ज्यू संस्कृति : पॅलेस्टाइनमध्ये उदयास आलेली हिब्रू किंवा ज्यू लोकांची संस्कृती. यहुदी या नावाने हे लोक ओळखले जातात. इ. स. पू. आठव्या शतकात बेंजामिन व ज्यूडा या दोन जमातींनी ज्यूडाचे राज्य स्थापन केले. त्यांतील नागरिकांना ज्यूडियन म्हणत. त्यावरूनच पुढे ज्यू ही संज्ञा निर्माण झाली असावी. इ. स. १३२ मध्ये रोमन सम्राट हेड्रिएनस याने ज्यू धर्मावर बंदी घातली. तेव्हापासून जवळजवळ अठराशे वर्षांपर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरपर्यंत ज्यू समाजाला स्वतःची अशी मातृभूमी नव्हती. जगातील काही अत्यंत प्राचीन संस्कृतींचा वारसा ज्यू लोकांकडे आला. तसेच ख्रिस्ती व इस्लाम या दोन महत्त्वाच्या धर्मांची वैचारिक व तात्त्विक बैठक उभारण्यास ज्यू संस्कृती साहाय्यभूत ठरली. एकीकडे अत्यंत प्राचीन व दुसरीकडे अगदी अर्वाचीन अशा संस्कृतींशी दृढ संबंध असणाऱ्या या समाजाला जगाच्या राजकीय नकाशात प्रदीर्घ काळ स्थानच नसावे, हा इतिहासाचा एक चमत्कार म्हणावा लागेल पण याहीपेक्षा मोठा चमत्कार असा की, पोटासाठी जगभर विखुरलेल्या या समाजाने मातृभूमी नसतानासुद्धा आपली एकात्मतेची जाणीव सतत कायम ठेवली, हा होय.
यूरोपीय इतिहासकारांच्या ग्रंथांत ज्यू इतिहासाला फार महत्त्व दिलेले आढळते. त्यांनी केवळ प्राचीन जगातील वैचारिक नेतृत्व ज्यूंना बहाल केले एवढेच नव्हे, तर जगातील संस्कृतींचा उगम अथेन्स, रोम व जेरूसलेम येथूनच झाला, असे विधान केल्याचे आढळते. वस्तुतः ईजिप्त, ॲसिरिया, सुमेरिया, चीन, भारत इ. प्रदेशांतील समाजांनी निर्मिलेल्या संस्कृतींचे विश्वरूपदर्शन आता घडले असूनसुद्धा ज्यू समाजाच्या वतीने असा दावा करण्यात यावा, हे अतिशयोक्तीचे वाटते. ज्यू संस्कृतीची निश्चितपणे केव्हा सुरुवात झाली, हे ज्ञात नाही पण इ. स. पू. २००० वर्षांपासून ज्यू लोकांचे वास्तव्य पॅलेस्टाइन व आसपासच्या प्रदेशांत होते.
भौगोलिक स्थान : ज्यू लोकांचा प्राचीन इतिहास जेथे घडला, ती पॅलेस्टाइनची भूमी आकाराने लहान आहे. या भूमीचे नैसर्गिक रीत्या चार भाग पडतात. पहिला पश्चिमेकडील सपाट किनारपट्टीचा, दुसरा साधारण दक्षिणोत्तर जाणारी लेबानन पर्वताची शाखा, तिसरा जॉर्डन नदीचे खोरे आणि चौथा जॉर्डनच्या पूर्वेचा वाळवंटाचा प्रदेश. यांतील मध्यावरचा जो डोंगराळ प्रदेश, त्याचे तीन भाग कल्पिता येतात. अगदी दक्षिणेकडे ज्यूडा, यात जेरूसलेम, हीब्रन, बीरशीबा इत्यादींचा समावेश होतो. ज्यूडाच्या लगत उत्तरेस इझ्राएल प्रांत व गॅलिलीचा प्रदेश येतो. या सर्व भूभागाची अन्नदात्री नदी म्हणजे जॉर्डन. शेती व पाणीपुरवठा यांसाठी पूर्णपणे अवलंबून राहता येईल, इतका पाऊस येथे होत नाही. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिणाऱ्या जोसीफसला (३७ ? – १००) ही भूमी नंदनवनासारखी भासली, तरी हे नंदनवन प्रदीर्घ मानवी श्रमातूनच उत्पन्न करणे किंवा टिकविणे शक्य होते, तेव्हा उन्हाळ्यात होणाऱ्या जोराच्या पावसाचे पाणी साठवून ठेवून लहानमोठ्या कालव्यांतूनच ते सर्वत्र पोहोचविण्यात येई. लढाया आणि इतर कलह यांतून या मानवी प्रयत्नांत खंड पडल्याबरोबर जमीन वैराण झाली व वाळवंटाचा विस्तार पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढू लागला. पॅलेस्टाइनचे भौगोलिक स्थानही शांतता व सुबत्ता यांना फारसे अनुकूल नव्हते. आशिया व आफ्रिका यांतील विशेषत: टायग्रिस–युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यातील समाज आणि नाईलकाठचा ईजिप्त यांना जोडणारे मार्ग पॅलेस्टाइनमधून जातात. तसेच पश्चिम आशियातून भूमध्य समुद्रामार्गे यूरोपकडे जाण्याचा सरळ मार्ग पॅलेस्टाइनमधूनच जातो. यामुळे तेथील व्यापारी मार्ग व शहरे यांवर ताबा मिळविण्यासाठी सतत संघर्ष चाललेला दिसतो. ईजिप्त, बॅबिलोनिया, ॲसिरिया, हिटाइट या प्राचीन सत्तांनी या भागावर आपले वर्चस्व राखण्याचे प्रयत्न केले. ही प्राचीन काळातील एक प्रमुख समरभूमी ठरली. आपल्या भौगोलिक स्थानामुळे ही ‘वाग्दत्त भूमी’ (प्रॉमिस्ड लँड) किंवा ‘पवित्र भूमी’ (होली लँड) सतत संघर्षात सापडत गेली.
