ज्वर : (ताप). शरीराचे तापमान प्राकृतावस्थेपेक्षा (सर्वसाधारण अवस्थेपेक्षा) अधिक वाढले, तर त्या अवस्थेला ‘ज्वर’वा ‘ताप’ आला असे म्हणतात. प्राकृतावस्थेत शरीरातील विविध भागांत ते कमीजास्त असते. तापमान साधारणपणे काखेत घेतात कारण तेथील त्वचेचा बाह्य वातावरणाशी फार थोडा संबंध येतो. काखेत सु. ३७° से. इतके तापमान असते, तर चेहऱ्यावर ३०° ते ३५° से., छातीवर २९·५° ते ३४° से. आणि पायावरील त्वचेचे तापमान २५° से.च्या आसपास असते. मुख आणि गुदद्वार यांच्या आतील तापमान १-२ अंशांनी अधिक असते. शरीरातील अंतस्त्यांतही (छाती व पोटाच्या पोकळीतील इंद्रियांतही) ते अधिकच असते. दिवसाच्या चोवीस तासांमध्ये तापमानात १ ते २ अंशांचा फरक नेहमीच पडतो. तिसऱ्या प्रहरी तापमान सर्वांत अधिक आणि उत्तर रात्रीत ते सर्वांत कमी असते.

शरीराच्या तापमानाचे नियंत्रण मस्तिष्काच्या (मेंदूच्या) तळाशी असलेल्या अधोथॅलॅमसाच्या (मोठ्या मेंदूच्या पुढच्या भागाच्या मध्य भागातील थॅलॅमस नावाच्या भागातील खालील भागाच्या) केंद्राकडून होत असते. त्या केंद्राकडे शरीरातून येणाऱ्या संवेदनांनुरूप तेथे प्रतिक्रिया होते आणि त्या केंद्रापासून निघणाऱ्या प्रेरणांमुळे रक्तवाहिन्यांचे आकारमान कमी-जास्त होते. असे झाल्याने शरीराच्या अंतर्गत भागातील आणि त्वचेतील रक्तप्रवाहाचे प्रमाण कमी-जास्त होते व त्यामुळे रक्ताची उष्णता त्वचेच्या मार्गाने नियंत्रित केली जाते. तसेच त्वचेतील स्वेद ग्रंथींचा (ज्या ग्रंथींमुळे घाम येतो त्या ग्रंथींचा) स्राव जरूरीप्रमाणे कमी-जास्त करणे, स्नायूंच्या तणावात वाढ अथवा घट करून आणि त्वचेतील बारीक केशमूळांतील स्नायूंचे आकुंचन घडवूनही उष्णतेचे नियंत्रण केले जाते.

कारणे : शरीराचे तापमान वाढण्याला अनेक कारणे आहेत. शरीरात अधिक उष्णता उत्पन्न होणे अथवा उत्पन्न होणारी उष्णता नेहमी प्रमाणे उत्सर्जित ( बाहेर टाकण्याची क्रिया) न होणे या दोन्ही प्रकारांनी शरीराची उष्णता वाढून ज्वर येतो. तापमान नियंत्रक केंद्र वरच्या तापमानावरच तात्पुरते स्थिर झाल्यानेही शरीराचे तापमान वाढते. जंतुजन्य विषे, शरीरातील ऊतकनाशामुळे (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाच्या म्हणजे ऊतकाच्या नाशामुळे) उत्पन्न होणारे क्षोमक पदार्थ, चयापचयजन्य (शरीरात होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमुळे निर्माण होणारे) पदार्थ या सर्वांमुळे तापमान केंद्र उत्तेजित होऊन शरीराचे तापमान वाढते.

ज्वर ही शरीराची एक संरक्षक क्रिया असते. वाढलेल्या तापमानामुळे रक्तप्रवाह वेगाने चालतो व त्यामुळे रक्तातील प्रतिविषे अधिक प्रमाणात शरीरभर पसरतात.

