जोन्स, सर विल्यम : ( २८सप्टेंबर १७४६–२७ एप्रिल १७९४). प्रख्यात इंग्रज प्राच्यविद्यासंशोधक आणि विधिवेत्ता. लंडन येथे जन्म. विद्यार्थीदशेतच परकीय भाषांवर प्रभुत्व मिळविण्याचे त्यांचे कौशल्य दिसून आले. त्यांचे शिक्षण हॅरो आणि ऑक्सफर्ड येथे झाले. आर्थीक परीस्थिती सुधारावी, म्हणून त्यांनी वकील होण्याचे ठरविले. वकिलीचा अभ्यास चालू असतानाच त्यांनी लिहिलेले दोन निबंध त्यांच्या सर्वांगीण बुद्धिमत्तेची साक्ष देतात. अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याला सहानुभूती दर्शवल्यामुळे कलकत्त्याला न्यायधिशाच्या जागेवर होणारी त्यांची नेमणूक पाच वर्षे लांबणीवर पडली. अखेर १७८२ मध्ये ती झाली आणि ते कलकत्त्याला गेले. १७८४ च्या जानेवारीत त्यांनी ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’ या संस्थेची स्थापना केली [→ एशियाटिक सोसायटी]. या संस्थेच्या अध्यक्षपदी ते अखेरपर्यंत होते. भारतात न्यायाधीश म्हणून येण्यापूर्वी  त्यांनी यूरोपातील व पश्चिम आशियातील अनेक भाषांचा अभ्यास केला होता.

सर विल्यम जोन्स

आपल्यासमोर चालणाऱ्या दिवाणी खटल्यांत देण्यात येणारा पुरावा शास्त्रांना धरून आहे की नाही, ते समजावे म्हणून त्यांनी फावल्या वेळात संस्कृतचा अभ्यास सुरू केला (१७८६) आणि या भाषेवर प्रभुत्वही मिळविले. हा अभ्यास सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनीच एशियाटिक सोसायटीच्या तिसऱ्या वार्षिक भाषणप्रसंगी त्यांनी जे उद्‌गार काढले, ते इंडो-यूरोपियन भाषांच्या तौलनिक व्याकरणाच्या संदर्भात मोलाचे ठरले. ‘ग्रीक आणि लॅटिन या भाषांशी असलेले संस्कृतचे साम्य इतके विलक्षण आहे, की ते योगायोगाने झालेले नसून या तीन भाषा–तसेच कदाचित गॉथिक, केल्टिक व प्राचीन इराणी या भाषाही–आज जिचा पुरावा उपलब्ध नाही अशा एका मूळ भाषेतून निघाल्या असाव्यात’, असे त्यांचे विवेचन होते. शाकुंतलाचे पहिले इंग्रजी भाषांतर त्यांनीच केले (१७८९). त्याचेच पुढे जर्मनमध्ये भाषांतर होऊन गटेसारख्या महाकवीला भारतीय साहित्यातील सौंदर्याचे दर्शन घडले. गीतगोविंद, ऋतुसंहार, यांच्या भाषांतरानंतर, हिंदू कायद्याचा आधार जी मनुस्मृती  ती भारतीय पंडितांच्या सहकार्याने इंग्रजीत आणण्याचे काम त्यांनी हाती घेतले (१७८८) पण ते पुरे होण्यापूर्वीच त्यांचे कलकत्ता येथे निधन झाले.

संदर्भ : 1. Arberry, A. J. Asiatic Jones, New York, 1946.

    2. Teignmouth, Lord, Memoirs of The Life, Writings and Correspondence of Sir William       Jones, 1804.

कालेलकर, ना. गो.