ऐतिहासिक साधने : ज्यू लोकांची माहिती मुख्यत्वे ज्या साधनांतून उपलब्ध होते, त्यांत बायबलमधील ‘जुना करार’ सर्वांत महत्त्वाचा आहे. ह्या ग्रंथाच्या वेगवेगळ्या भागांत ज्यू लोकांची भ्रमती, त्यांचे राजे व राजकारण यांसंबंधी बरीच माहिती मिळते. याशिवाय काही प्राचीन शिलालेखांत आणि मृण्मुद्रांत ज्यूंसंबंधी माहिती मिळाली. हामुराबीच्या काळातील मृण्मुद्रांत अरबस्तानातून बॅबिलनकडे हिब्रू लोक येत असल्याचा उल्लेख आहे. अमार्ना मृण्मुद्रांत पॅलेस्टाइनवर झालेल्या एका मोठ्या ‘हिब्रू’ आक्रमणाची नोंद आहे. यापुढचा परकीय उल्लेख दुसऱ्या रॅमसीझ याच्या काळातील आहे. यात ईजिप्तमध्ये मोलमजुरी करणाऱ्या हिब्रू लोकांचा निर्देश आहे. ईजिप्तमध्ये ज्यू लोक गुलामगिरीत होते, या घटनेचा उल्लेख रॅमसीझच्या लेखात आहे, असे
समजतात. यानंतरच्या काळात ॲसिरियन-खाल्डियन (नव-बॅबिलोनियन) व ईजिप्शियन लेखांतून ज्यूडा व इझ्राएल यांच्याशी राजकीय संबंधाचे, त्यांना जिंकल्याचे वा नष्ट केल्याचे अथवा हद्दपार केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. हीरॉडोटस, बेरॉसस यांच्या इतिवृत्तांत इतर घटनांच्या अनुषंगाने या लोकांची माहिती येते, पण ती फार त्रोटक आणि असंबद्ध आहे. पहिल्या शतकात रचलेल्या आपल्या इतिवृत्तात जोसीफस या ज्यू इतिवृत्तकाराने ज्यू राष्ट्राचा अगदी आरंभापासूनचा इतिहास दिलेला आहे. याशिवाय उत्खननांत उपलब्ध झालेल्या अवशेषांतून पॅलेस्टाइनमध्ये ठिकठिकाणी ज्यू लोकांच्या वसाहती कशा होत गेल्या याची आणि त्यांचा उदय व अस्त यांचीही काहीशी माहिती मिळते.
ज्यूपूर्व पॅलेस्टाइन : प्राचीन परंपरेनुसार ज्यू किंवा हिब्रू लोक इ. स. पू. २००० किंवा त्यानंतरच्या काळात अरबस्तानच्या वाळवंटातून कानन म्हणजे नंतरच्या पॅलेस्टाइनमध्ये येऊन स्थायिक झाले असावेत ते तेथे येण्याच्या आधी कित्येक शतके या प्रदेशात मानवी वस्ती झालेली असावी कारण येथे निअँडरथल मानवाचे सांगाडे सापडले आहेत. नतुफ, जेरिको, जोर्मो इ. ठिकाणी तसेच खुद जेरूसलेममध्ये नवाश्मयुगीन माणसांचे अवशेष सापडले आहेत. इ. स. पू. २५०० ते २००० च्या दरम्यान पूर्व व दक्षिणेकडील वाळवंटातून मुख्यतः अरबस्तानातून आलेले सेमिटिक लोक व दुसरे म्हणजे उत्तरेतून खाली सरकणारे ॲमोराइट लोक या प्रांतात स्थानिक झाल्याचे दिसते. इ. स. पू. २५०० ते २००० च्या दरम्यान या दोन समाजांचा मिलाफ होऊन त्यांना ‘काननाइट’ म्हणजे ‘सखल प्रदेशाचे रहिवासी’ अशा नावाने संबोधण्यात येऊ लागले. या सर्व भागात एकत्र किंवा अगदी समान भाषा प्रचलित होती, तसेच देवदेवतांविषयक एकच किंवा समान कल्पना व आचार अस्तित्वात होते. ईजिप्त व सुमेरिया येथील प्रवाह येथे येऊन पोहोचले होते. तथापि काननाइट लोकांची स्वतंत्र अशी संस्कृती निर्माण होत गेली. पॅलेस्टाइनमध्ये येऊन स्थायिक झाल्यावर हिब्रू लोकांचा याच संस्कृतीशी निकटचा संबंध आला. त्यांना भौतिक क्षेत्रात प्राचीन पॅलेस्टाइनचा समृद्ध वारसा झाला.
