ज्योतिपंतदादा ‘महाभागवत’ : (१७१६–१७८८). मराठी कवी. सातारा जिल्ह्यातील बुध-मलवडी या गावी त्यांचा जन्म झाला. मातापिता गोदावरी, गोपाळपंत. प्रथम पुण्यास पेशव्यांकडे कारकून. १७५८ मध्ये पेशव्यांनी त्यांना उत्तरेत पाठविले. १७७३ पर्यंत पेशव्यांची नोकरी केली. पुढे नोकरी सोडून काशीस गेले. तेथे एकदोन वर्षे वास्तव्य केले. १७७५ मध्ये परत दक्षिणेत आले. पुढील तेरा वर्षे भक्तिमार्गाच्या प्रचारार्थ त्यांनी सर्व महाराष्ट्रात संचार केला. चिंचणेर येथे ते मृत्यू पावले. त्यांची समाधी तेथेच आहे.

प्रवृत्तिनिवृत्ति-ऐक्यता रत्नावलि  हा त्यांचा गद्यग्रंथ होय. त्यांनी समग्र भागवतावर ओवी व अभंगबद्ध अशी टीका रचिल्याचे सांगितले जाते परंतु ह्या टीकेचा आज फारच थोडा भाग उपलब्ध आहे आणि तो पाहता त्यांनी भागवतावर समग्र टीका रचिली नसावी, असे वाटते. तथापि त्यांनी भागवतावर लिहिलेल्या टीकेमुळे ‘महाभागवत ‘ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. ज्योतिपंतांचे एक ओवीबद्ध चरित्र सखारामपंत बाखरे यांनी लिहिले आहे (१९०१). ज्योतिपंतांची स्फुट अभंगरचनाही पुष्कळ आहे. त्यांनी सु. ७५० विठ्ठलमंदिरे बांधल्याचे सांगतात. तळेगाव, वाई, माहुली, पाटस, मसूर, कराड, पुणे (लकडी पुलाजवळील), मुंबई (विठ्ठलवाडीतील) वगैरे ठिकाणची विठ्ठलमंदिरे त्यांच्या हातची असल्याचे सांगतात. 

सुर्वे, भा. ग.