पुढील अवस्थांमध्ये ज्वर दिसून येतो : (१) जंतुसंसर्ग, (२) ऊतकांमध्ये झालेली इजा, (३) कर्करोग, रक्तदोष वगैरे रोगांमध्ये होणारा ऊतकनाश, (४) अंतःस्रावी (वाहिनीविहीन) ग्रंथींचे विकार, (५) रक्तपरिवहन (रुधिराभिसरणातील) विकार, उदा., हृद्‌विकार, (६) तापमान नियंत्रक केंद्राचे विकार अथवा नाश, (७) शरीराचे निर्जलीभवन, (८) काही औषधे व रसायनांची क्रिया. तापाधिक्य (हायपरथर्मिया) आणि ज्वर यांमध्ये फरक आहे. ज्वरामध्ये सार्वदेहिक लक्षणे दिसतात, उदा., मळमळ, अस्वस्थता, डोके दुखणे वगैरे. तापमानच नुसते वाढले, तर ही लक्षणे दिसत नाहीत [→ तापाधिक्य व तापन्यूनता].

लक्षणे: तापमानामध्ये आकत्मिक वाढ होत असताना अंगावर काटा येणे, थंडी अथवा हीव भरून येणे ही लक्षणे दिसतात. संसर्गजन्य रोगामध्ये ज्वर साधारणपणे ३८° ते ३९° से.पर्यंत चढतो. काही अतितीव्र संसर्गामध्ये आणि ऊष्माघातामध्ये ज्वर ४०° ते ४२° से.पर्यंतही चढतो. क्वचित ४४° से.पर्यंतही ताप चढल्याची उदाहरणे आहेत. ४५° से. पेक्षा अधिक तापमान चढल्यास मनुष्य जगू शकत नाही. ज्वराचे प्रमाण जितके अधिक तितका त्याचा मस्तिष्कावर विपरीत परिणाम घडून वात, बडबड वगैरे लक्षणे दिसतात.

ज्वरामुळे त्वचेतून व श्वासातून शरीरातील जल अधिक प्रमाणात बाहेर पडत असल्यामुळे मूत्राचे प्रमाण कमी होते. प्रथिन-अपचय अधिक प्रमाणात झाल्यामुळे मूत्रात नायट्रोजनयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात दिसतात. क्वचित श्वेतकही (एक विशिष्ट प्रकारचे प्रथिनही, अल्ब्युमीनही) मूत्रमार्गे जाते.

ज्वर जितका अधिक तितकी इतर लक्षणेही अधिक प्रमाणात दिसतात. अस्वस्थता बडबड वात हाताला चटका बसेल इतकी उष्ण व रुक्ष त्वचा डोळे लाल होणे कोरडी बुरसटलेली जीभ अरुची ओकाऱ्या डोके, अंग, कंबर दुखणे वगैरे लक्षणेही दिसतात.

ज्वर उतरण्याच्या वेळी रोग्याला पांघरूण नकोसे वाटते, चर्या लाल होते, घाम येऊ लागतो व नंतर ज्वर पूर्णपणे उतरतो किंवा कमी होतो. काही वेळा ज्वर हळूहळू उतरतो तेव्हा घाम येत नाही. रोग्याला गुंगी अथवा झोप येते. थकवा व अशक्तपणा मात्र फार वाढतो.

ज्वराचे संतत (एकसारखा राहणारा), स्वल्पविरामी (थांबून थांबून येणारा) आणि खंडित (उतरून पुन्हा चढणारा–पाळीचा ) ज्वर असे प्रकार आहेत.

चिकित्सा : ज्वरचिकित्सेमध्ये मूळ कारण शोधून त्यावर योग्य उपचार करणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. ॲस्पिरीन, सॅलिसिलेटे वगैरे ज्वरशामक औषधांचाही उपयोग होतो [→ ज्वरशामके]. अतितीव्र ज्वरामध्ये गार पाण्याने अंग पुसून घेणे अथवा थंडगार पाण्यातच रोग्याला ठेवणे या उपायांनी ज्वर तात्पुरता कमी करता येतो.