राजकीय इतिहास : ज्यू लोक पॅलेस्टाइनमध्ये परप्रांतांतून आले हे जरी सर्वमान्य असले, तरी ते तेथे केव्हा आले आणि कसे आले याविषयी मतभेद आहेत. एक मत परंपरागत इतिहासास प्रमाण मानणारे आहे. बायबलच्या मताप्रमाणे हिब्रू राष्ट्राचा जनक अब्राहम हा पूर्वेकडून आपल्या लोकांना घेऊन पॅलेस्टाइनमध्ये आला. तो उत्तर अरबस्तानातील हेरात येथून आला असे एक मत आहे, तर दुसऱ्या मताप्रमाणे तो सुमेरियातील अर येथून आला असावा. त्याच्या म्हणजे अगदी आरंभीच्या हिब्रू टोळ्यांचा आगमनाचा काळ इ. स. पू. २००० किंवा निदानपक्षी हामुराबीचा म्हणजे इ. स. पू. १७५० च्या आसपासचा धरण्यात येतो. अब्राहमचा पणतू जोसेफ ईजिप्तनध्ये गेला आणि तेथील राजदरबारात उच्च पदावर चढला परंतु कालांतराने त्याच्या सर्व वंशजांचे कपाळी गुलामगिरी आली. पुढे ⇨मोझेस (इ. स. पू. सु. १२००) याने ज्यू लोकांची गुलामगिरीतून मुक्तता केली आणि त्यांना पॅलेस्टाइनमध्ये परत आणले, असे आख्यायिका सांगते. ज्यू लोक हिक्सॉस लोकांच्या वेळी ईजिप्तमध्ये आले द्वितीय रॅमसीझने त्यांच्यावर गुलामगिरी लादली व त्यानंतर थोड्यात काळात मोझेसने त्यांना मुक्त केले, असे जोसीफसने लिहिले आहे. हिक्सॉस लोकांची ईजिप्तवरील स्वारी पॅलेस्टाइनमधूनच पुढे गेली. तेव्हा या टोळ्यांबरोबर काही ज्यू लोकही ईजिप्तमध्ये गेले असण्याची शक्यता आहे. हिक्सॉस दरबारात काही ज्यू मानाच्या स्थानावरही चढले असण्याची शक्यता आहे. त्याच न्यायाने हिक्सॉस लोकांचा पाडाव झाल्यावर ज्यू लोकांना वाईट दिवस येणे स्वाभाविक होते. बरेच दिवस हालअपेष्टात काढल्यावर हे ज्यू लोक मोझेसच्या नेतृत्वाने पुन्हा पॅलेस्टाइनमध्ये आले. मोझेसच्या काळासंबंधी निश्चित माहिती नाही. जुन्या करारानुसार इ. स. पू. १३००–१२०० च्या दरम्यान मोझेस याने ईजिप्तच्या जोखडातून ज्यूंना वाचविले आणि देवाने त्याच्या मुखाद्वारे कायदा व दहा धर्माज्ञा प्रस्तुत केल्या. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे उर्वरित कार्य जॉस्यूई याने पूर्ण केले. दुसरे मत असे आहे की, ज्यू लोकांच्या पॅलेस्टाइनमधील आगमनाचा काळ इ. स. पू. १५०० ते १४०० च्या दरम्यान असावा. अरबस्तानातून बाहेर पडलेल्या ज्यूंपैकी काही वायव्येकडे गेले व पॅलेस्टाइनमध्ये स्थायिक झाले. दुसरी शाखा नैर्ऋत्येच्या दिशेने ईजिप्तमध्ये जाऊन पोहोचली. इ. स. पू. १२०० च्या सुमारास ईजिप्तमध्ये राहिलेल्या ज्यू लोकांनी ईशान्येकडे मोहीम काढून पॅलेस्टाइनवर स्वारी केली. पॅलेस्टाइनच्या वसाहतींची अशा प्रकारे दोन पर्वे होतात. या दुसऱ्या पक्षाच्या मताला जेरिको, शीकम, जेरूसलेम येथील उत्खननांतून आणि अमार्ना लेखांतून आधार मिळतो.
मोझेसने आणलेले ज्यू आणि पॅलेस्टाइनमध्ये आधीच स्थायीक झालेले ज्यू यांचा फारसा संबंध पुढे राहिला नाही. पॅलेस्टाइनमधील ज्यूंची संस्कृती काननाइट संस्कृतीवर आधारलेली होती. मोझेसच्या ज्यूंनी ईजिप्शियन संस्कृतीची अंगे आत्मसात केला होती. यामुळे दोन स्वतंत्र सांस्कृतिक व राजकीय गट उत्पन्न झाले व या भेदातूनच पुढे ज्यूडा व इझ्राएल ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली, असे काही इतिहासकार मानतात. तथापि नेमके काय घडले हे विश्वासार्ह पुराव्याभावी सांगणे कठीण आहे. कारण या सर्व घटनांविषयीचा ऎतिहासिक पुरावा त्रोटक व पुष्कळसा विसंगतही आहे. निश्चयाने सांगता येण्यासारखी गोष्ट एवढीच की, बाराव्या शतकात ज्यूंचे आगमन पूर्ण झाले व इझ्राएलच्या बारा टोळ्या तेथे स्थायिक झाल्या.
या काळात सबंध पश्चिम आशियात फिलिस्टीन नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांच्या हालचालींमुळे अस्थिरता माजली होती. हे लोक बहुधा इजीअन समुद्राच्या भोवतालच्या बेटांतून बाहेर पडून इ. स. पू. १२०० च्या सुमारास पॅलेस्टाइनमध्ये घुसत होते. ते सुसंस्कृत होते, तसे खंदे लढवय्येही होते. त्यांनी ईजिप्तवरही हल्ले केले आणि शेवटी पॅलेस्टाइनचा दक्षिण किनारा व तेथील व्यापार यांच्या रक्षणासाठी ईजिप्तच्या सम्राटांनी त्यांना तेथे वसविले. एक्रॉन, गाझा, ॲशदॉद, ॲश्केलॉन व गॅथ येथे त्यांची मुख्य ठाणी होती. लवकरच ईजिप्तची सत्ता झुगारून देऊन फिलिस्टीन लोक स्वतंत्र झाले. पुढे आपले राज्य पॅलेस्टाइनभर पसरविण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. स्वाभाविकच या भागात सत्ताधारी असणाऱ्या हिब्रू टोळ्यांशी त्यांचा संघर्ष झाला. हिब्रू टोळ्या या पृथकपणे रहात होत्या. म्हणजेच राजकीय दृष्ट्या असंघटित होत्या. तसेच शेतकी व मेंढपाळीत गुंतलेल्या या समाजाची लढाऊ वृत्ती क्षीण झालेली होती. याउलट फिलिस्टीन लोक संघटित होते व त्यांचे शस्त्रबळ प्रभावी होते. इ. स. पू. १०८० च्या सुमारास फिलिस्टीन सैनिकांनी शायलो हे गाव जिंकले. त्यांच्या आक्रमणाचा जोर जसजसा वाढत गेला, तसतसा हिब्रू समाज अधिकाधिक संघटित होऊ लागला. इ. स. पू. १०१५ च्या सुमारास त्यांनी एकाच पुढाऱ्याचे नेतृत्व पतकरले आणि राजा ही संस्था निर्माण झाली. या आद्य नेत्याचे नाव ⇨सॉल. आरंभीच्या काही चकमकीत सॉलने आक्रमकांना परतवून लावले व आपल्या मुलखाच्या रक्षणासाठी जेरूसलेमच्या उत्तरेस काही अंतरावर एक किल्ला बांधला. येथेच त्याने स्वतःचे मुख्य ठाणे ठेवले. तथापि फिलिस्टीन लोकांनी त्यांचा गिल्बो पर्वतश्रेणीत झालेल्या लढाईत पराभव केला आणि तीत तो मारला गेला. सॉलचा जोर होता, तेव्हासुद्धा त्याची सत्ता पॅलेस्टाइनच्या काही प्रदेशापुरतीच मर्यादित होती. त्याच्या मृत्यूनंतर ती आणखी संकुचित झाली परंतु हिब्रू जमातींना एका राजछत्राखाली आणणारा पहिला राजा म्हणून ज्यू इतिहासात त्याला महत्त्वाचे स्थान आहे.
