचना न मिळता जेव्हा एखादी गंभीर विकृती अकस्मात उद्भवते तेव्हा तिला त्या विकृतीचा झटका म्हणतात. मुख्यतः असे झटके हृदयाला मिळणाऱ्या रक्ताच्या परिवहन तंत्राच्या व तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) काही विकृतींत आढळतात. हृदयविकाराचा झटका, ⇨मस्तिष्काघातामुळे (मेंदूतील रोहिणीचा भेद झाल्यामुळे ) येणारा अर्धांगवायूचा झटका व ⇨अपस्माराचा झटका हे परिचित आहेत. यांशिवाय तीव्र आंत्रपुच्छशोथ (मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागास लटकलेल्या पिशवीसारख्या भागाची दाहयुक्त सूज, ॲपेंडिसायटीस), वृक्कशूल (मूत्रपिंडातील तीव्र वेदना ), ⇨अग्निपिंडशोथ इत्यादींमुळे येणारी तीव्र पोटदुखी, ⇨अवसाद (शॉक), फुप्फुसरोहिणीक्लथन (फुप्फुसाच्या रक्तवाहिनीतील रक्त गोठणे), मज्जारज्जूच्या (मेंदूच्या मागील भागातून निघणाऱ्या आणि पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या तंत्रिकांच्या दोरीसारख्या जुडग्याला झालेल्या) आघातामुळे होणारा अंगघात वगैरे अनेक अवस्था झटक्याच्या स्वरूपात येतात. या सर्व प्रकारच्या झटक्यांवर ताबडतोब उपचार करणे अत्यावश्यक असते.
सलगर, द. चि.