ढमढेरे, वा. रा.


आयुर्वेदीय माहिती : शरीर व मन ज्या रोगात तापते तो ज्वर. तापणे, संतापणे हा सार्वदेहिक रोग आहे. शरीरात सर्वत्र विखुरलेले दोष सर्वत्र जोराने पचवून ते नाहीसे करण्याचा प्रयत्न चालू होतो, कोष्ठाग्नी शाखा व मध्यममार्ग यांत दोष येऊन जोराने पचन चालते त्या पचनाने उष्णता वाढून शरीर तापते. ज्वरांत त्रिदोषांचे प्रमाण पुष्कळ असले तर त्यांत दोषपाकाबरोबर धातू आणि अवयव यांचा पाकही सुरू होतो. हे ज्वर फार उग्र असतात. त्यांचे दोषानुसरून व धातुअवयवादिकांच्या विकृतीला अनुसरून अनेक प्रकार होतात.

कोठ्याच्या बाहेर गेलेले पचन कोठ्यात आणून सुरू करणे, ही मुख्य चिकित्सा होय. हे साध्य साधण्याकरिता वांती, लंघन, घाम आणणे, हलके पातळ अन्न (पेज) व कडू रस देणे व दोषांच्या पचनाची काही काळ वाट पाहणे इ. अनेक उपचार अवस्थांना अनुसरून करावे लागतात. उदा., जेवण होताच ज्वर आला, तर अन्न त्या तापाच्या दोषांना मदत करील आणि प्रसंगी मारक होईल म्हणून वांती करून दोषांची कुमक ताबडतोब थांबवलीच पाहिजे. ज्वर कफ भूयिष्ट आहे कफ चल आहे. घशाशी येते, तोंडाला पाणी सुटते, ओकारी होईल की काय असे वाटते, अन्नाचा द्वेष वाटतो. याचा अर्थ शरीर हे तोंडावाटे दोष बाहेर काढण्याचा प्रयत्न करते व दोषांना वाढविणारी द्रव्ये वाढविणाऱ्या अन्नाचा द्वेष करते. हे समजून घेऊन वैद्याने वांतीच्या औषधाने ज्वरकर दोष वांतीद्वारे काढून टाकून बाकी शिल्लक राहिलेल्या दोषांच्या पचनाकरिता वांती झाल्यावरही लंघन द्यावे. लंघनानंतर कफनाशक पातळ कढण प्रथम देऊन नंतर हळूहळू दाट कफनाशक अन्न देऊन कोठ्यातील अन्नपचन, दोषनाश व शरीरपोषण वाढवावे. कोठ्याबाहेर गेलेले पचन कार्य कोठ्यात आणून बलवान करावे म्हणजे ज्वर नाहीसा होतो. वांतीचे औषध देता येत नाही असा रोगी असल्यास केवळ लंघन करावे. निरोगी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाच्या अंतर्गत प्रयत्नांना वैद्याने मदत करावी. या रीतीने चिन्हांचा अर्थ लावून शरीराचे ज्वर (व इतरही रोग) निवारणाचे प्रयत्न समजावून घेऊन उपचार करावे [ ⟶ आतुर चिकित्सा].