सॉलच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जॉनाथन याला गादीवर बसविण्याचा यत्न झाला. तथापि राजपद बापानंतर मुलाकडे वारसा म्हणून जाण्यापेक्षा एखाद्या लायक व्यक्तीनेच अडचणीच्या काळात सांभाळावे, याची जाणीव ज्यू लोकांना झाली. त्यामुळे सॉलनंतर त्याचा प्रतिस्पर्धी ⇨ डेव्हिड (इ. स. पू. सु. १०१६–सु. ९७२) हा राजा झाला. या डेव्हिडविषयी अनेक कथा ख्रिस्ती व यहुदी पुराणांत आढळतात. त्या सगळ्यांचे सार काढले, तर एवढे सांगता येते की, तो सॉलच्या जमातीचा नव्हता. सॉलचा पुत्र जॉनाथन याचा तो मित्र होता. त्याचे चरित्र बहुरंगी आणि बहुढंगी होते. श्वापदेही मुग्ध होतील असे संगीत निर्मिणारा युराय व नेथन यांच्या बायकांना (बाथशेवा) आपल्या जनानखान्यात डांबणारा तसेच गोलायथ या फिलिस्टीन राक्षसाशी झुंज करून त्याला ठार करणारा धाडसी वीर म्हणून त्याची प्रसिद्धी होती. त्याने प्रथम जेरूसलेमवर ताबा मिळविला आणि फिलिस्टीन आक्रमकांचा मोड केला. परचक्राचे निवारण करण्यासाठी उत्पन्न झालेले हे राज्य दुसऱ्यावर धाड घालण्यास सिद्ध झाले. जेरूसलेम ताब्यात आल्यावर डेव्हिडने सध्याचा ट्रान्स–जॉर्डनचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला परंतु या भौगोलिक राज्यविस्तारापेक्षा डेव्हिडची खरी कामगिरी म्हणजे त्याने सॉलने आरंभलेली समाज संघटना भक्कम केली व राज्ययंत्रणा मजबूत बनविली. त्याच्या घराण्याचा अंमल जवळजवळ चारशे वर्षांपर्यंत अबाधित राहिला. डेव्हिडचे संघटनाचातुर्य जसे या कामी उपयोगी पडले, तसे त्याचे कूळही महत्त्वाचे ठरले. सॉल हा बेंजामिन नावाच्या छोट्या जमातीपैकी होता. त्याची सत्ता मानण्यास प्रथम इतर जमाती तयार नव्हत्या, पण डेव्हिड हा ज्यूडा जमातीचा होता. या जमातीची संख्या मोठी होती व तिचे हिब्रू राष्ट्रातील वजन उपेक्षणीय नव्हते. सबंध दक्षिण पॅलेस्टाइनमध्ये या जमातीचे लोक विखुरलेले असल्याने हा प्रदेश त्यांच्या सहज अंकित झाला. डेव्हिडच्या मुलाने केलेले बंड व इतर एकदोन बंडे सोडली, तर राजसत्ता आता भक्कम पायावर उभी होती. नक्की काळ सांगणे कठीण असले, तरी इ. स. पू. १००० च्या सुमारास त्याने आपली सत्ता प्रस्थापित करण्यास हीब्रन येथून आरंभ केला आणि पुढे सु. चाळीस वर्षे राज्य केले.
