जैसलमीर संस्थान :ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक संस्थान. राजपुतान्यातील संस्थानांत अगदी पश्चिमेकडे वसलेले हे एक मोठे संस्थान असून, हे संस्थान हिंदुस्थानातील  विशाल वालुकासागरापैकी एक भाग असल्यामुळे याचा बहुतेक प्रदेश वालुकामय व ओसाड होता. क्षेत्रफळ ४,२५१ चौ. किमी. लोकसंख्या ९३,२४६ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. एक लाख रुपये. उत्तरेस बहावलपूर, पूर्व-दक्षिणेस जोधपूर, ईशान्येस बिकानेर ही  संस्थाने पश्चिमेस सिंध यांनी ते सीमांकित झाले होते. भाटी जादों राजपुतांपैकी देवराज रावळने नवव्या शतकाच्या मध्याला हे स्वतंत्र राज्य स्थापिले. त्याची राजधानी प्रथम तनोट व नंतर बहावलपूर संस्थानातील देवडावड (देवगढ) येथे होती. जैसलमीरचे संस्थानिक स्वतःस यादवांचे वंशज मानीत. श्रीकृष्णानंतर त्यांच्या पुत्रांपैकी दोघांनी सिंधू नदीपलीकडे मर्व्ह प्रदेशात प्रथम वसाहत केली. त्याच्या वंशजांपैकी राजा जैसलने ११५६ मध्ये जैसलमीर नावाचे शहर वसवून तेथे आपली राजधानी हलविली. तो ११६८ मध्ये मरण पावला. त्यानंतर त्याचा पुत्र सलभान गादीवर आला. तो मुसलमानांबरोबर लढताना मरण पावला. त्यानंतर बीजल, कैलान, चाचिकदेव, कर्ण, लाखुरसेन, पंपाल हे राजे झाले. पंपालनंतर त्याचा चुलता जयतसी राजा झाला. त्याच्यावर अलाउद्दीन खलजीने स्वारी केली. अलाउद्दीनने सु. आठ वर्षे जैसलमीरला वेढा दिला. काही वर्षे जैसलमीर आपल्या ताब्यात ठेवले. यात जयतसी व त्यानंतरचा राजा मुळराज मरण पावले. दुदू या भाटी राजाने जैसलमीर काबीज केले पण पुन्हा मुसलमानांनी त्याचा पराभव करून मुळराजाच्या गरसी या पुतण्यास जैसलमीर दिले (१३०६). यानंतर कित्येक वर्षे त्यावर दिल्लीच्या अधिपतींचे वर्चस्व होते. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात संस्थान मोगलांचे मांडलिक बनले. तेव्हाचा राजा सबळसिंग हा पहिला भाटी राजा  होता. त्याने उत्तरेस सतलज, पश्चिमेस सिंधू नदीपर्यंत राज्यविस्तार केला. मारवाड–बिकानेरचा बराच भाग राज्याला जोडला आणि राज्याच्या सीमा व उत्पन्न वाढविले. मात्र पुढील १०० वर्षांत पुन्हा संस्थानचा संकोच झाला. मराठ्यांनी जैसलमीरमध्ये कधी हस्तक्षेप केला नाही. जैसलमीरचा दुसरा मुळराज आणि इंग्रज यांत १८१८ मध्ये तह होऊन संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक झाले. दुसरा मुळराज गादीवर आला, तेव्हा मेहता सालिमसिंग या दिवाणाने धुमाकूळ घातला. संस्थानला दत्तकाचा अधिकार मिळाला. खंडणी माफ झाली. इंग्रज व उदयपूरच्या हस्तक्षेपामुळे बिकानेरच्या आक्रमणापासून १८२९ मध्ये संस्थान वाचले. मुळराजानंतर त्याचा मुलगा गजसिंग गादीवर आला. १८४४ मध्ये इंग्रजांनी सिंध जिंकल्यानंतर शाहगढ, गर्सिया आणि घोटारूचे किल्ले मूळचे संस्थानचे म्हणून जैसलमीरला दिले. १८४६ मध्ये गजसिंग मरण पावला. त्याच्या राणीने पुतण्या रणजितसिंग यास दत्तक घेतले पण तोही १८६४ मध्ये निपुत्रिक मरण पावला. तेव्हा त्याच्या धाकट्या भावास दत्तक घेण्यात आले. तो १८९१ मध्ये मरण पावला. त्याला मुलगा नव्हता, म्हणून लाठीच्या ठाकूर कुशालसिंगच्या श्यामसिंग या मुलास दत्तक घेण्यास आले. त्याने शालिवाहन हे पूर्वीचे कुटुंबनाव धारण केले. जैसलमीर शहर सोडले, तर संस्थानात दुसरे शहर नव्हते ४७२ खेडी होती आणि त्यांपैकी २३९ खालसा होती. संस्थानात जैनांनी प्रथामिक शिक्षणाला चालना दिली. प्रचंड वाळवंटात रेल्वे किंवा पक्क्या सडका नव्हत्या, फक्त एक डाकघर होते. संस्थानाच्या प्रशासनाकरिता १६ जिल्हे पाडले होते पण वारंवार पडणारे दुष्काळ व पाण्याची टंचाई यांमुळे तात्पुरते स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होई. संस्थानची स्वतःची टाकसाळ होती. संस्थानात सरंजामी पद्धत असली, तरी दिवाणावर रेसिडेंटची देखरेख व हुकमत असे. महाराज महारावळ सर जवाहरसिंगजी बहादूर यांच्या कारकीर्दीत १९४९ मध्ये संस्थान विलीन होऊन राजस्थान संघात सामील झाले. संस्थानिकांना १५ तोफांची सलामी असे.                             

  कुलकर्णी, ना. ह.