जोशी, वेणीमाधवशास्त्री

पशूंतील ज्वर : मनुष्यप्राण्याप्रमाणे पाळीव पशू व कोंबड्या नियततापी (शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारे) प्राणी आहेत. शरीरात उत्पन्न होणारी उष्णता व बाहेर फेकली जाणारी उष्णता यांचे नियंत्रण करण्याची यंत्रणा माणसाप्रमाणेच प्राण्यातही कार्यवाहित येते. यूरोपियन गुरांपेक्षा उष्ण कटिबंधातील गुरांमध्ये स्वेद ग्रंथींची संख्या अधिक असावी. त्यामुळे घामावाटे उष्णता बाहेर टाकण्याचे कार्य उष्ण कटिबंधातील गुरे अधिक कार्यक्षमतेने करू शकतात. घोड्यामध्ये मात्र स्वेदग्रंथी अधिक कार्यक्षम असतात. कुत्रा जीभ बाहेर काढून, धापा टाकून व तोंडावाटे श्वासेच्छ्‌वास करून उष्णता कमी करतो. मांजर अंग चाटून परिणामी बाष्पीभवन वाढविण्याचा प्रयत्न करून उष्णता कमी करते. निरनिराळ्या प्राण्यांतील प्राकृत अवस्थेतील तापमानांमध्ये बराच फरक आहे. या तापमानांवरून पाळीव पशूंचे ढोबळमानाने पुढील वर्ग पडतात. हत्ती, माकड, खेचर, गाढव आणि घोडा यांचे तापमान ३५·५° ते ३८·४° से. गुरे, शेळ्या-मेंढ्या, कुत्रा, मांजर व डुक्कर यांचे ३८° ते ३९·५° से. टर्की पक्षी, कोंबड्या व गिधाडे यांचे ४०° ते ४१·२° से. आणि कबुतरे व काही पक्षी यांचे ४१·७° ते ४२·८° से. असे असते. निरनिराळ्या पाळीव पशूंचे नेहमीचे तापमान खालील कोष्टकात दिले आहे.

ज्वर हा रोग नसून रोगाचे लक्षण आहे. ती शरीराची संरक्षक क्रिया आहे. सभोवारच्या तापमानात बरीच वाढ झाल्यामुळे, एकसारखे शारीरिक काम केल्यामुळे, वायुवीजन (खेळती हवा) नसलेल्या जागी दाटीदाटीने राहण्यामुळे शरीराच्या तापमानात होणारी वाढ व ज्वर यांमध्ये फरक आहे. ज्वरामध्ये सार्वदेहिक लक्षणे दिसून येतात. पशूंमध्ये सामान्यतः सांसर्गिक रोगात दिसून येणाऱ्या ⇨जंतुरक्तता, ⇨जंतुविषरक्तता, ⇨पूयरक्तता या कारणांमुळे ज्वर येतो. तसेच ज्यामुळे ऊतकमृत्यू, रक्तारुणक्षय (रक्तातील लाल रंगद्रव्य कमी झाल्यामुळे) संभवतो अशा अवस्थांमध्येही ज्वर येतो.

निरनिराळ्या पाळीव पशूंचे नेहमीचे

तापमान

प्राणी

तापमान से. मध्ये)

गाय

३७·७–३९·

म्हैस

३७·०–४०·

(उन्हाळ्यातील)

घोडा

३७·३–३८·

मेंढी

३८·३–३९·

शेळी

३८·६–४०·

कुत्रा

३८·०–३९·

डुक्कर

३८·६–४१·

कोंबडा

४०·५–४१·

उंट

३४·६–३८·

हत्ती

३५·

ज्वराच्या तीव्रतेनुसार अंगावरील केस ताठरणे, जलद श्वासेच्छ्‌वास, मूत्राचे प्रमाण कमी होणे, तहान वाढणे, भूक न लागणे, बद्धकोष्ठ इ. सार्वदेहिक लक्षणे दिसतात. ज्वराचे संतत, स्वल्पविरामी, खंडित हे प्रकार मानवाप्रमाणे पशूंमध्येही आढळतात. ज्वरचिकित्सा करते वेळी त्याचे मूळ कारण शोधून काढून त्याप्रमाणे उपाययोजना करतात. एरवी सॅलिसिलेटे, ॲस्पिरीन यांसारखी ज्वरशामक औषधे देतात [ ⟶ तापमान, प्राण्यांच्या शरीराचे].

दीक्षित, श्री. गं.