डेव्हिडने मिळविलेल्या राज्याला सुनियंत्रित शासन निर्माण करून देण्याचे काम त्याचा पुत्र ⇨सॉलोमन (इ. स. पू. सु. ९७२–-९३२) याने केले. सॉलोमन याची वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तबगारी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे. राज्य मिळविणे, ते टिकविणे आणि त्यातील प्रजाजनांच्या आर्थिक भरभराटीसाठी यशस्वीपणे प्रयत्न करणे, हे सर्व त्याने साधले. त्याने जेरूसलेमभोवतालची तटबंदी मजबूत केली आणि राज्यात ठिकठिकाणी किल्लेकोट उभारले. कारभारासाठी राज्याचे बारा प्रांत पाडले आणि कोणत्याही प्रांतात एखादी जमात वरचढ होणार नाही, याची दक्षता घेतली. संरक्षण व प्रशासनव्यवस्था स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने व्यापाराकडे लक्ष वळविले आणि व्यापार व राजकारण एक करण्याच्या उद्देशाने जवळपासच्या लहानमोठ्या प्रदेशांशी, तसेच ईजिप्तसारख्या थोड्या लांबच्या परंतु बलाढ्य देशांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले. फिनिशियाचे नेतृत्व करणाऱ्या टायरच्या हायरॅम राजाच्या, तसेच ईजिप्तच्या बाविसाव्या वंशाचा संस्थापक पहिला शीशाँक याच्या मुलीशी त्याने विवाह केला. फिनिशियन व्यापाऱ्यांच्या सहकार्याने सागरी व्यापारात भाग घेतला आणि तुर्कस्तानच्या किनाऱ्यावरील तार्शिशपर्यंत त्याचे व्यापारी पोहोचले. ईजिप्तच्या मदतीने तांबड्या समुद्रातही त्याच्या जहाजांची जा-ये सुरु झाली. फिनिशियन व्यापारी तांडे खुष्कीच्या मार्गाने अरबस्तानात जावेत, यासाठी प्रयत्न करून थोड्याशा आडबाजूलाच असलेल्या जेरूसलेमला त्याने व्यापारी पेठेचे स्वरुप प्राप्त करुन दिले. इझ्राएलच्या मुलखात उत्पन्न होणारी धान्ये व फळे निर्यात करुन त्या बदल्यात टायर व सायडन येथील काचसामान, धातुकाम, कापड-चोपड यांची आयात होऊ लागली. ईजिप्शियन राजकन्येशी विवाह केल्याने त्याच्या राजकारणास व अर्थकारणास मदत तर झालीच पण त्याशिवाय ईजिप्शियन दरबारातील रीतिरीवाजही आले. थीब्झ राजदरबाराची जणू प्रतिकृतीच त्याने आपल्या राजधानीत उभी केली. बापासारखाच सॉलोमनही रसिक होता. इतिवृत्तकारांनी त्याच्या अंतःपुरात सातशे राण्या व तीनशे नाटकशाळा असल्याचा उल्लेख केला आहे. भौतिक ऎश्वर्यात रस घेणाऱ्या या राजाला अध्यात्माचा विसर पडला नव्हता. येहोवाचे एक मोठे मंदिर त्याने जेरूसलेम येथे बांधावयास काढले. राज्यातील सगळे लोक जमा करून त्यांच्याकडून या मंदिरासाठी देणग्या मिळविल्या आणि नजीकच्याच एका टेकडीवर हे मंदिर उभे केले. काननाइट देवतांची मंदिरे व स्थंडिले बांधून देण्यासही तो विसरला नाही.
सागरी व्यापारात फिनिशियन लोकांशी चढाओढ करणे अशक्य होते, तसेच खुष्कीचा व्यापार हमरस्ते सोडून जेरूसलेमकडे खेचणे कठीण होते. सु. पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीनंतर सॉलोमन ज्या वेळी मरण पावला, त्या वेळी त्याने उभारलेला सगळा डोलारा खाली कोसळला. राज्याशासनाच्या खर्चासाठी त्याने जबर कर बसविले होते. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीच्या शेवटी शेवटी राज्यात असंतोष माजला. तशात उत्तरेचे प्रांत जास्त सुपीक म्हणून जास्त कर भरीत पण राजधानी दक्षिण भागात होती तेव्हा दक्षिण भागावर जास्त खर्च म्हणून उत्तर-दक्षिण कलह सुरू झाला. त्याच वेळी ईजिप्तमधील राज्यकर्त्यांनी पॅलेस्टाइनमध्ये अंतर्गत बंडाळीस आरंभ केला. हेतू हा की, राज्याची छकले झाली म्हणजे काही भाग तरी ईजिप्तच्या वर्चस्वाखाली येईल. सॉलोमनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रीअबोअम (इ. स. पू. सु. ९३१–९१३) गादीवर आला. तेव्हा पूर्वीच्या राजवटीत बंडखोर म्हणून हद्दपार झालेला उत्तर इझ्राएलचा पुढारी जेरबोअम (इ. स. पू. ९३१–९१०) याला ईजिप्तने पाठिंबा दिला. याने उभारलेले बंड यशस्वी होऊन इझ्राएलच्या दक्षिणेकडील प्रदेशावर रीअबोअमचे वर्चस्व स्थापन झाले. उत्तरेची राजधानी शीकम (नॅब्लस) येथे होती. दक्षिणेच्या राज्यास ज्यूडा व उत्तरेच्या राज्यास इझ्राएल अशी नावे मिळाली. यापुढील दोनशे वर्षांचा ज्यूंचा इतिहास म्हणजे या दोन राज्यांतील एकमेकांच्या वर्चस्वासाठी चाललेल्या संघर्षाची कथाच होय. यात परकीयांना हस्तक्षेप करावयास संधी मिळाली. जेरबोअमच्या बंडाच्या वेळी ह्यूरमने गॅलिली प्रांत बळकावला. ज्यूडा या उत्तरेकडील प्रांताने जेरेबोअमच्या नेतृत्वाखाली बंड करून आपला सवता सुभा स्थापल्यानंतर थोड्याच दिवसांनी जेरूसलेमवर मोठे संकट आले. ईजिप्तच्या शीशाँकने स्वारी करून हे शहर ताब्यात घेतले व सॉलोमनने महत्प्रयासाने जमविलेली संपत्ती लुटली. तसेच येहोवाचे मंदिर धुऊन काढले. त्यामुळे जेरूसलेमचा संपन्न समाज धुळीला मिळाला. शीशाँक परत गेला, तरी यापुढे किती तरी काळ ज्यूडा हे ईजिप्तच्या मांडलिक राज्यासारखेच राहिले. राजाचे नेतृत्व कमकुवत असूनही ज्यू लोकांनी व्यापार-उद्योगादी व्यवसाय पूर्वीच्याच जोराने पुन्हा सुरु केले. उत्तरेच्या इझ्राएलच्या राजांपैकी काहीजण बरेच दूरदर्शी असावेत. त्यांपैकी काहींनी या दोन ज्यू राज्यांतील दुही सांधण्याचा बराच प्रयत्न केला. एहॅब (इ. स. पू. ८७४–८५२) या इझ्राएलच्या राजाने आपल्या मुलीचा विवाह ज्यूडाच्या युवराजाशी करून तह केला. तथापि खुद्द एहॅबच्याच राज्यात त्याच्या मृत्यूनंतर क्रांती झाली आणि जीह्यू (इ. स. पू. ८४१–८१४) नावाच्या एका धर्मवेड्या माणसाच्या हातात राजसत्ता गेली. त्याने ज्यूडावर स्वारी केली. तेथील राजा व राजकुळातील व्यक्तींना ठार केले पण ॲथलाया राणीच्या (एहॅबची कन्या) सावत्र मुलीने चातुर्याने या कत्तलीतून आपल्या मुलास वाचविले. त्याने अवचित सत्तांतर करून जीह्यूनंतर ज्यूडाचा मूळ राजवंश पुन्हा गादीवर आणला. त्यानंतर शंभर वर्षे महत्त्वाची अशी घटना घडली नाही. इ. स. पू. ७३५ च्या सुमाराला ॲसिरियाशी तह होऊन ज्यूडाचा बचाव झाला परंतु पुढे सेनॅकरिबने जेरूसलेमचा मोड केला. यानंतर शंभर वर्षे ज्यूडाने ॲसिरियाशी सख्य केले. इ. स. पू. ६२५ मध्ये असुरबनिपाल याच्या मृत्यूनंतर ज्यूडाने स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे, तर जॉस्यूई याने पुन्हा एकवार पॅलेस्टानवर आपले नियंत्रण बसविण्याची खटपट सुरू केली. त्याला ईजिप्तने विरोध केला व त्यामुळे उद्भवलेल्या लढाईत जॉस्यूई मारला गेला. काही काळ ईजिप्तचे आधिराज्य येथे होते. त्याचा शेवट बॅबिलनचा दुसरा नेबुकॅड्नेझर याने केला.
इझ्राएल : हे राज्य ज्यूडापेक्षा आकाराने मोठे व संपन्नही होते. तेथ अंतर्गत शांतता फारच थोडा काळ टिकली. अनेक राजघराणी तेथे सत्तेवर आली. यांपैकी ऑमराय हा राजा बलसंपन्न झाला. याने राजधानी शीकम येथून हालवून ती सामेअरिया या आणखी उत्तरेकडील शहरात नेली. त्याचा मुलगा एहॅब याने शेजारी राज्यांशी घनिष्ठ संबंध जोडण्याचे यत्न केले व ज्यूडा व टायर यांच्याशी विवाहसंबंध जोडले. याच्या परकीय बायका मूर्तिपूजक आहेत, म्हणून काही धर्मवेड्या लोकांनी प्रजाजनांना त्यांच्या विरुद्ध चिथावणी दिली. जीह्यूने क्रांती केली व एहॅबच्या वंशाचा उच्छेद केला. त्याचे मुलगे नालायक निघाले आणि दमास्कसच्या राजाने त्याचे मोठे प्रांत काबीज केले. ॲसिरियन राजांना खंडणी भरून राज्य कसेबसे तग धरून राहिले होते. दुसरा जेरबोअम याने दमास्कसकडून आपले प्रदेश परत मिळविले, तरी ॲसिरियन सत्तेचे आक्रमण थोपवणे कठीण होते. इ. स. पू. ७३४ मध्ये इझ्राएलला परवशता प्राप्त झाली व इ. स. पू. ७२२ मध्ये होशियाच्या
(इ. स. पू. ७३०–७२२) बंडानंतर हे राज्यच खालसा करण्यात आले. सामेअरिया येथे ॲसिरियन राज्यपाल नेमण्यात आला आणि ॲसिरियन राजांनी त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे पंचवीस हजार इझ्राएली ज्यूंना बंदिवान करून ॲसिरियात पाठवून दिले. जेरूसलेमच्या दुसऱ्या स्वारीनंतर (इ. स. पू. ५८९) पंधरा हजार ज्यूंना नेबुकॅड्नेझर याने धरून नेले. यापूर्वीही इझ्राएलमधून ज्यूंना त्याने धरून नेले होते. यापूर्वी इझ्राएल राज्यातील ज्यूंना ॲसिरियन राजांनी धरुन नेले असले, तरी त्या प्रसंगाला ज्यू इतिहासात फारसे महत्त्व नाही. पहिल्या स्वारीनंतर नेबुकॅड्नेझर केवळ खंडणी घेऊनच परतला होता पण दुसऱ्या वेळी मात्र त्याने हा उपद्रव कायमचा बंद करण्याच्या इराद्यानेच उपाययोजना केली. कारागीर, संपन्न जमीनदार, व्यापारी, बुद्धिजीवी आणि सैनिक या सर्वांना धरून नेण्याचा त्याचा इरादा होता. शेतकऱ्यांना मात्र त्याने उपद्रव दिला नाही. पकडलेले सर्व ज्यू बॅबिलनमध्ये नेऊन सोडण्यात आले. यांपैकी बरेच जण बॅबिलनमध्येच व्यावसायिक झाले. काहीजण तेथेच स्थायिक झाले. तथापि काही ज्यूंना मात्र आपल्या मायभूमीत परत जाण्याची तीव्र इच्छा होती व खाल्डियन सत्तेचा मोड झाल्यास ते शक्य होईल, असे त्यांना वाटत होते. म्हणून इराणी सम्राट सायरस याचे त्यांनी आनंदाने स्वागत केले. त्यांचा आशावाद अगदीच फोल ठरला नाही. सायरसने मोठ्या मुत्सद्दीपणाने ज्यू लोकांना ज्यूडात आणि जेरुसलेममध्ये परत जाण्यास परवानगी दिली. हद्दपारीचा हा काळ महत्त्वाचा मानण्याचे प्रमुख कारण म्हणजे ज्यू लोकांचा बॅबिलनच्या संस्कृतीशी असलेला अत्यंत निकटचा संबंध होय. ज्यू लोकांचा यापूर्वीही इतरांशी संबंध आला होता, तरी खुद्द बॅबिलनमध्येच राहिल्याने त्यांना अनेक नव्या विचारकल्पनांचा परिचय झाला. जेरूसलेमला परत जाताना त्यांनी या नव्या कल्पना आपल्या बरोबर नेल्या. याचा परिणाम असा झाला की, त्यांना जेरूसलेममध्येच राहिलेले सनातनी ज्यू लोक आपल्यापेक्षा निराळे, धर्मभ्रष्ट असे मानू लागले. उत्तरेच्या सामेअरियातील लोकांनी हेच धोरण अंगीकारले आणि यातूनच पुढे पंथभेद निर्माण झाले.
इराणी सम्राटांनी ज्यू लोकांना जेरूसलेमकडे परतण्याची परवानगी दिली त्याचप्रमाणे ज्यूडा प्रांतावर ज्यू राज्यपाल नेमले, येहोवाचे मंदिर पुन्हा उभारण्यास साहाय्य केले. बॅबिलोनियात महत्त्व पावलेल्या काही ज्यू नेत्यांना नंतरच्या काळात ज्यूडाचे राज्यपाल नेमले. या राज्यपालांनी आर्थिक, सामाजिक व क्वचित धार्मिक बाबतींतही परिवर्तने घडवून आणण्याचा यत्न केला. या सुधारणावादी प्रशासकांत नीअमाय आणि एझ्रा हे मुख्य. यांच्या सुधारणांना सामेअरियाच्या रहिवाशांचा कडवा विरोध होता. त्यांनी जेरूसलेमचे धार्मिक नेतृत्व झुगारून दिले आणि शीकमजवळच्या गेरझिम डोंगरावरील आपल्या मंदिरात स्वतंत्र पीठ उभारले. अशा रीतीने ‘हद्दपारी’च्या निमित्ताने सुरू झालेले पंथभेद पुढे कायम झाले.
यानंतरच्या काळात ज्यूंचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व झपाट्याने संपुष्टात आले. अलेक्झांडरने इराणी साम्राज्याचा नाश करून या प्रदेशावर ग्रीक सत्ता स्थापन केली. त्याच्यानंतर सिल्युसिडी राजांच्या ताब्यात हा सर्व प्रदेश गेला परंतु राजकीय स्थैर्य फारसे टिकले नाही. पॅलेस्टाइन व सिरिया यांतील संस्थाने, प्रशासक व पार्थियन सत्ता यांच्या चढाओढीने व संघर्षाने हा काळ भरलेला होता. या प्रदेशात रोमन साम्राज्य स्थापन झाल्यावरही वैमनस्ये व संघर्ष चालूच होते. सत्तास्पर्धा करणाऱ्या अनेक छोट्या गटांमध्ये जेरूसलेमच्या ज्यूंचा समावेश होता. आता येहोवाच्या मुख्य पुरोहितांचे स्थान सर्वोच्च झाले होते व त्यांनाच राजकीय नेतृत्व मिळत होते. या पुराण्या संस्थानाने स्वातंत्र्य मिळविण्याचे व टिकविण्याचे जे अनेक प्रयत्न केले, त्यांत इ. स. पू. दुसऱ्या शतकातील ज्यूडाच्या नेतृत्वाखालील मॅकबीझचे बंड सगळ्यात यशस्वी व म्हणून महत्वाचे ठरले. इ. स. पू. १६५ मध्ये ज्यूडाने सिरियाच्या राजाचा पराभव करून जेरूसलेम येथे ज्यू राज्याची स्थापना केली. ज्यूडा व त्याचे वंशज यांची सत्ता जेरूसलेम व त्याभोवतीचा प्रदेश यांवर सु. शंभर वर्षे होती. इ. स. पू. ६६ मध्ये पाँपीने जेरूसलेमवर हल्ला करून बारा हजार लोकांना ठार केले व तेथील राजसत्ता नष्ट केली. तथापि ज्यू लोकांनी पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हेड्रिएनस याने इ. स. १३२ मध्ये ज्यू धर्मावरच बंदी घातली. बंदीच्या विरुद्ध ज्यू लोकांनी प्राणपणाने लढा दिला. बारकोक्बा याच्या नेतृत्वाखाली इ. स. १३५ मध्ये रोमनांविरुद्ध ज्यूंनी बंड केले परंतु रोमनांच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. ज्यू धर्माचे उघड आचरण खुद्द पॅलेस्टाइनमध्ये पुढे अशक्य झाले.
रोमनांच्या पॅलेस्टाइनवरील आक्रमणापूर्वीच अनेक ज्यूंनी पॅलेस्टाइन सोडून इतरत्र वस्ती करण्यास सुरुवात केली होती. रोमनांच्या आक्रमणानंतर पॅलेस्टाइन पूर्णतः उद्ध्वस्त झाले आणि ज्यूंची एकत्र राहून ज्यू राष्ट्र वा राज्य निर्माण करण्याची आकांक्षा धुळीला मिळाली. तथापि ज्यू हे आपल्या धर्माशी एकनिष्ठ होते. जे थोडे पॅलेस्टाइनमध्ये राहिले, त्यांनी विद्यालये काढली आणि या विद्यालयांतून ते ज्यू धर्म शिकवू लागले. इ. स. २०० मध्ये मिशना हा पहिला ज्यू धर्म आणि परंपरा यांवरील ग्रंथ संकलित केला गेला. अशाच प्रकारची विद्यालये बॅबिलनमध्ये सुरू करण्यात आली. इतर देशांतही ज्यूंची वस्ती झाली. त्यांपैकी ईजिप्त, स्पेन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मध्य यूरोप हे महत्वाचे होते. मध्य यूरोपातील ज्यूंना अनेक शतके ख्रिस्ती लोकांकडून छळ सहन करावा लागला. अनेक देशांत त्यांना ‘घेटो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वेगळ्या वसाहतींत राहावे लागे. कायद्याने त्यांना जमीन खरेदी करण्याचे अधिकार नव्हते किंवा स्वतंत्र रीत्या एखादा धंदा करता येत नसे. फ्रान्स, जर्मनी व इतर देशांत ज्यूंपैकी काही थोर लेखक झाले. स्पेनमध्ये अनेक विद्वान ज्यू तत्त्ववेत्ते झाले. त्यांपैकी सॉलोमन इब्न गॅब्रीएल व ज्यूडा हाल्लेवी हे प्रसिद्ध आहेत.
कोलंबसबरोबर अमेरिकेत ज्यू पंधराव्या शतकात गेले. त्यांनी तिथे अनेक सिनॅगॉग बांधली. अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला. तिथे आलेल्या ज्यूंनी विविध प्रकारचे उद्योगधंदे सुरू केले.
ईजिप्तमध्ये ज्यूंची संख्या फार मोठी होती, तसेच आफ्रिकेमधील इतर देशांतही ते विखुरलेले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर व नाझी राजवट यांनी ज्यूविरोधी चळवळ सुरू केली. लक्षावधी ज्यू कुटुंबांची त्यांनी कत्तल केली. ज्यू लोक जरी भिन्न प्रदेशांत वास्तव्य करून होते, तरी त्यांची ज्यू धर्मावरील श्रद्धा अढळ होती व एकात्मता आणि आपल्या बांधवांविषयीचे प्रेम यक्तिंचितही कमी झालेले नव्हते. ज्या देशांत ते राहत होते, त्या देशाचे ते प्रामाणिक व विश्वासू नागरिक होते. तथापि आपले स्वतंत्र राष्ट्र असावे, असे त्यांना वाटत होते आणि आपली मायभूमीच या भटकंतीला पायबंद घालेल, अशी त्यांची दृढ भावना होती. या धोरणानुसार १८९७ मध्ये ⇨थीओडोर हेर्ट्झल या ऑस्ट्रियन लेखकाने ⇨ज्यू राष्ट्रीय आंदोलनास चालना दिली. त्याला पॅलेस्टाइनमध्ये ज्यू राष्ट्र निर्माण करावयाचे होते. याला प्रतिसाद देण्यसाठी १९३० नंतर अनेक ज्यू यूरोपमधून पॅलेस्टाइनमध्ये आले. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस सु. सहा लाख ज्यू पॅलेस्टाइनमध्ये राहत होते. १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रे या संघटनेने पॅलेस्टाइनला अरब राज्यातून वेगळे करून इझ्राएल हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे १४ मे १९४८ रोजी ज्यूंच्या इझ्राएल या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.
डेव्हिड, सॉलोमन यांची प्राचीन राज्ये व इझ्राएल आणि ज्यूडा ही पुढील छोटी राज्ये यांचा विचार करता खास ज्यू कल्पनांवर आधारलेली शासनयंत्रणा फक्त ज्यूडाच्या पाडावापर्यंतच अस्तित्वात होती, असे दिसून येते. पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या ज्यू टोळ्यांत राज्यसंस्था अस्तित्वात नव्हती. त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवन गुंतागुंतीचे होऊ लागल्यावर प्रांताधिकारी उत्पन्न झाले. त्यांची सत्ता एकेका जमातीऎवजी एकेका प्रांतावर होती. फिलिस्टीन टोळ्यांच्या उपद्रवामुळे एकतंत्री संघटनेची गरज उत्पन्न झाली व त्यातून ज्यू राजसत्ता निर्माण झाली. ज्यूडा व इझ्राएल या राज्यांत सर्वसाधारणतः एकाच प्रकारची शासनव्यवस्था होती.
हिब्रू ही ज्यू लोकांची भाषा असून ज्यू लोकांचे बहुतेक सर्व साहित्य धार्मिक स्वरुपाचे आहे. ‘जूना करार’ हा बायबलचाच एक भाग. यात ज्यू धर्म व इतिहास यांची माहिती देणारी बायबलमधील ३९ प्रकरणे असून, त्यांत आरंभापासून ते येशू ख्रिस्तापर्यंतचा ज्यू इतिहास आढळतो. ह्यात भिन्न काळात भर पडत गेली. सबंध ग्रंथ इ. स. पू. ८०० ते २०० या दरम्यान तयार झाला असावा.
अपॉक्रिफा हा ग्रंथ म्हणजे जुन्या कराराची पुरवणी असून ज्यू धर्मात मान्यता पावलेल्या चौदा पुस्तकांचा समावेश त्यात होतो. हे सर्व वाङ्मय धार्मिक आचाराचे व नीतिपाठ देणारे आहे, असे मानले जाते. मोझेसने आपली विधिसंहिता तोंडी सांगितली आणि ती इतर ज्येष्ठांनी टिकविली. ह्या विधिसंहितेवरील टीका म्हणजे हालाखा. मिशना ही हालाखाची संपादित आवृत्ती. लेखी संहिता व मौखिक परंपरा यांचा अन्वय लावून दाखविण्याच्या उद्देशाने पुरोहितांनी ‘मिदरॅश’ ही वाङ्मयशाखा उत्पन्न केली. भिन्न काळात जुना करार व इतर ग्रंथ यांवरील तयार केलेल्या टीकांचा यात समावेश होतो. काही भागांत दंतकथा व आख्यायिका यांचा उपयोग करून जुन्या कराराचे विवरण करण्यात आले आहे. मिशना आणि त्यावरील टीका म्हणजे गेमारा या दोहोंचा मिळून ⇨टॅलमुड हा ग्रंथ तयार होतो. टॅलमुडच्या दोन वेगळ्या आवृत्त्या उपलब्ध आहेत, एक जेरूसलेमची व दुसरी बॅबिलनची. ह्याचा मूळ गाभा इ. स. पू. ७०० ते इ. स. २०० च्या दरम्यान तयार झाला असला, तरी त्यांच्या अंतिम आवृत्त्या जेरूसलेम (इ. स. ४००) व बॅबिलन (इ. स. ५००) येथे तयार झाल्या आणि दोन्हींतील गेमारा म्हणजे टीका निरनिराळ्या आहेत. बॅबिलोनियन टॅलमुडला आज जास्त मान्यता आहे.
पहा : इझ्राएल ज्यू कला ज्यू धर्म यिद्दिश भाषा-साहित्य हिब्रू भाषा-साहित्य.
संदर्भ :
1. Finkelstein, Louis, Ed. The Jews, 2 Vols., New York, 1960.
2. Harrison, R. K. Archaeology of the Old Testament, London, 1963.
3. Roland, de Vaux, Ancient Israel, It’s Life and Institutions, London, 1961.
4. Wumbrand, Max Roth, Cecilo, The Jewish People, London, 1966.
माटे, म. श्री.
“